Home महाराष्ट्र छत्रपती संभाजी राजे धर्मवीर की स्वराज्यरक्षक?

छत्रपती संभाजी राजे धर्मवीर की स्वराज्यरक्षक?

167

संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी राजे धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक हा विषय राजकारण आणि मीडियाच्या केंद्रस्थानी आला आहे. निमित्त झालं विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्या “संभाजी राजे हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते” ह्या वक्तव्याचं. छत्रपती संभाजी राजे यांना धर्मवीर ठरविण्यासाठी त्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई फक्त धर्मासाठी होती हे आधी सिद्ध करणे गरजेचे आहे.

औरंगजेबाच्या सैन्यात मिर्झा राजे जयसिंग, रामसिंग यांसारखे हजारो हिंदू, मराठा राजपूत राजे-राजवाडे, सरदार होते. त्यांच्यावर औरंगजेबाने कधीच मुस्लिम व्हा म्हणून बळजबरी केली नाही. ते मरेपर्यन्त हिंदूच राहिले. त्यांना जबरदस्तीने मुस्लिम का केलं गेलं नाही? दुसरं म्हणजे औरंगजेबाने जर धर्मासाठी युद्ध केलं असतं तर त्याने धर्माने मुस्लिमच असलेल्या आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही का संपवली? का त्यांच्यावर हल्ले केले. ती मुस्लिमांचीच म्हणून वाढवली का नाही? त्यांच्याविरोधात कारवाया का केल्या? औरंगजेब जर आपल्या बापाला शहाजहानला मारतो तो काय शहाजहान हिंदू होता म्हणून? आपल्या सख्ख्या भावांना मारतो तो काय त्याचे भाऊ हिंदू होते म्हणून? निजामशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही बुडवतो ते काय धर्मासाठी? अजिबात नाही हे सर्व त्याने केले फक्त आणि फक्त सत्तेसाठी. याचा अर्थ औरंगजेब चांगला होता असे नाहीच, तो क्रूर, दुष्ट आणि स्वराज्याचा शत्रूच होताच पण त्याच्यालेखी सत्ता सर्वात महत्वाची होती. धर्मापेक्षाही सत्ता त्याला प्रिय होती हे महत्वाचं आहे. आणि याच सत्तेसाठी आणि राज्यासाठी त्याने छत्रपती संभाजी राजांचा खून केला.

महत्वाचा प्रश्न म्हणजे जर संभाजी राजेंना ‘धर्म बदल नाहीतर जीव दे’ असं औरंगजेब म्हणाला असता तर संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर तब्बल 30 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या संभाजीराजेंच्या पत्नी येसूबाई आणि 18 वर्ष कैदेत असलेले चिरंजीव शाहू राजे ह्यांना औरंगजेबाने धर्मांतराची बळजबरी का केली नाही? सहज करू शकला असता, शाहू राजे तर वय वर्षे 7 ते वय वर्षे 25 पर्यंत त्याच्या कैदेत होते. मग त्यांना जबरदस्तीने धर्मांतर का करायला लावले नाही? १८ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत राहून सुद्धा शाहू राजे हिंदूच कसे राहिले? औरंगजेबाजवळ भरपूर वेळ होता राणीसाहेब आणि शाहूंचा छळ करायला, तो ह्या सर्वांना संपवायलाच महाराष्ट्रात आला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

संभाजी राजेंना औरंगजेबाने धर्म परिवर्तन करण्याबद्दल विचारणा केली असा कुठलाही तत्कालीन पुरावा नाही. हे खूप अतार्किक होईल आणि समजा तशी विचारणा केली असती तरी संभाजी राजे धर्म परिवर्तन केल्यानंतर औरंगजेबाशी प्रामाणिक राहणार नाहीत, उलट धर्म स्वीकारण्याचे हो बोलून बाहेर निघून आपल्याच विरोधात बंड करून उठतील हे औरंगजेबाला सुद्धा माहीत होतं. करण नेताजी पालकर आणि बजाजी नाईक निंबाळकर हे मुस्लिम होऊन पुन्हा हिंदू झाले व आपल्याच विरोधात लढले हे औरंगजेबाला माहीत होतं.तो काही मूर्ख नव्हता. कारण त्याला आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत सोडण्याचा आयुष्यभर पाश्चाताप होत होता. त्यावेळी केलेली चूक तो कोणत्याही परिस्थितीत पुन्हा करू शकत नव्हता, त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत संभाजी राजेंना जिवंत सोडणार नव्हताच.

