✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.17नोव्हेंबर):-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अन्तर्गत फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद येथे महिला विकास समिती( लिंगसमभाव) द्वारे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसदच्या इंग्रजी विषयाच्या विभागप्रमुख प्रा.डॉ. अंजली पांडे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. लिंगसमभाव या विषयावर बोलताना त्यांनी लिंगसमभावाच्या मानवी कक्षेत केवळ ‘ स्त्री – पुरुष ‘ यांचा विचार न करता ‘ स्त्री – पुरुष – तृतियपंथ ‘ यांचा विचार करावा लागेल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. मुळातच आपली पुरुषप्रधान संस्कृती लिंगविषमतेवर आधारलेली दिसते. मात्र विद्यार्थ्यानी या देशाचे सजग नागरिक बनून लिंगसमभाव या विषयावर विद्यार्थ्यांनी अंतर्मुख होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
लिंग विषमतेची विविध सामाजिक उदाहरणे देत सुबोध पातळीवर त्यांनी आपल्या विषयाची मांडणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती समन्वयक प्रा. डॉ. अनिता कांबळे यांनी नेमकेपणाने मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. बी. पाटील यांनी आपल्या समारोपिय भाषणात ” मुळात विचार केला तर फिमेल मध्येच मेल आहे. स्त्रियांमुळेच पुरुषांचे अस्तित्व आहे. पुरुषांनी ‘ पुरुष ‘ या कक्षेतून बाहेर येत लिंगसमभाव विचार रुजविण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे, असा महत्त्वाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी जगताप ( मराठी, पदव्युत्तर भाग २ ) व स्वप्नील गोरे ( पदवी, भाग ३ ) यांनी तर आभार विशाल लोंढे ( बी.एस्सी.१ ) यांनी मांडले. कार्यक्रमाला उपस्थित प्रा. डॉ. प्रियंका गायकवाड, प्रा. विजय राठोड, प्रा. संतोष चव्हाण, प्रा. अनुरंजन टेकाडे असे सर्व समिती सदस्य होते. विद्यार्थ्यांच्या भरगच्च उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.