आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल वर्ष 1994 चे जेव्हा ऐश्वर्या रायला ‘जगतसुंदरी’ हे टायटल मिळाले होते. मला तेव्हाचे वर्ष आठवत नाही; कारण मी तेव्हा अवघा सहा वर्षांचा होतो. पण मला वर्ष 2000 आठवते, जेव्हा प्रियंका चोप्रालापण ‘जगतसुंदरी’ ने गौरविले गेले होते. कारण तेव्हा मी 12 वर्षांचा होतो. त्यामुळे मला हे बऱ्यापैकी आठवते. आम्हाला हिंदी विषय शिकवायला असलेले ‘हणेगावे’ सर वारंवार सांगायचे की प्रियंका चोप्रा ‘मिस वर्ल्ड’ झाली. सरांना त्या टायटलचे व तिच्या क्राऊनचे जेवढे महत्त्व होते, तेवढे आम्हाला नक्कीच नव्हते. पण आम्ही सातव्या वर्गात असूनही सर्व मित्रवर्ग वयाच्या हिशोबाने खूपच पुढे होतो (आजच्या भाषेत अडव्हान्स). खेडेगावातले असल्यामुळे आशा काही प्रतियोगीता होत असतील याचे ज्ञान आम्हाला नव्हते. पण आमच्या स्मार्ट दिसणाऱ्या ‘हणेगावे सर’लाच प्रियंका चोप्रा खूप आवडली असेल, हे आम्ही आपसात बोलून त्यांची खुशी आम्हीही साजरी करायचो.
त्यांचा उद्देश ते सांगण्याचा इतकाच होता, की अठराव्या वर्षी ती ‘विश्वसुंदरी’ झाली. तिच्याकडून प्रेरणा घ्या. त्या वयात ‘प्रेरणा’ नावाचा शब्दच नवीन होता. त्यामुळे प्रेरणा वैगरे न घेता हसून-खिदळून, मजाक-मस्ती करून मोकळे झालो. पुढे मोठे झालो तसे ही प्रतियोगीता दरवर्षीच होते, हे कळाले. नन्तर हेही कळले की 1994 ते 2000 च्या दरम्यान 1997 ला ‘डायना हेडन’ व 1999 ला ‘युक्ता मुखी’ या भारतीय नारींनी ‘विश्वसुंदरी’ हा किताब जिंकला होता. त्यानंतर थेट 18 वर्षांनी 2017 ला ‘मानुषी छिल्लर’ या भारतीय मुलीने हा किताब पुन्हा एकदा जिंकला. तेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना मानुषी छिल्लर ही ‘विश्वसुंदरी’ झाली, हे सांगितले. त्यांच्यासाठीही ती गोष्ट नवखी होती तसेच कमी उत्साहाचीही होती, मनोरंजक तर नव्हतीच. पुढे आणखी अभ्यास केल्यावर हेही लक्षात आले की, यात मिस युनिव्हर्स, मिस इंटरनॅशनल, मिस अर्थ आशाही प्रतियोगीता होतात. ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून सुश्मिता सेन व लारा दत्ता या भारतीय महिलांनी मान पटकावला आहे. ‘मिस इंडिया’ या भारतीय सौंदर्यवतींच्या स्पर्धेत 1984 (तशी ही स्पर्धा 1947 पासूनच आहे) लाच ‘जुही चावला’ने ब्यूटी क्राऊन जिंकला होता, हे नव्यानेच कळाले.
मग त्यात मधू सप्रे, व नम्रता शिरोडकर या महाराष्ट्रीन महिलांचे नाव पण विजेती म्हणून होतेच. हा सौंदर्यवतींच्या स्पर्धेचा मेळा सांगावा तितका कमीच आहे. मुळात हे सर्व मी का सांगतोय? कारण लेखाचे शीर्षक ‘सौंदर्य’ आहे. सौंदर्य असल्यामुळे ‘सौंदर्यवतींवर’ बोलावे लागेलच. त्यामुळे आधी भारतीय सौंदर्यवती आपल्यासमोर गिनवल्या. जगात असतील अनेक, पण आपण भारतीयांवरच भर देऊ. कारण आपल्याला ‘सौंदर्य’ कळलेच नाही. ज्यांना कळले त्यांचे कोणी ऐकतच नाही. कारण समजूतदार लोकांपेक्षा, नासमजांची संख्या अधिक आहे; हीच शोकांतिका आहे. असो!