धर्म बदलशील तर जिवंत सोडतो असे म्हणणे म्हणजे छत्रपती संभाजी राजांना संधी दिल्यासारखे झाले असते आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे झाले असते, औरंगजेब मुत्सद्दी आणि धूर्त होता त्यामुळे असा मूर्खपणा त्याने कदापि केला नसता.संभाजी राजेंच्या हत्येवेळी तिथे उपस्थित असलेला साकी मुस्तईद खान व नंतर ईश्वरदास नागर यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे संभाजी राजेंना दोनच प्रश्न विचारण्यात आले १) स्वराज्याचा पूर्ण खजिना कुठे आहे? २)माझ्याकडचे कोण कोण सरदार तुला फितूर झालेत? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली असती तर स्वराज्य कायमचं संकटात आलं असतं. संपून गेलं असत. कारण संभाजी राजांच्या मृत्यूनंतर तब्बल १८ वर्षे अर्थबळाशिवाय मराठे औरंगजेबाशी लढूच शकले नसते. स्वराज्य संपुस्तत आले असते. त्यामुळे वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे न देऊन संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणाकरिता आपले बलिदान दिले.

छत्रपती संभाजी राजे औरंगजेबाच्या तावडीत सापडलेही नसते, कारण त्या अगोदर त्यांना दोन वेळा विष देण्याचा प्रयत्न केला गेला. दोन्हीवेळ तो प्रयत्न हुकला म्हणून ते औरंगजेबाच्या तावडीत सापडले आणि त्यांची हत्या झाली. आता संभाजी राजांवर दोनवेळा विषप्रयोग करणारे मुस्लिम होते की हिंदू? तर ते सर्व उच्चवर्णीय हिंदू होते, हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगणारे होते मग संभाजी राजे धर्मवीर असतांना ह्या हिंदू धर्मद्रोह्यांनी त्यांना दोनवेळा मारण्याचा प्रयत्न का केला असेल? संभाजी राजांना पकडून देणारे कोण होते? मुस्लिम होते का? नाही, तेसुद्धा हिंदूच होते. मग धर्मवीर संभाजी राजांना हिंदूंनीच का पकडून दिले असेल? हा विचारसुद्धा आपण केला पाहिजे.
काही अभ्यासकांचे असे मत आहे की औरंगजेबाने संभाजी महाराजांची केलेली हत्या ही मनुस्मृती प्रमाणे केली गेली.

ही गोष्ट यासाठी खरी वाटते कारण औरंगजेबाने त्याच्या संपूर्ण आयुष्यभरात कुणाचीच अशी डोळे काढून, जीभ कापून, ४० दिवस तडफडत ठेवून शेवटी तुकडे करून हत्या केली नाही. फक्त आणि फक्त संभाजी राजेंनाच अशी शिक्षा का दिली असेल? याचा विचार केला की वरील अभ्यासकांच्या मतात तथ्य असल्याची जाणीव होते.

आज धर्मवीर हे विशेषण अनेक राजकीय नेत्यांना लावले जाते, इतकेच काय पण आज महाराष्ट्राच्या प्रत्येकच जिल्ह्यात एक दोन तरी धर्मवीर म्हणवणारे आपल्याला सापडतील, मग त्यांच्याच रांगेत आपण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा नेऊन बसवणार आहोत काय? काही प्रवृत्तींकडून दोन्ही छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व खुजे करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांना ‘गोब्राम्हणप्रतिपालक’ विशेषण लावणे, म्हणजे शिवाजी महाराज फक्त गाई आणि ब्राम्हण यांचेच रक्षण करत होते, बाकी पूर्ण रयत वाऱ्यावर सोडून दिली होती काय? धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक ह्या दोन्ही शब्दाचे अर्थ आपण लक्षात घेतले पाहिजेत. धर्मवीर म्हणजे फक्त आणि फक्त धर्मासाठी लढणारा. पण स्वराज्यरक्षक म्हणजे संपूर्ण स्वराज्यातील जनतेची काळजी वाहणारा, रयतेची जात-धर्म-पंथ न बघता त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध लढणारा, त्यांचे रक्षण करणारा, स्वराज्यातील सर्वच धर्मांचे रक्षण करणारा, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारसदार म्हणजे स्वराज्यरक्षक.

स्वराज्यरक्षक या संकल्पनेत धर्मवीर, शूरवीर, मुत्सद्दी, अर्थतज्ञ, राजनीतीतज्ञ, विद्वान, रयतेचे राजे यासारख्या अनेक संज्ञा समाविष्ट आहेत. पण धर्मवीर म्हणजे फक्त धर्माकडे लक्ष देऊन इतर सर्व बाबींकडे दुर्लक्ष करणारा असा संकुचित अर्थ होतो. संभाजी राजे-शिवाजी राजे फक्त धर्मासाठी लढले असते तर त्यांच्या सैन्यात मुस्लिम नसते. शिवरायांच्या अंगरक्षकात मुस्लिम नसते, त्यांनी जावळीच्या चंद्रराव मोरेचा चौरंगा केला नसता आणि अफजल खानाचा वकील कृष्णा कुळकर्णीला मारले नसते. हेसुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे.

