✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.21डिसेंबर):–शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी सदैव लढणाऱ्या शिक्षक भारतीचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे,प्राथमिक शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात २२ डिसेंबरला यशवंत स्टेडियम येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान राज्यस्तरीय एकदिवसीय धरणे आंदोलन शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांना घेऊन आयोजित केले आहे.
या धरणे आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी,वस्तीशाळा शिक्षकांना मूळ दिनांकापासून वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात यावी,सर्व पदवीधर/विषय शिक्षकांना ४३०० ग्रेड पे वेतनश्रेणी मिळावी,२००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची सातव्या वेतन आयोगात निर्माण झालेली वेतनत्रुटी दूर व्हावी,शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांची मुख्यालय राहणे संदर्भातील अट शिथिल करण्यात यावी,वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शिक्षकांना तात्काळ वेतनश्रेणी लागू करावी. तसेच नव्याने पात्र झालेल्या शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करावे,ऑनलाइन कामांसाठी तालुकास्तरावर/ केंद्र स्तरावर स्वतंत्र व्यवस्था विकसित करावी. मुख्याध्यापकांचा अशैक्षणिक कामाचा ताण कमी करावा आदी प्रमुख मागण्यांचा उहापोह करण्यात येणार आहे.
या मागण्यांसह प्राथमिक शिक्षकांच्या इतर प्रलंबित विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनात सर्वानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे यांनी केले आहे.