
प्रतिनिधी — पी डी पाटील
धरणगांव /एरंडोल — तालुक्यातील जवखेडे खु.गावात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या गुरू – शिष्य जयंतीनिमित्त लक्ष्मणराव पाटील यांचे वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महापुरुषांचा जयंतीउत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरा करावा या उद्देशाने गावचे सरपंच गोपाल देवरे व त्यांच्या मित्र परिवाराने प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त गावात व्याख्यान आयोजित करायचे ठरवले. या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल महात्मा फुले व १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या संयुक्तिक जयंतीच्या निमित्ताने व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात का प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अतिथींच्या औपचारिक स्वागत झाल्यानंतर मुख्य व्याख्यानाला सुरवात झाली. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, शैक्षणिक व सामाजिक कार्य तसेच समतेच्या विचारांनी प्रेरित होऊन देशातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी भारतीय संविधानाचे योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला जवखेडे खु. गावचे जावई सेवानिवृत्त शिक्षक नेतकर सर (पारोळा) यांच्यासह इंदुताई नेटकर, जया गोपाल देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गोपाल योगराज देवरे, विलास भिवसन पवार, गणेश दिलीप देवरे, संदीप राजाराम धनगर, भगवान वामन पवार, वाल्मिकी मंगा सोनवणे. माहरू गोविदा पाटील, उमेश कैलास पाटील सुधाकर यांनी केले. कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, गावातील युवक, ग्रामस्थ व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपसरपंच विलास पवार यांनी केले.
