Home महाराष्ट्र पैलवानाचे कुस्ती हेच जीवन असते : महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील

पैलवानाचे कुस्ती हेच जीवन असते : महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील

102

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.15डिसेंबर):- “कोणत्याही पैलवानाचे कुस्ती हेच जीवन असते. प्रत्येक पैलवान खेळाडूने सर्वोत्कृष्ठ कुस्ती खेळ खेळून आपल्या गावाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा. या कुस्ती खेळात डाव, चपळता आणि निर्णयक्षमता अधिक महत्वाची असते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.”असे प्रतिपादन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान मा. चंद्रहार पाटील यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे आयोजित केलेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आंतरविभागीय कुस्ती (पुरुष व महिला) स्पर्धा (2022-23) चे प्रमुख पाहुणे म्हणून कुस्ती स्पर्धांचे उदघाटन करताना बोलत होते.

पै. मा. चंद्रहार पाटील यांच्या शुभहस्ते या भव्य स्पर्धांचे उदघाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री रामभाऊ कणसे, माजी शारीरिक शिक्षक, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. प्रकाश पांडुरंग पाटील ( बापू ) हे होते.

दि. 15 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 10 वाजता वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या सांस्कृतिक हॉलमध्ये तीन दिवस चालणाऱ्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतरविभागीय (पुरुष व महिला) कुस्ती स्पर्धांचा उत्साहात प्रारंभ झाला. या कुस्ती स्पर्धामध्ये पुरुषांच्या फ्री स्टाईल, ग्रीकोरोमन तर महिलांच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा होत आहेत.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सादर केले. ते आपल्या प्रस्ताविकेत म्हणाले की, कुस्ती हा भारताचा पारंपरिक खेळ आहे. कुस्ती महाविद्यालयाला खेळाडूंची उज्ज्वल परंपरा असल्याचे सांगून महाविद्यालयाचा लौकिक गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यामुळे व सर्वोत्तम खेळाडूमुळेच वाढत असतो. महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात पार पडत असतात असेही सांगितले.”

अध्यक्षीय भाषणात मा. रामभाऊ कणसे म्हणाले की, “कराड या ऐतिहासिक शहराला खेळाडूंची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. 1952 साली पै खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळातील पाहिले ब्रॉंझ पदक मिळविले होते. देशाला विविध खेळातील खेळाडू या कराडनगरीने दिले आहेत. अशा मोठ्या उपक्रमांना श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडचे जनरल सेक्रेटरी मा. प्रकाश पाटील (बापू )नेहमीच प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करत असतात. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धक (पुरुष व महिला) खेळाडू यांच्या विविध वजन गटात या कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडत आहेत. यांचा मला आनंद आहे. सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा आहेत.”

या स्पर्धा उदघाटन कार्यक्रमावेळी मंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्था पदाधिकारी दिलीपभाऊ चव्हाण, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक, प्रा. पी. टी. गायकवाड, पुरुष कुस्ती स्पर्धा निवड समितीचे चेअरमन प्रा. बी. डी. पाटील, सदस्य व्ही. बी. पाटील डॉ. यवन ऐवळे,प्रा. सूर्यकांत शिंदे महिला कुस्ती स्पर्धा निवड समिती चेअरमन डॉ. महेंद्र कदम पाटील, निवड समिती सदस्य डॉ. विक्रमसिंह नांगरे पाटील, डॉ. सतीश माने, सातारा विभागीय क्रीडा परिषदेच्या सचिव प्रा. श्रीमती स्मिता कुंभार, तसेच दिलीप पवार, प्रा. विलास डाफळे, प्रा. ए. जे. सावंत, प्रा. दिग्विजय पाटील, उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.महेंद्र कदम-पाटील यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्रा. सौ. एस. डी. पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा संचालक प्रा. विलास डाफळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here