✒️मुखेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुखेड(दि.7डिसेंबर);-परिसरातील विद्यानिकेतन पब्लिक स्कूल , कमळेवाडी याठिकाणी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. मारोती गवलवाड यांनी भारतीय समाज व्यवस्था ही जाती , धर्म आणि वर्ण व्यवस्थेतील पाखंडी षडयंत्रावर आधारित होती. ती मानवी कल्याणाची नसून मानवतेच्या उत्थानासाठी अडसर होती म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथाच्या रुपाने आपली भूमिका अधोरेखित केली. माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटपर्यंत संघर्ष अविरतपणे चालू होता असे प्रतिपादन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सोपानराव वाघमारे , प्रमुख पाहुणे डॉ. मारोती गवलवाड , शिवसांब कल्याणकस्तुरे, प्रा. अरविंद मुळे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक सहशिक्षक चंद्रकांत गायकवाड तर आभार प्रदर्शन सौ.भडके यांनी केले . विद्यानिकेतन परिवाराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . मान्यवरांच्या हस्ते विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
स्वागत गीताने व शाल , श्रीफळ , पुष्पहारांने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला .डॉ. गवलवाड यांनी जगाच्या वेशीवर इथल्या समाजाने प्रथा , परंपरेच्या नावाखाली गरीब , बहुजन , दीन , दलितांचे शोषण केले खऱ्या अर्थाने अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच बाबासाहेब हे प्रज्ञासूर्य झाले. समाजाला दिशा देण्याकरिता स्वतःच्या सुखाची पर्वा न करता आयुष्यभर वाईट विचारांच्या लोकांच्या विरोधात लढत होते असे विचार व्यक्त केले.
तसेच कल्याणकस्तुरे व प्रा.मुळे यांच्या भाषणात संविधानाची उद्देशिका जुलमाच्या बेड्या तोडून स्वातंत्र्य , समता , बंधुता आणि न्यायाची शिकवण देणारी आहे . संविधान माणसांना माणूसपण बहाल करते. आज जगात विद्वत्ता श्रेष्ठ आहे असे विचार व्यक्त केले . अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य वाघमारे यांनी सुरेल आवाजात भीम गीतांजली बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केली. समग्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर मांडताना जात, धर्म, कुळ विद्वतेसमोर कुचकामी आहेत. म्हणून आपण खूप वाचन , मनन , चिंतन आणि तर्कशुद्ध विचार केला पाहिजे असे विचार मांडले .याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी , विद्यार्थिनी , शिक्षक बंधु – भगिनी उपस्थित होते .