भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संविधानाचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे शिल्पकार आहे.अतिशय परिश्रमाने तयार केलेलं भारतीय संविधान देशाला समर्पित करतांना त्यांच्या चहऱ्यावर आनंद ऐवजी दुःख दिसत होते.अक्षरंशः त्याच्या डोळ्यात आसव तरली यावर पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न केला की एवढे कष्ट घेवून तुम्ही संविधान तयार केले तेव्हा आज तर तुम्हाला आनंद व्हावयास हवा होता परंतु तुम्ही दुःखी का?बाबासाहेबांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली की ज्यांच्या हाती हे संविधान सुपुर्द करीत आहो ते आपले नाहीत, संविधान कितीही चांगलं असेल परंतु संविधानाची अंमलबजावणी करणारे आपले नसेल तर त्याचा आपल्या जनतेला काहीही उपयोग होणार नाही. या गोष्टीने मी आज दुःखी आहो.
त्यांची शंका अगदी खरी होत आहे आज भारताचं संविधान धोक्यात आहे.भर दिल्लीच्या दरबारात संविधान जाळल्या जात आहे ,संविधान बदलविण्याची भाषा होत आहे परत मनुस्मृतीचं राज्य लादण्याचा प्रयत्न होत आहे.
याच मनुवादी व्यवस्थेने या देशाचे मालक असलेल्या मुळ भारतीयांना शुद्र म्हणून धर्माच्या नावावर अतोनात छळले अशा विषमतावादी अविवेकी अंधश्रदेचा कळस असणाऱ्या धर्मात कधिही मरणार नाही असा बाबासाहेबांनी प्रण करुन सर्व धर्माच्या अभ्यासाअंती बुद्धाचा धम्म हा या देशाच्या अस्सल निसर्गपुजक सिंधुशिवबळीसंस्कृतीचा परिपाक असलेला, ज्या धम्माचं मुळ भारत आहे, काळाच्या ओघात आर्यआक्रमक मनुवाद्यांनी नष्ट केलेला भारतातील बौद्ध धम्म आपला अस्सल भारतीय संस्कृतीचा, कसलाही परकेपणा नसणारा, समतावादी, अहिंसावादी, बुद्धी प्रामाण्यवादी, विज्ञानवादी अशा बौद्ध धम्माचा लाखो अनुयायासह बाबासाहेबांनी स्वीकार करुन बौद्ध धम्म परत भारतात पुनर्जिवीत केला.विश्वात एकमेव उदाहरण आहे की रक्ताचा एकही थेंब न सांडता महान धार्मिक क्रांती घडवून आणनारे भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आहे.
बौद्ध धम्माचे धम्मस्थापक गौतम बुद्ध हे आपल्या शाक्य गणातील कृषी संस्कृतीचा आपला कुणबी राजा असून आपण सर्व कृषक जातीचे मराठा,कुणबी, तेली, माली…. सर्व बहुजन समाज त्यांचे वारस आहोत.परंतु शोषक मनुवाद्यांच्या कपटाला बळी पडून आपल्याच रक्ताच्या आपल्याच उद्धाराच्या आपल्याच कुणबी राजाच्या तत्वज्ञानाचा आपण स्वीकार करण्यात कमी पडलो हे आपलं भारतीयांच दुर्दैव आहे. परकिय चिन जापान सारख्यांनी आपल्या बुद्धाच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करुन प्रगती साधली.
महिला शक्ती विश्वातली सर्वात मोठी शक्ती असून मातृशक्तीच जग बदलवू शकते यावर बाबासाहेबांचा विश्वास होता. सहा हजार वर्षापुर्वी आपल्या देशात महान अशी प्राचीन मातृसत्ताक वैभवशाली निसर्गपुजक सिंधुबळीशिव संस्कृती नांदत होती. हडप्पा मोहेंजदारो उत्खननात सापडलेली नगरे याची साक्ष देते. भारताला सोन्याची चिडियाॕ म्हणत सुखी संपन्न देश असण्याच एकमेव कारण मातृसत्ताक समाजव्यवस्था. कुटुंबाची प्रमुख ही माता असायची म्हणूनच विश्वात माता हे बिरुद असलेला एकमेव देश हा भारत आहे. त्यामुळे हा देश सुखी संपन्न होता. उच्च कोटीची शिक्षण व्यवस्था या देशात होती.बाहेर देशातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत.
तक्षशिला,नालंदा…सारखी विश्वविद्यापीठे या देशात होती. या संस्कृतीचे नागवंशीय राजा शंकरापासुन बळीराजा चार्वाक गौतम बुद्ध सम्राट अशोक,छ.शिवरायफुले शाहु आंबेडकरांपर्यंत आपण सर्व बहुजन या संस्कृतीचे वारस आहोत.परंतु विदेशी आर्यांनी या महान संस्कृतीवर आक्रमण केलं. येथील विश्वविद्यापीठे नष्ट केली, मुळ भारतीयांच्या शिक्षणावर बंदी आणली,स्त्रीला गुलाम करुन अनेक बंधनात बंदिस्त केलं, पुरुषप्रधान निसर्ग विध्वंसक यज्ञ संस्कृती कर्मंकांड आपल्यावर लादली,वर्णव्यवस्था जातीव्यवस्था निर्माण केली,आपल्या महापुरुषांना संपवून आपला त्यांच्याप्रती असलेल्या अपार श्रद्धेचा फायदा घेण्यासाठी त्यांचे विदृपिकरण करुन त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात बसवून त्यांच्यावर पोथी पुराने भाकडकथा रचून आपले शोषण सुरु केले. यात स्त्री जास्त भरडल्या जात होती.या शोषणातून गुलामीतून स्त्रीला मुक्त करण्यासाठी डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम १२ ते १९ पर्यंत स्त्रियांना गुलामीच्या पाशातून सर्वबंधनातून मुक्त केले आहे.
