🔹खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेची निवेदनाद्वारे मागणी
✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)
राजापूर ( जि. रत्नागिरी ) येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई करुन कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी घोषणा देवून समाजातील अपप्रवृत्तींचा निषेध केला.खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कि ,प्रामाणिकपणे समाजहिताचे काम करुन लोकशाहीतील चौथ्या स्तभांचे कर्तव्य पालन करणाऱ्या राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची समाजातील विकृत प्रवृत्तींनी हत्या केली आहे. समाजात अपप्रवृत्तींविरोधात भूमिका घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यसरकारने पत्रकार संरक्षण कायदा संमत केला आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांना संरक्षण देणे अभिप्रेत आहे, मात्र राजापूर येथील घटनेसारख्या घटना वाढत असल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पत्रकार वारिशे यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई होवून त्यांना कडक शिक्षा होणे क्रमप्राप्त आहे.
पत्रकारांच्या भावना शासनस्तरावर पोहचविण्याची ग्वाही नायब तहसिलदार यांनी दिली.यावेळी खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेचे मार्गदर्शक पांडुरंग तारळेकर, अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष इम्रान जमादार, सचिव नितीन राऊत, कोषाध्यक्ष विठ्ठल नलवडे, प्रसिद्धीप्रमुख ऋषिकेश पवार, जिल्हा प्रतिनिधी अजित जगताप,सदस्य पद्मनील कणसे, केदार जोशी, एकनाथ जाधव, अतुल पवार, विजय जगदाळे, विशाल चव्हाण, सौरभ चव्हाण , सचिन साळुंखे यांची उपस्थिती होती.