


✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.13फेब्रुवारी):-माहूर तालुक्यातील नाईकवाडी येथील अनिल जाधव यांचा सिकलसेल आजारग्रस्त मुलगा आपल्या वडिलां सोबत पुसद येथे दर महिन्याला रक्त चढविण्यासाठी येत असतो. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने येण्या जाण्याच्या खर्चासह रक्त बॉटलसाठी लागणारे सोळाशे रुपये व रक्त बॉटल चढविण्याचा खर्च परवडण्या सारखा नाही. त्यामुळे चार वेळेस पुसद येथे व्यवस्था होत असल्याने रक्ताची व्यवस्था न झाल्याने पुसद सारख्या अनोळखी ठिकाणी हा पालक रक्तासाठी भनभन फिरत होता. अशातच एकाने एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भिम टायगर सेनेचे किशोर कांबळे यांचेकडे जाण्याचा सल्ला दिला.
जाधव यांनी कांबळे यांची भेट घेतली. आपली रक्त विकत घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याची जाणीव करून दिली. त्यावर भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी लगेचेच कर्तव्यदक्ष तहसीलदार एकनाथ काळबांडे यांना फोन लावून सदर सिकलसेल ग्रस्त रुग्णाला मोफत रक्तपुरवठा करण्यासाठी विनंती केली. त्यावर तहसीलदार काळबांडे यांनी मेडिकेयर ब्लड बँकेचे संचालक डॉक्टर सतीश चिद्दरवार व आयकॉन हॉस्पिटलचे संचालक गजानन मामिडवार यांना या गरीब रुग्णासाठी मदत करण्यासाठी सांगितले.
यास प्रतिसाद देत मेडिकेअर हॉस्पिटल ने सिकलसेल रुग्णाकडून घेतलेले पंधराशे रुपये परत केले व रक्त बॉटल मोफत उपलब्ध करून दिली. तसेच आयकॉन हॉस्पिटल यांनी सिकलसेल रुग्णाला रक्त बॉटल कोणतीही फी न घेता चढवून दिली. मुलासाठी मोफत रक्त बॉटल व चढविण्याची सुविधा करून दिल्याबद्दल भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांचे अनिल जाधव यांनी मनस्वी आभार मानून अशी सुविधा दर महिन्याला व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. किशोर कांबळे यांनी तहसीलदार एकनाथ काळबांडे यांचे कर्तव्य तत्परतेबाबत आभार मानले.
व सिकलसेलग्रस्तरूग्ण मुलाचे आयुष्य वाचविण्यासाठी या रक्तबॉटलसाठी लागणारे पैसे व चढविण्यासाठी लागणारे पैसे अश्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढत जीवन जगत आहे. ही परिस्थिती एकट्या जाधव परिवाराची नसून शेकडो सिकलसेल ग्रस्त थॅलिसमिया रुग्ण या आर्थिक विवंचनेतून मुलगा आजाराने ग्रस्त तर पालक वर्ग आर्थिक व मानसिक आजाराने त्रासून गेले आहे. यावर शासनाने सिकलसेल व थॅलिसमिया ग्रस्त रुग्णासाठी मोफत रक्त बॉटल व चढविण्याची व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अशी भावना भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी व्यक्त केली.













