✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.28डिसेंबर):- तालुक्यातील धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेवर दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास जिल्हा परिषद शिक्षक विठ्ठल रत्नपारखे यांनी शाळेतील छताच्या कडीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये सहकारी शिक्षक साहेबराव रामराव राठोड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.26 डिसेंबरच्या सकाळी मयत विठ्ठल रत्नपारखे हे धारासुर तांडा येथील शाळेवर ड्युटीवर जात असताना रुमना पाटी येथे त्यांचे सहकारी शिक्षक साहेबराव राठोड यांनी शिवीगाळ तसेच अरेरावीची भाषा करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
या घटनेने विठ्ठल रत्नपारखे हे अपमानित झाल्याने याचा राग मनावर घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचा मुलगा पियुष विठ्ठल रत्नपारखे यांच्या वतीने सोनपेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंचक फड हे करीत आहेत.