Home महाराष्ट्र गो सी गावंडे महाविद्यालयात रा.से.यो मार्फत कर्मयोगी गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन

गो सी गावंडे महाविद्यालयात रा.से.यो मार्फत कर्मयोगी गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन

98

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 21 डिसेंबर):-गो. सी. गावंडे महाविद्यालयात रा.से.यो. मार्फत कर्मयोगी गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन केले. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन व त्याचबरोबर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याचे गीत गायन करून संत गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व स्टाफ, प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

भारताच्या या पावन भूमीत अनेक थोर संत महात्मे होवून गेले. आपल्या महाराष्ट्रात खास करून विदर्भात संतांची फार मोठी परंपरा आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात देशातील जनतेचा उध्दार करण्याचे काम त्यांनी केले आहे व समाजाला प्रबोधन करून ज्ञान प्रसार केला आहे.

संत गाडगे बाबा या संतामधील महत्वाची भूमिका पार पडणारे एक आगळे वेगळे संत होऊन गेले. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले.

साधारण शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले बाबा त्यांचे मूळ नाव डेबुजी असे होते. आपल्या आचरणाने , निस्पृही, निरपेक्ष सेवेने सामान्य घरातील बाबा असामान्य संता मध्ये गणले जातात.

बाबांनी गोरगरीब, दलित,भिकारी,अनाथ यांची तहान भूक जाणली.सर्वात श्रेष्ठ असा मानवता धर्म जागविला. गरिबांच्या सेवा करण्यातच मानवी जीवन सार्थकी लागते असे त्यांना वाटे. ते खूप शिकलेले नसूनही त्यांनी अधश्रद्धा-अस्पृशता , जातीयता, याविरुद्ध प्रचार प्रसार करून जनजागृती केली.जगात सर्व समान आहेत उच्च-नीच गरीब- श्रीमंत हा भेद नाही. एकच धर्म आहे तो म्हणजे समता, एकच जागृत देवता आहे ती म्हणजे मानवता.

मनुष्याच्या अंतरात्म्यात जो ईश्वर वसलेला आहे, त्याचा साक्षात्कार होण्यासाठीच डेबुजी यांचा मानव अवतार असावा.

संत गाडगे बाबा मिळेल त्या ठिकाणी कीर्तन करीत असत. मूर्ती पूजे पेक्षा मानवरूपी ईश्वराची पूजा श्रेष्ठ आहे.

हा बाबांच्या जीवनाचा संदेश होता. वेगवेगळी उदाहरणे देऊन, अनुभव सांगून गोड आवाजात ते कीर्तन करीत असत.कीर्तनात हरीनाम न घेता समाजातील वाईट चालीरीती, रूढी परंपरा, पशु हत्या, शिक्षणाचे महत्व, चांगल्या सवयी, सर्वजनिक साफसफाई, इत्यादी विषयाचे महत्व सर्व लोकांना समजून देत असत. तसेच संत गाडगे बाबांनी शिक्षण प्रसार साठी वसतिगृहे आश्रम शाळा सुरु करून शिक्षण प्रसाराचे कामही केले.

गावोगावी फिरून ते समाजातील बिकट परिस्थितीची पाहणी करत असत.त्यांचा ईश्वरावर विश्वास होता. श्रद्धा होती.आणि मनात मात्र मानवी कल्याणाची आस होती.

तळमळ होती.त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. जे काम करायचे आहे ते मनापासून केले पाहिजे सामुहिक कार्याला हातभार लावला पाहिजे.

आंतरिक तळमळीने कामात जीव ओतला पाहिजे, काम छोटे असो व मोठे ते करायला फक्त सेवाभावाची गरज असते असे बाबा सर्वाना सांगत. नीती, सदाचार, सत्य, प्रेम, निर्भयता तथा सेवा याच्यातच बाबांचा ईश्वर सामावलेला होता.

संत गाडगे महाराजा सारख्या, निस्पृही, निस्वार्थी लोकसेवेत सर्व आयुष्य निर्पेक्षितपणे व्यतीत करणारया या विभूतीला स्मरण करून कोटी कोटी प्रणाम करूया. त्यांनी कीर्तनातून सांगितलेल्या समाज मार्गदर्शक उपदेशांचे पालन करूया. त्यांचे चरित्र, मानवता धर्म चा ,आदर्श यांचा प्रसार करून त्याप्रमाणे आचरण करूया. 21व्या शतकातही आपल्या समाजाला बाबांसारख्या मूर्तिमंत संतांच्या वचनांची, वर्तणुकीची गरज आहे. ती साधी साधी तत्वे, मूल्ये आचरणात आणल्यास समाजाचे परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही यामुळे स्वस्थ, व्यसनरहित, माणुसकी जपणारी उत्तम संस्कार असलेली पिढी निर्माण होईल.

आपण असे वागल्यास संत गाडगे बाबांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन होईल आणि तीच जनसामान्यांची खरी आदरांजली ठरेल. अशा महान संताना नतमस्तक होऊन प्रणाम अशा प्रकारचे वेगवेगळे कार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना मार्फत राबविण्यात येतात.

यापूर्वी जागतिक एडस् दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्फत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. सौ. ए. पी. मिटके, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. एस. बी. भुतडा, प्रा. डॉ. यू. एन. पाटिल, प्रा. डॉ.के.बी.शिर्से व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

या सर्व कार्यक्रमास प्राचार्य डॉ. माधवराव कदम व मॅनेजमेंटचे अध्यक्ष व सचिव यांचा यांचे मार्गदर्शन सर्वांना लाभते व अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यास प्रेरणा मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here