आमच्या दृष्टीने ‘सौंदर्य’ म्हणजे दिसायला देखणे असणे. दिसायला देखणे असणे हे जर सौंदर्य असते, तर ‘माझ्या मुलाने ‘सुंदर’ भाषण केले.’; ‘त्यांचे काम फारच सुंदर आहे.’ अशी वाक्य आपल्या कानी व तोंडी आलीच नसती. कारण आपण उपरोक्त वाक्य बोलताना त्या व्यक्तीचे वर्तन व काम सुंदर म्हणजे चांगले म्हणतो थोडक्यात. तो दिसायला सुंदर की कमी सुंदर हे पाहून ठरवत नाही. कारण जगतसुंदरी असो की मिस इंडिया इथे काय फक्त तोंड पाहून डोक्यावर क्राऊन चढविला जात नाही. कधी या स्पर्धेचे इंडिकेटर्स गुगल करून पहा. सौंदर्यवती व्हायला कुठले निकष लागतात आणि कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात हे कळेल. मग आपले ज्ञान किती कोरडे अन बिनबुडाचे होते हेही कळेल. सुंदरी व्हायचे म्हणजे त्यांच्यातील खेळ, मनोरंजन, सोशल मीडियाचे ज्ञान, निर्भीडपणा, समयसूचकता, रॅम्प वॉक, व्यक्तिमत्त्व (आंतरिक व बाह्य) हे सर्वच उत्तुंग असावे लागते. आपण बऱ्याच मिस वर्ल्ड किंवा मिस इंडिया झालेल्या भारतीय नारी चित्रपटसृष्टीत आलेल्या पाहिल्या असतील, पण एकवेळ चित्रपटसृष्टीत येणे सोपे आहे; पण हे ‘पॅजेंट’ जिंकणे सोपे नाही. कारण त्यातल्या कसोटीत खरे उतरणे वरवरचे दिसते ते भौतिक सौंदर्य पहाणाऱ्यांना कळणार नाही.
‘मी सुंदर आहे!’ म्हटले की झाले का सर्व? त्यात तुमचे कळेल का सर्व व्यक्तिमत्त्व? मुळात तुम्ही सुंदरतेची परिभाषा काय करता, यावर तुमचे खरे सौंदर्य कळते. उगाच नट्टापट्टा करून पांढऱ्या पावडरने तोंड घासल्याने सौंदर्य न वाढते न झळकते. हं! तुमची सौंदर्याची परिभाषाचं जर निव्वळ दिसणे असेल, तर आहात की मग तुम्ही ‘सुंदर’, तुमच्यापुरते! एकमेकांना कमी लेखण्यासाठी अनेक बाबी आपल्याकडे असताना सध्या या ‘दिखाऊ सौंदर्याची’ पण वरचेवर भर पडत आहे. ती बुटकीच आहे, तिचे केसचं पातळ आहेत, डोळे म्हणजे भिंतीला भोकंच, नकट्या नाकाची, काळी, सावळी, वैगरे. असे बरेच टोमणे माघारी मारून दुसऱ्याला कमी लेखून त्या तुलनेत मी ‘सुंदर’ आहे म्हणून तितक्यापुरता स्वतःचा मोठेपणा करून घेण्यात स्त्रिया खूप पुढे आहेत. बरं, ती आहे नकटी. पण तुला जेवढे नाक नाही त्याहून सरळ तिचे काम सरस आहे. असेल ती काळी, पण कोणासोबत लबाडी करत नाही न ती कधी, खुजी असली म्हणून काय झालं वाडवडिलांच्या काळजात तीच वास्तव्य आहे; इतकी ती गुणी आहे.
तू कमी लेखणारी जरी असशील गोरी, उंचपुरी, नयननक्ष निटास असणारी; पण जर सासू सासऱ्यांना हीन वागणूक देऊन आपले कुटुंब जोडण्यात सक्षम नसशील तर ते सौंदर्य कोणतं हे मनातल्या आरशातही पहा की एकदा. स्त्री म्हणून तिने हे का करावं? या मताचा तर मी आहेच. पण याउलट जर ती तिच्या कामात कामचुकार, लोकांची टिंगलटवाळी करण्यात पटाईत आणि घेतलेले उसने पैसे न देण्यात महाठग असेल तर ती माणूस म्हणून तर शून्यच की! गोरा माणूस जर आतूनही गोरा असेल तर स्वागत करता येईल की त्या गोरेपणाचे, पण आत साचलेला काळेपणा आणखी गर्दच होणार असेल तर ते सौंदर्य नव्हे! 2019 ची एक मिस वर्ल्ड आहे; ‘टोनी अन सिंग’! ती ‘जमैका’ची आहे. तिचे नाव गुगल करा; तुमच्या सौंदर्याच्या परिभाषेत ती कुठेच बसत नाही. ना नाक आहे, ना नीट डोळे आणि महत्वाचा रंग! तरीही ती ‘विश्वसुंदरी’ आहे. मग तिला निवडणारे परीक्षक वेडे आहेत का? की त्यांना सौंदर्याची जाणच नाही. बर ते वेडे म्हणावेत तर त्यापूर्वीही ती ‘मिस जमैका’ पण झाली. मग त्यांचे ज्ञान पण तोकडेच म्हणावे का? अर्थात एक गोष्ट नक्की आहे; जी ‘टोनी अन सिंग’ ला सुंदरी म्हणण्यास पुरेसे आहे; तिचे आतले टॅलेंट! जे तिला भरभरून मिळाले; नव्हे तिने ते कमावले; म्हणून ती ‘सुंदरी’ म्हणून ती ‘सुंदर’ आहे.
