✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.13फेब्रुवारी):-बंजारा समाजाची काशी असलेल्या या स्थळाचा कायापालट करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. त्याप्रमाणे बंजारा समाजाच्या काशीचा अर्थात पोहरादेवी तीर्थस्थळाचा कायापालट करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातुच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व 593 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर आयोजित सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गोर बंजारा बोलीत भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. ते पुढे म्हणाले की, संत सेवालाल महाराज यांनी दिलेल्या प्रतिज्ञा ह्या केवळ बंजारा समाजासाठी नव्हे तर समस्त मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. बंजारा हा एक प्राचीन समाज आहे. बंजारा समाजातील महापुरुषांनी त्याग आणि समर्पणाची मोठी परंपरा निर्माण केली आहे. एकेकाळी समृद्ध असणाऱ्या या गोपालक समाजाची आजची हलाखीची स्थिती सुधारण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
तांड्यांचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करून प्रत्येक तांड्यापर्यंत विकास पोहोचवू. बंजारा समाजातील मुला-मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी शासन उपाययोजना करेल. ‘नॉन क्रिमिलेयर’ ची अट रद्द करण्याबाबत महाधिवक्त्यांचे मत मागविण्यात येईल. पोहरादेवीचा विकास करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही. गोर बोलीचे संवर्धन करण्यासाठी अकादमी स्थापन करू. शासन संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.