Home गडचिरोली माडीया गोंड जमातीच्या हितार्थ कार्यसाधक!

माडीया गोंड जमातीच्या हितार्थ कार्यसाधक!

221

(प. पू. बाबा आमटे बापलेक जन्मदिन)

मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे आनंदवन आश्रम सुरू केले. याशिवाय वन्य जीव संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले आहे. तर त्यांचे सुपुत्र प्रकाशबाबा आमटे हे त्यांचा वसा नेटाने पुढे रेटत आहेत. त्या दोघांनाही आज त्यांच्या पावन जन्मदिनी श्री एन. के. कुमार गुरूजींच्या या लेखाद्वारे सादर प्रणाम!.. संपादक.

मुरलीधर आमटे: मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील एका जमीनदार कुटुंबात दि.२६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-सहा मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स.१९३४ साली बीए व इ.स.१९३६ साली एलएलबी या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे, असे मुरलीधर बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स.१९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोग निदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

प्रकाश आमटे: प्रकाशबाबांचा जन्म दि.२६ डिसेंबर १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील मुरलीधरबाबा आमटेंनी स्थापन केलेल्या आनंदवन या आश्रमात त्यांचा जन्म झाला. प्रकाशबाबा नागपुरात जीएमसीत दाखल झाले. येथून मेडिसीनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि शहरात सराव सुरू केला. सन १९७४मध्ये एक संदेश आला. त्यांचे वडील व ते त्या आदिवासी भागात पोचले. वडिलांसोबत त्यांनी त्या आदिम जमातीची परिस्थिती स्वतः पाहिली. यामुळे माडिया गोंड जमातीच्या हितासाठी काम सुरू केले पाहिजे, असे त्यांना वाटले. म्हणून वडिलांच्या या हाकेवरून प्रकाशबाबांनी आपली नवविवाहित पत्नी डॉ.मंदाकिनीसह आपली शहरी प्रथा विसरून हेमलकसाकडे निघाले. त्यांची पत्नीदेखील पदव्युत्तर डॉक्टर होती आणि त्यावेळी सरकारी रुग्णालयात कार्यरत होती. त्याही आपली नोकरी सोडून पतीबरोबर निघून गेल्या.

आनंदवन: बाबा आमटे आनंदवन म्हणजे असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था आहे. तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. तसेच आजही काही लोक ते अंधश्रद्धेमुळे तसे मानतात. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. मुरलीधरबाबांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. म.गांधींनी ज्याला गौरविले होते, अशा अभयसाधकास त्या कुष्ठारोग्याला पाहून भीती वाटली. त्यामुळे त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण झाले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासण्यास सुरुवात केली. इ.स.१९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याचे आयुष्य हे मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असते. कुष्ठरोग्याची शुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या मुरलीधरबाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्या कार्याचा विस्तार केला.

कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्म स्तरातील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंध, अपंग व मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालय व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षास महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला जातो. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाळा, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन- नागपूर व सोमनाथ- मूल या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.

लोकबिरादरी प्रकल्प: गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे मुरलीधरबाबांनी लोक बिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी त्यांचे सुपुत्र डॉ.प्रकाशबाबा आमटे व स्नुषा डॉ.मंदाकिनी आमटे हे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही तेथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ.प्रकाशबाबा व डॉ.सौ.मंदा हे आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवीत आहेत. हे कार्य मुरलीधरबाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे. लोकबिरादरी प्रकल्प- एलबीपी हे महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि.चंद्रपूरद्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. दि.२३ डिसेंबर १९७३ रोजी माडिया गोंड जमातीच्या एकात्मिक विकासासाठी हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरु झाले. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १६० किमी अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून ६० किमी दूरवर आहे.

डॉ.प्रकाशबाबा आमटे दांपत्य मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून येथे काम करतात व परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतात.

मुरलीधरबाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कामात असूनही त्यांनी ज्वाला आणि फुले तथा उज्ज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते. एकदा रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास त्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनाच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे गांधीजींच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने ते प्रभावित झाले. दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. गांधींजींनी त्यांना अभय साधक अशी पदवी दिली होती. गांधीप्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते.

संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती, संघटन-व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा व ऊर्जा मिळाली.मुरलीधरबाबांचे दि.९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने निधन झाले. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही- डॉ.प्रकाशबाबा, डॉ.विकासबाबा व त्यांचे कुटुंबीय हे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करीत आहेत.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे मुरलीधरबाबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि डॉ.प्रकाशबाबांना वाढदिवशी त्यांच्या निरामय जीवनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री एन. के. कुमार जी. गुरूजी.(वैभवशाली भारताच्या इतिहासाचे व सत्पुरुषांच्या चरित्रांचे गाढे अभ्यासक.)मु. एकता चौक, रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.ता. जि. गडचिरोली, फक्त व्हॉ.नं. ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here