६ डिसेंबर हा परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ! या देशाच्या इतिहासातील हा एक अत्यंत दु:खद दिवस आहे. या दिवशी देशातील सामान्य जनतेचा मुक्तीदाता आम्हाला पोरके करून निघून गेला. या दिवशी आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने जनता येते. या जनतेने चैत्यभूमीवर येताना,प्रत्यक्ष चैत्यभूमीवर व चैत्यभूमीवरून घरी जाताना काही पथ्ये पाळणे अगत्याचे आहे.
1.शांतता पाळणे : हा दिवस दु:खाचा असल्यामुळे सर्वांनी गांभार्याचे पालन करावे.गडबड , गोंधळ,गोंगाट,चढ्या आवाजात बोलणे,कर्कश गाणी वाजवणे हे कटाक्षाने टाळायला हवे.
2.हा दु:खाचा दिवस असल्याने या दिवशी छानछोकीचे फॅशनेबल कपडे वापरू नयेत. साधे कपडे वापरावेत. तसेच रंगीबेरंगी टोप्या घालणे,शिट्ट्या वाजवणे,अर्वाच्य घोषणा देणे असे सर्व वाईट प्रकार आपण टाळायला हवेत.
3.या दिवशी मद्यपान,बिडी – सिगारेट,गुटखा – तंबाखू असे कोणतेही व्यसन करू नये.
4.या दिवशी प्रवास करताना सर्व सहप्रवाशांशी सौजन्याने वागावे. आपले आरक्षण असल्यास ते वापरताना शक्य असल्यास एखाद्या गरजू प्रवाशास सहकार्य करावे.
5.तुम्ही समूहाने प्रवास करीत असाल तर घोषणाबाजी टाळावी. आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होणार नाही,याची आवर्जून काळजी घ्यावी.
6.या दिवशी चैत्यभूमीवर आल्यावर गायन पार्ट्या,सीडी विक्रेते,फेरीवाले यांच्याकडून खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देऊ नका.तुम्हाला जी काही खरेदी करायची आहे त्यासाठी वर्षाचे 364 दिवस मोकळे आहेत.
7.सर्व विक्रेत्यांना विनंती आहे की,हा दिवस दु:खाचा आहे.म्हणून या दिवसाच्या गांभीर्याला गालबोट लागेल अशा वस्तूंची चैत्यभूमी परिसरात तात्पुरते स्टॅाल मांडून कृपया विक्री करू नये.अशी विक्री करण्यासाठी तुम्हाला वर्षाचे 364 दिवस मोकळे आहेत.
8.आपण आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करायला आलो आहोत, हे लक्षात घेऊन या दिवशी समुद्रात बोटीने फेरफटका मारायला जाऊ नका.
9.तुम्ही ज्या पक्ष – संघटनांचे कार्यकर्ते असाल त्या पक्ष – संघटनांना देखील हा दिवस गांभीर्याने पाळायला सांगा.तसेच प्रवास करताना आपण ज्यांच्याशी संबंधित आहोत अशा पक्ष- संघटनांची स्तुती करताना इतरांवर टीका- टिप्पणी करू नका. शक्यतो सार्वजनिक ठिकाणी पक्षीय – संघटनात्मक चर्चा टाळावी.
10.हा दिवस दु:खाचा असल्याने या दिवशी शक्यतो उपोसथ पाळावे. ज्यांना उपोसथ पाळणे शक्य नाही त्यांनी साधे भोजन घ्यावे. चैत्यभूमी परिसरात भोजन घेताना शिस्तबद्ध रांग लावावी, रेटारेटी करू नये. जेवढी भूक आहे तेवढेच भोजन घ्यावे.कृपया अन्नाची नासधूस करू नये.
11.महात्मा फुले यांची जयंती (11एप्रिल),डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (14 एप्रिल ते पावसाळा आरंभ), तथागत सम्यक संबुद्ध यांची जयंती (वैशाखी पौर्णिमा ) शाहू राजे यांची जयंती (26 जून) वर्षावास, सम्राट अशोक विजयादशमी (दसरा), महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर), भीमा कोरेगाव विजय दिन (1 जानेवारी) हे आपले ‘जनसंपर्क दिवस’ आहेत. या दिवशी तुम्ही आपली बौद्ध संस्कृती किती उच्च दर्जाची आहे, हे आपल्या आचरणातून सर्व भारतीयांना दाखवायचे आहे. ब्राह्मणी धर्मातील धांगडधिंगाण्यास सामान्य जनता विटली आहे.अशा धांगडधिंगाण्यातून समाजविघातक तत्त्वांना चालना मिळते. तसाच धांगड धिंगाणा तुम्हीही घातला तर आपण ब्राह्मणी संस्कृतीला ‘पर्याय’ देऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून तुमचा ‘जनसंपर्क’ हा सामान्य जनतेला आश्वासक व प्रेरणादायी वाटला पाहिजे. यांसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेणे, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.
12.संविधान निर्मात्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून ‘कोणी कसेही वागो,आम्ही मात्र संविधानाचे पालन करून आदर्श नागरिक म्हणून जगणार व या देशाला नवी दिशा देणार’ असा दृढनिश्चय करू या ! असे सुषमा कदम ८६९१०९००००,संतोष जाधव ९८१९१५६४५३ यांनी शांत चैत्यभूमी अभियान मुंबईच्या वतीने जाहीर आवाहन केले आहे.