त्यांना पुरुषांबरोबरीचे किंबहुना अधिक हक्क व अधिकार दिले. स्त्री शक्ती अमर्याद असुन तिला मुक्त केले तर क्रांती घडून येवू शकते यावर बाबासाहेबांचा विश्वास होता. या देशातील महिला अधिक सक्षम होण्यासाठी हिंदु कोडबील आणले यासाठी विरोध झाल्याने मंत्रीपदाचा राजिनामा सुद्धा दिला. हिंदु कोड बिल जशेच्या तसे लागू झाले असते तर भारतीय महिला जगातील सर्वात प्रगतशिल महिला असती यात शंका नाही.
छ.शिवाजी महाराज व बाबासाहेब हे फार मोठं घनिष्ट असं रसायन आहे.संविधान लिहीतांना शिवराज्याचा आदर्श माझ्या डोळ्यापुढे असल्याने संविधान लिहीतांना मला कसलीही अडचन आली नसल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेब आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात “जय शिवराय” लिहून करत असे. छ.शिवाजी महाराज किंवा त्यांच्या महाराण्यांबद्धल एक सुद्धा अशब्द खपवून घेतल्या जाणार नाही त्यासाठी स्वतः कोर्टात जाईल असे ते ठणकावून सांगत. बाबासाहेब असते तर आज माॕ जिजाऊ, छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज यांची बदनामी करण्याची कोणाचीही हिम्मत झाली नसती. एवढं अदम्य प्रेम छ.शिवरायांबद्धल बाबासाहेबांच्या ह्रदयात होतं. आज त्यांच्या विचाराची पेरणी करुन समाजाची प्रगती करण्याऐवजी छ.शिवजी महाराज, डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच नाव वापरुन जातीय दंगली धार्मिक तेढ निर्माण करुन राजकिय पोळ्या शेकण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केल्या जातो.असे कटकारस्थान आपण सावध राहून हाणून पाडले पाहिजे.
ओबीसी, एस सी, एस टी या आपल्या मुळ भारतीयांना शोषक वर्णव्यवस्थेने शुद्र ठरविले,त्यांना ओबीसींचा स्पर्श स्वतःची सेवा करुन घेण्यासाठी मान्य करावा लागला एवढ्यावरच ओबीसी समाज हुरळून जावून या मनुवादी व्यवस्थेची ढाल बणून या विषमतावादी व्यवस्थेला खतपाणी घालत स्वतःचा विनाश करुन घेत आहे.स्वतःला हा ओबीसी मनुवाद्यांच्या दृष्टीने शुद्रच असल्याचे मान्य करत नाही. यांनी शुद्र म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, आजही देव नैवद्य बाटवला म्हणून मराठा यादवबाईची पोलिसात तक्रार देणारी खोले ब्राम्हणीबाईचे उदाहरणे डोळ्यापुढे असूनही ओबीसी जागा होत नाही हे ओबीसीचं दुर्दैव आहे. बाबासाहेबांनी ओबीसींना “हु वेअर शुद्राज” लिहून जाग करण्याचा प्रयत्न केला.ओबीसींना आरक्षण मिळावं यासाठी सर्वात प्रथम ३४० कलम लिहिणारे बाबासाहेब जर ओबीसी स्वीकारत नसेल तर ओबीसींच भविष्य अंधकारमय आहे.
पुस्तकासाठी घर बांधणारा जगातला एकमेव विद्वान व्यक्ती कोण असेल तर डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आहे. महात्मा ज्योतिबा फुले छ.शाहु महाराज यांच्या शैक्षणिक कार्याने प्रभावित होवून शिक्षण हेच आपल्या उद्धाराच एकमेव साधन असून त्याशिवाय तरणोपाय नाही.सर्वांच्या उद्धारासाठी त्यांनी दिलेला मंत्र शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा प्रत्येकांनी अंगिकारला तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.
बाबासाहेब चुकिच्या पद्धतीने आमच्यापुढे मांडण्यात आले. बाबासाहेब जर बहुजनांपर्यंत पोहचले तर फार मोठी क्रांती होवून त्यांची ही शोषणव्यवस्था उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही याची भिती या मनुवादी व्यवस्थेला असल्याने त्यांना संकुचित करुन दलीतांचे कैवारी म्हणून विशिष्ट जातीपुरते मर्यादित केले. बहुजनांपर्यंत बाबासाहेब पोहचू नये याची दक्षता मनुवाद्यांनी पुरेपुर घेतली.बाबासाहेबांची महानता आपल्यापर्यंत येवू दिली नाही. रिझर्व बॕक संकल्पक महान अर्थतज्ञ,नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडणारे महान जलव्यवस्थापक,जागतिक दर्जाचे कायदे तज्ञ,शिक्षण तज्ञ,परराष्ट्र व्यवहार मुसद्दी असलेले बाबासाहेब आमच्यापर्यंत पोहचूच दिले नाही.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीची शासनकर्त्यांनी काटेकोर अंमलबजावणी केली असती तर आज भारत महासत्ता असता. त्यांनी लिहिलेले साहित्ये हे वैभवशाली भारताची दुरदृष्टी ठेवून निर्माण केले आहे. भारत जगावर अधिराज्य निर्माण करु शकेल एवढी ताकद त्यांच्या दूरदृष्टीत आहे.त्यांच्या स्मृतीदिनी कोटी कोटी प्रणाम💐💐💐
————-
✒️रामचंद्र सालेकर(राज्यउपाध्यक्ष,शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र)मो:-9527139876 /9405751615