✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.8जानेवारी):-भक्ति, कर्म व ज्ञान यांचा त्रिवेणी समन्वय साधण्यात संत भगवान बाबांना यश मिळाले होते. त्यांनी आयुष्यभर आध्यात्मिक प्रबोधन केले. परंतु त्याच बरोबर त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. सामाजिक समता व एकता हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू होते. त्यामुळे सामाजिक समतेचा विचार संत भगवान बाबांनी पेरला आहे. म्हणून आपण त्यांची शिकवण आत्मसात करायला हवी, असा कानमंत्र आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिला.
श्री.संत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त अरबुजवाडी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी हभप.संभाजी सानप महाराज वाघदराकर यांच्या रसाळपूर्ण कीर्तन संपन्न झाले.यावेळी मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, बडवनीचे सरपंच संभुदेव मुंढे ग्रामस्थ गजानन मुंढे, श्रीमंत मुंढे, हरिचंद्र मुंढे, हरिभाऊ मुंढे, भगवान माळवे, गोपीनाथ फड उपस्थित होते.
अभिमान व स्वाभिमान जपणाऱ्या अरबुजवाडीने संकटात नेहमी मला साथ दिली आहे. त्यामुळे माझ्या विजयाचा इतिहास निर्माण करण्यात या गावाचा मोलाचा वाटा आहे. परंतु हे गाव मला स्वत: काही मागत नाही. फक्त कार्यक्रमाला या, एवढाच आग्रह असतो. त्यामुळे रिकाम्या हाताने येणे मला मान्य नाही. म्हणून सभामंडप बांधण्यासाठी मी १० लाख रुपयांचा चेक घेऊन आलो आहे. तो चेक लगेचच सरपंच व प्रमुख लोकांकडे सुपूर्द करतो. तसेच भविष्यात सुध्दा काही कमी पडू देणार नाही. कारण, तुम्ही मला जीवनदान दिले आहे, असे भावनिक बोलताना आ.डॉ.गुट्टे यांच्या डोळे पाणावले होते.दरम्यान, बॅन्डबाजा व फटाक्यांच्या अतिषबाजीत ग्रामस्थांनी आ.डॉ.गुट्टे यांचे स्वागत केले. याप्रसंगी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.