भारतीय लोकं व भारतीय स्त्रियांच्या सौंदर्य व त्यावरील मानसिकतेविषयी पण बोलतो. आता ‘लारा दत्ता’चेच उदाहरण घ्या. ती दिसायला कशी आहे? असे दहा जणांना विचारा. काय उत्तर येईल ते तुम्हीच सांगा. उत्तर तर नकारात्मकच येईल. ती 2000 साली ‘मिस युनिव्हर्स’ झाली होती, हे सांगायला विसरू नका. आपण असे आहोत की त्या मिस युनिव्हर्स स्पर्धेलाच कमी लेखू, इतके लारा दत्ताचे सौंदर्य तुम्हाला खटकेल. मी पण बऱ्याच जणांना विचारले की लारा दत्ता मिस युनिव्हर्स कशी झाली असेल बरं! कारण माझ्या सुंदरतेच्या कॅमेऱ्यात ती नकटी व सावळी होती. कारण मी होतो तेव्हा अवघ्या बारा वर्षांचा; किती असणार होती माझी समज! नासमजच म्हणू की! पण समजूतदार असणाऱ्यांचे डोळे फक्त पहातातच वाटते; दृष्टीच्या पलीकडचे विश्लेषण कोणीच करत नाही. पण ह्याच लारा दत्ताने ‘स्विमिंग’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून मिस युनिव्हर्सला गवसणी घातली होती, म्हणजे ती गुणवान होतीच की! अंगातले गुण म्हणजे सौंदर्य हे ध्यानात आले तर पहा!
मुळात या दडलेल्या व विसरलेल्या सौंदर्यावर मी का बोलतोय? यावर बोलण्याचा व लोकांच्या मानसिकतेवर कटाक्ष करण्याचा माझा हेतू काय? सांगतो. दिखाऊ सौंदर्याला, ज्याला आपण ‘सुंदरता’ म्हणतो त्याला अनावश्यक दिलेले महत्त्व यामुळे लोकांच्या आयुष्यावर होत असलेला परिणाम आणि तो परिणाम साधक नसून बऱ्याच जणांच्या बाबतीत तो बाधक होत आहे. यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इतरांची ढवळाढवळ होऊन ते वैयक्तिक आयुष्य बरबादीच्या कगारवर जाऊन पोहोचले आहे. त्यावर परिणाम होऊ नये किंवा सौंदर्य म्हणजे काय आणि आपल्यातील सुंदरता नेमकी काय असते याची ओळख आपल्याला व्हावी आणि जे नेमके आणि खरे आहे हे आपल्यासमोर प्रस्तुत व्हावे यासाठी या लेखाचा लेखाजोखा मी आपल्यासमोर मांडला आहे. तो का मांडला आहे? याची काही उदाहरणे मला आपल्याला द्यावी लागतील. जसे की बऱ्याच स्त्रियांना आपण सुंदर आहोत असे वाटते. त्या तुलनेत इतर स्त्रिया सुंदर नाहीत, अशा त्या सांगतात; कारण त्यांनी त्यांच्या सुंदरतेची वेगळीच व्याख्या केली आहे. जसे की मी गोरी आहे; मी उंच आहे; मी सडपातळ आहे; माझे केस लांब आहेत; माझे डोळे मोठे आहेत; माझे नाक नीट आहे; एकंदरीत माझे सर्व राहणीमान चांगले आहे; त्यामुळे मी सुंदर आहे. मग माझे अंतरिक व्यक्तिमत्व कसे का असेन, माझा लोकांसोबत व्यवहार कसा का असेना, मी खोटारडी का असेना, मी लोकांची चुगली का करत असेना, मी दिसायला बाहेरून सुंदर, माझी भौतिक रचना चांगली, म्हणजे मी सुंदर! आणि बाकीच्यांच्या बाबतीत त्या सुंदर नाहीत असे विधान त्यांवर लादून स्वतःचे चित्र मोठे करणे ही सुंदरता म्हणता येणार नाही. कारण एखादी स्त्री दिसायला सावळी असो की काळी असो, ती खुजी असो की जाड असो,पण तिच्यामधले अंतरिक व्यक्तिमत्व हे जर इतरांची दिसणारी उंची खुजी करत असतील तर ते तिचे खरे सौंदर्य म्हणावे लागेल; कारण जर ती तिच्या नवऱ्याबाबतीत, तिच्या मुलांबाबत, तिच्या सासू-सासऱ्याबाबतीत, तिच्या आई-वडिलांबाबतीत आपले कर्तव्य योग्यरित्या बजावत असेल आणि स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधून स्वतःचीही उंची वाढवत असेल तर तिचे बाहेरचे व्यक्तिमत्व तिच्या आंतरिक व्यक्तीमत्त्वाहून खुजे म्हणावे लागेल.
✒️लेखक:- अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड)मो:-8806721206