✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.21जानेवारी);-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित ‘प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.एन.एस.कोल्हे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.एन.एस. कोल्हे, दैनिक देशदूतचे पत्रकार श्री.चंद्रकांत पाटील, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, ‘बातमीमुळे रोजचा इतिहास कळतो. बातमी लेखनासाठी वाचन, लेखन, मनन व चिंतन यांची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना बातमीची मांडणी, पद्धती, शैली यांची माहिती व्हावी.तसेच विद्यार्थ्यांमधील लेखनशैली विकसित व्हावे आणि पत्रकारितेची ओळख व्हावी हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे’.
या कार्यशाळेच्याप्रसंगी ‘प्रसार माध्यमासाठी लेखन कौशल्ये’ या विषयावर मार्गदर्शन करतांना दैनिक देशदूतचे पत्रकार श्री.चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘वर्तमानपत्राचा गाभा म्हणजे अग्रलेख होय. अन्यायाला वाचा फोडणे, समाजाच्या समस्या मांडणे, सामाजिक बांधीलकी जोपासणे, लोकशाही टिकवून ठेवणे, विश्वासाहर्ता टिकविणे, समाजप्रबोधन करणे, जनजागृती करणे व न्याय मिळवून देण्याचे कार्य वृत्तपत्र करतात.पत्रकार म्हणजे समाजाचे प्रतिबिंब मांडणारा प्रतिनिधी असतो. विद्यार्थ्यांमधून पत्रकार निर्माण व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रातील लेख, अग्रलेख, बातम्यांचे वाचन करून त्यांची मांडणी, शैली, समजून घ्यावी.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे म्हणाले की, ‘पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्या मांडण्याचे महत्वपूर्ण कार्य वृत्तपत्र करतात.आजच्या पिढीने पत्रकारितेतील संधींचा फायदा करून घ्यावा व समाजाचे प्रश्न मांडून सामाजिक बांधीलकी जोपासावी.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.एल. भुसारे यांनी केले तर आभार श्री.जी.बी.बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.