Home महाराष्ट्र लोकांसमोर जाण्यासाठी थोर पुरुषांचा आसरा घेताहेत-आ. प्रवीण दरेकरांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

लोकांसमोर जाण्यासाठी थोर पुरुषांचा आसरा घेताहेत-आ. प्रवीण दरेकरांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

262

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.17डिसेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज मुंबईतील ६ लोकसभा मतदार संघांमध्ये ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर आणि पर्यंटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. लोकांसमोर जाण्यासाठी महाविकास आघाडी जाणूनबुजून थोर पुरुषांचा आसरा घेत आहेत, असा हल्लाबोल दरेकर यांनी केला. तसेच तुम्ही जसे कराल त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

या माफी मांगो आंदोलनात भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह राज्याचे पर्यटन मंत्री व मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार प्रीतम मुंडे, खासदार राम सातपुते आणि मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘ज्ञानेश्वर माऊली का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’, ‘देवी देवताओ का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’, संत वारकरी का अपमान नही सहेगा हिंदुस्थान, संजय राऊत हायहाय, जनाब सेना मुर्दाबाद, अशा प्रकारचे फलक कार्यकर्त्यानी हाती घेतले होते. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, सुषमा अंधारे हायहाय, जो हमसे टकरायेगा मिट्टीमे मिल जायेगा, धिक्कार असो , धिक्कार असो अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टिकेचाही भाजपकडून निषेध करण्यात आला. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, अशा घोषणा देत दरेकर आणि लोढा यांनी पाकिस्तानचा झेंडा फाडत, बिलावल भुट्टो यांची प्रतिमा होळी करून जाळत आपला संताप व्यक्त केला.

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले कि, संजय राऊत यांनी आवाहन केले होते सरकारने रस्त्यावर उतरावे. पर्यटन मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा इकडे आले आहेत. सरकार रस्त्यावर उतरले आहे ते तुमची नौटंकी लोकांसमोर आणण्यासाठी. जे काही लोकांसमोर खोटे चित्र उभे करताय त्याविरोधात हे आंदोलन आहे. सुषमा अंधारे यांनी संतांचा अपमान करायचा, छगन भुजबळ यांनी सरस्वतीचा अपमान करायचा, जे ज्ञानी संपादक विश्वव्यापी संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही.. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी बोलताहेत बाबासाहेबांचा जन्म ९१,९२, ९३ कि ९४ साली झाला. याना लाज कशी वाटत नाही. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी ह्यांना जोड्याने मारले पाहिजे, असा संतापही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले कि, हे सरकार जनतेचे आहे. जनतेसाठी रस्त्यावर उतरले आहे. महाविकास आघाडीच्या आरोपांत काही तथ्य नाही. लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. हे सांगण्यासाठी आणि महाविकास आघाडीचा मुखवटा फाडण्यासाठी आजचे ‘माफी मांगो’ आंदोलन आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला कुणीही भीक घालत नाही. आमचे राज्याचे नेतृत्व शिंदे आणि फडणवीस हे भक्कम आहेत. महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. लोकांसमोर जाण्यासाठी जाणूनबुजून थोर पुरुषांचा आसरा घेत आहेत. थोर पुरुषांचा सन्मान आम्ही करू. तुम्ही जसे कराल त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी दरेकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here