दोन्ही छत्रपतींच्या लेखी जो स्वराज्याचा शत्रू तो आपला शत्रू होता. मग तो मराठा असो की ब्राम्हण की मुस्लिम. त्यावेळी देशात मुघलांचा राज्य असल्यामुळे ते मुघलांशी लढले. जर त्यावेळी देशावर ब्रिटिशांचं राज्य असत तर दोन्ही छत्रपती ब्रिटिशांविरोधात लढले असते. पोर्तुगिजांचं राज्य असतं तर त्यांच्याविरोधात लढले असते ही साधी गोष्ट आहे.हे जर धर्मयुद्ध होतं असं आपण म्हणू तर कृष्णा कुलकर्णी, अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस ह्यांचा वध करणाऱ्या छत्रपती घराण्याची बदनामी करणारे सर्व उच्चवर्णीय हिंदूच का असतात? त्यात एकही मुस्लिम का नसतो याचा विचार खोलात होणं गरजेचं आहे.

संभाजी महाराजांचा अपमान झाला असे म्हणणाऱ्या लोकांना संभाजी महाराजांच्या अपमानापेक्षा स्वतःच्या नेता आणि पक्षाचा आदेश जास्त महत्वाचा आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. कारण विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या साहित्यात संभाजी राजे हे मदिरा आणि मदीराक्षिच्या आहारी गेलेला, नाकर्ता, राष्ट्राचे नेतृत्व करण्यास अयोग्य आणि बिघडलेला राजपुत्र असे लिहून ठेवले आहे. माधव गोळवलकर यांनी आपल्या लिखाणात संभाजी राजे स्त्रीलंपट आणि दारुडे होते असे लिहिले आहे. आता वरील शब्द अपमानास्पद आहेत की स्वराज्यरक्षक हा शब्द अपमानास्पद आहे? राम गणेश गडकरी यांनी ‘राजसन्यास’ या नाटकामध्ये, वसंत कानेटकरांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात, आणि ‘थोरातांची कमळा’ व ‘मोहित्यांची मंजुळा’ यामधूनसुद्धा छत्रपती संभाजी राजांच्या चारित्र्यावर यथेच्छ शिंतोडे उडविले आहेत, यातून संभाजी महाराजांची भरपूर बदनामी केली आहे, त्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. पण त्याबद्दल तोंडातून चकार शब्द हे लोक काढत नाहीत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी “रामदासांशीवाय शिवाजीला कोण विचारतो?”, “शिवाजी हे जुने आदर्श झाले, आजचे आदर्श गडकरी आहेत” असे शिवरायांचा अपमान करणारे वक्तव्य केले.

भाजप प्रवक्ते सुधांशु द्विवेदी यांनी “शिवरायांनी औरंगजेबाला ५ वेळ माफी मागितली” असे अपमानास्पद वक्तव्य केले. कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्यावर शाई फेकली गेली, त्यावर तिथले मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात “ही सामान्य गोष्ट आहे.” परंतु हा सर्व छ. संभाजी आणि छ.शिवाजी महाराजांचा घोर अपमान निर्लज्जपणे पचविणारे आज त्यांना स्वराज्यरक्षक म्हंटले म्हणून संभाजी महाराजांचा अपमान झाल्याची बोंब मारत आहेत. किती हा दुटप्पीपणा. हे संतापजनक आहे.

आज जे लोक छत्रपती संभाजी राजांना संकुचित करून त्यांच्या अफाट कर्तुत्वाला मर्यादित करू पाहात आहेत तेच संभाजी महाराजांना फक्त धर्मवीर म्हणतील, परंतु ज्यांना खरंच छत्रपती संभाजी राजांच्या व्यापक कार्य-कर्तृत्वाची जाणीव आहे ते संभाजी राजांना स्वराज्यरक्षकच म्हणतील. संभाजी राजांना स्वराज्यरक्षक न म्हणता फक्त धर्मवीर म्हणणे म्हणजे एखाद्या भारतरत्नाची योग्यता असलेल्या व्यक्तीला जिल्हारत्न म्हणण्यासारखे आहे. यावरून आता आपणच ठरवायचे आहे की, छत्रपतीं संभाजी राजांना धर्मवीर म्हणावं की स्वराज्यरक्षक.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-7769886666

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here