🔸आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदागवळी यांची मागणी
✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.13फेब्रुवारी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी करण्याचे पत्र सामाजिक न्याय विभागाला बार्टी महासंचालकाने दिले होते. त्या पत्रावर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. यावर तातडीने निर्णय घेऊन निबंधकांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. एल. नंदागवळी यांनी केली आहे. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन दिले. बार्टीतील प्रकरणाची चौकशी न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ही अनुसूचित जातींमधील ५९ जातीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आली. या जातींचा विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्यात येत आहे. मात्र, येथील काही वरिष्ठ अधिकारी बार्टीला भ्रष्टाचाराचे कुरण बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांच्यावर अनेक प्रकरणात ठपका ठेवण्यात आला आहे.
भीमा कोरेगाव भोजन प्रक्रियेत घोटाळा करणे, न्यायालयीन प्रकरण दाबून ठेवणे, स्वतःच्या फायद्यासाठी शासननिर्णय विरुद्ध पत्र निर्गमित करणे, माहिती अधिकार कायद्यात परस्पर हेराफेरी करणे, बार्टी संस्थेवर मोर्चा आणण्यास चिथवणे, खरेदी प्रक्रियेत संदिग्धता पूर्ण भूमिका घेणे इत्यादी गंभीर आरोप असल्याने बार्टी निबंधक इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीचे पत्र बार्टीच्या महासंचालकांनी सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे. श्रीमती अस्वार त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली असून निबंधक पदावरून त्यांना जानेवारी महिन्यात मुक्तही करण्यात आले.
मात्र,त्यांना महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात धाव घेऊन पदमुक्तीला स्थगिती मिळविली आहे. मात्र, सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यात आलेल्या चौकशीच्या पत्रावर अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे सरकार दबाव काम करीत असून त्यांच्या चौकशीपासून पळ काढत असल्याची आरोपही आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.एल. नंदागवळी यांनी केला आहे. पवनीचे तहसीलदार नीलिमा रंगारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन आले असून यावेळी आर. एल. नंदागवळी, विजय मानवटकर, सूर्यकिरण नंदागवळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यातील बार्टीत झाली जातीयवादी संघटनांचा अड्डा
पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जातीवादी संघटनांचा अड्डा झाल्याचे दिसून येत आहे. कार्यालयात वेळ घालविण्यासाठी संघटनांचे पदाधिकारी उशिरापर्यंत बसत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कटकारस्थान रचले जात आहे. अशा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर वेळीच तंबी द्यावी. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार होत असून याकडे दुर्लक्ष केल्यास बार्टीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.एल. नंदागवळी यांनी दिला आहे.