Home महाराष्ट्र पराभव सुत्ताचा सारांश

पराभव सुत्ताचा सारांश

166

🔸माणसाची अधोगती कशी होते? मनुष्याच्या अध:पतनाची कारणे काय असतात हे सांगतांना तथागत बुद्ध म्हणतात की : –

1) कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतिला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे.धम्मप्रेमी हा उन्नत पथावरील,तर धम्मव्देष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू असतो.जो धम्मावर प्रेम करतो त्याची उन्नती होते;जो घृणा करतो त्याचे पतन होते.

2) अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात.त्याची दुर्गुणी माणसांवर श्रध्दा असते त्यांचा धर्म त्याला चांगला वाटतो;हे त्याच्या अधोगतिचे दूसरे लक्षण होय.

3) झोपाळूपणा,गप्पा मारण्याची आवड,निरूद्योगीपणा,आळस, क्रोधिष्टता हे सर्व दुर्गुण असणे,हे अधोगतीचे तिसरे लक्षण होय.

4) त्यांचे आई-बाप वृध्द झाले व त्यांचे जवळ असतांना,जवळ संपत्ती असूनही मुलांनी त्यांचे पालनपोषण न करणे,हे अधोगतीचे चौथे लक्षण होय.

5) श्रमण किंवा अन्य उत्तम मार्ग दाखविणा-या शास्त्याला असत्य भाषणांनी ठकविणे,हे अधोगतीचे पाचवे लक्षण होय.

6) जवळ विपुल द्रव्य,सुवर्ण,धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे,हे अधोगतीचे सहावे लक्षण होय.

7) आपले कूळ,संपत्ती,जात यांचा अभिमान बाळगून आप्तेष्टांचा तिरस्कार करणे,हे अधोगतीचे सातवे लक्षण होय.

8) व्यभिचार,मद्यपान,जुगार आणि ऐषआराम यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे,हे अधोगतीचे आठवे लक्षण होय.

9) स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या,गणिका आणि परस्त्रिया यांच्याकडे जाणे,हे अधोगतीचे नववे लक्षण होय.

10) असंयमी,उधळी स्त्री अथवा पुरूष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे,हे अधोगतीचे दहावे लक्षण होय.

11) जवळची साधने अल्प असूनही उच्च कुळात जन्म झाला,या सबबीवर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे,हे अधोगतीचे अकरावे लक्षण होय.ही सर्व अधोगतीचे लक्षणे आहेत.या सर्वांपासून दूर राहिल्याने मनुष्य सुखी आणि सुरक्षित राहून चांगले जीवन व्यतीत करू शकतो.तथागत भगवान गौतम बुद्धांचे विश्वातील सर्व मानवांना सर्वकाळ कल्याणकारी आणि उपयुक्त असे धम्म विचार आहेत.

✒️भंते शाक्यपुत्र राहुल(मो:-9834050603)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here