Home लेख ध्येयवादी अनुयायी बनून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतीविचारांचा भारत घडवू या!

ध्येयवादी अनुयायी बनून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतीविचारांचा भारत घडवू या!

47

 

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरातील अनेक देशात, भारतातील अनेक राज्यात, गावागावात आनंदाने साजरी केली जाते. विविध प्रकारे ज्यात पुस्तके भेट देणे, प्रबोधन व्याख्याने, गीतगायन,चित्र- शिल्प कलाकारी, मिरवणूक, अशा प्रकारे उत्सव साजरा होत आहेच!
अखिल मानव जातीचे मुक्तीदाते, मार्गदर्शक सर्वांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

*जन्म आणि शिक्षण* :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी, आईचे नाव भिमाबाई होते. रामजी हे सैन्यात सुभेदार होते. बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण सातारा येथे पूर्ण केले. त्यानंतर ते मुंबई येथे स्थायिक झाले. मुंबईत असतानाच १९०६ साली रमाबाई यांच्या सोबत साध्या पद्धतीने भायखळा येथे बाबासाहेबांचा विवाह झाला. १९०७ ला मंट्रिक परीक्षा पास झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा एस. के. बोले यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला, सत्कारात केळुसकर गुरुजींनी स्वलिखित ‘भगवान बुद्धांचे चरित्र हे. पुस्तक त्यांना भेट दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१२ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषया मध्ये बी.ए. पदवी मिळवली. पर्शियन व इंग्रजी या विषयातही मुंबई विद्यापीठाची बी. ए.पदवी मिळवली. याच धावपळीत २ फेब्रुवारी १९१३ रोजी वडील रामजी आंबेडकर यांचे निधन झाले. त्यामुळे बाबासाहेबांना एक मोठा धक्का बसला कसे सावरणार यातून ! कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आली. उच्चशिक्षण घेण्याची ओढ निर्माण झाली होती.
उच्चशिक्षण घेण्यासाठी मार्ग निघाला, केळुस्कर गुरुजी यांच्या मदती ने बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी १९१३ ते १९१६ तीन वर्षांची शिष्यवृत्ती मंजूर केली. ज्यामुळे जून १९१५ साली कोलंबिया विद्यापीठाची एम.ए.ची पदवी मिळवली. १९१७ ला पीएच.डी. करिता ‘कास्ट इन इंडिया देयर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट’ हा शोधनिबंध लिहिला. १९२२ ला ग्रेज इन मधून बॅरिस्टर ही पदवी प्रचंड अभ्यास करून मिळवली. १९२३ ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून डी.एस.सी. अवॉर्ड झाली. अशा पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.प्रचंड अभ्यास करून उच्चविद्या संपादन करत राहिले.जागतिक विद्वान म्हणून त्यांचे स्थान आहे.
आपणही त्यांच्या या उच्चशिक्षणासाठी केलेला संघर्ष समजून घेवून उच्चशिक्षित होवूया.डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांना उच्चशिक्षित होणे आवश्यक आहे, त्याचे महत्व समजले होते म्हणून त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. जिद्द आणि प्रयत्न सतत करीत राहिले. उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्ग निघाला, केळुसकर गुरुजी यांच्या मदती ने बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनी १९१३ ते १९१६ तीन वर्षांची शिष्यवृत्ती मंजूर केली. ज्यामुळे जून १९१५ साली कोलंबिया विद्यापीठाची एम.ए.ची पदवी मिळवली. १९१७ ला पीएच.डी. करिना ‘कास्ट इन इंडिया देयर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट’ हा शोधनिबंध लिहिला. १९२२ ला ग्रेज इन मधून बॅरिस्टर ही पदवी प्रचंड अभ्यास करुन मिळवली, १९२३ ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून डी.एस.सी. अवॉर्ड झाली, अशा पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.प्रचंड अभ्यास करून उच्चविद्या संपादन करत राहिले. जागतिक विद्वान म्हणून त्यांचे स्थान आहे.
नोकरी न करता सामाजिक कार्य,संघर्ष :-
उच्चशिक्षण घेऊन भारतात परतल्यावर मोठ्या पगाराची नोकरी देणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था तयार होत्या. प्राध्यापक, प्राचार्य, न्यायाधीश म्हणून नोक-्या वाट पाहत होत्या. परंतु आंबेडकरांनी नोकरी न करता बहुजन समाजातील अन्यायग्रस्त, शोषित, वंचित, दुर्बल, शुद्र अतिशुद्र यांच्या संवेदना जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरविले. याचाच एक भाग म्हणून २० जुलै १९२४ रोजी परेल मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. चेअरमन म्हणून डॉ. सर चिमणलाल सेटलवाड, तर सचिव म्हणून सीत राम शिवतरकर, तर कार्यकारी अध्यक्ष डॉ. आंबेडकर हे होते Educate. Oraganise and agitate अर्थात शिक्षित बना, संघटीत बना आणि संघर्ष
करा हा मूलमंत्र ठरविला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात ही १९१६ पालवनकर बाळू या क्रिकेटपटूच्या सत्काराच्या निमित्ताने झाली, पी. बाळू हा त्या काळातील अतिशय उत्तम असा क्रिकेटपटू होता. परंत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या चर्मकार जातीतील असल्याने मनुवादी व्यवस्थेने त्याचे नाव कधीच पुढे येऊ दिल नाही. आजही अनेकांना ते माहीत नाहीच.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१६ ते १९५६ या चाळीस वर्षाच्या कालखंडात अनेक संघर्ष, आंदोलने केली ज्यांचे लिखित रेकॉर्ड उपलब्ध आहे. ज्यामुळे स्त्रियांसह सर्व बहुजन बांधवाना सन्मानाने माणूस म्हणून जीवन जगूर प्रगतीच्या शिखरावर जाता आले. यासाठी महात्मा फुले आणि डॉ. बाबासा आंबेडकर यांचा १०८ वर्षाचा प्रचंड संघर्ष, त्याग कारणीभूत आहे. बाबासाहे़ आंबेडकरांची चार मुले, पत्नी रमाई ही त्यांना वेळेवर औषधी, उपचार आणि कुटुंबाला वेळ न दिल्यामुळे मृत्यू पावली. आमचा संसार सुखी समाधानी व्हावा म्हणून त्यांच्या संसाराची राख झाली, हे आम्ही आज ध्यानात घेतले पाहिजे.
डॉ आंबेडकर व शेतकरी, कामगार,श्रमकरी,नोकरदार:-
कोकणामध्ये खोती आंदोलन चालू होते. ज्यामध्ये नारायण नागू पाटील मार्गदर्शन करत होते. या आंदोलनाला बळकटी ही त्या काळात बाबासाहेबांच्या १९१७ ला रिसर्च पेपरमध्ये लिहिलेल्या लहान शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय’ यावरून मिळाली. याच बरोबर नारायण नागू पाटील म्हणजेच आजचे जयंत पाटील यांचे आजोबा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांचा नेता म्हणून जाहीर केले. ज्यामुळे डॉ. आंबेडकरांनी मुंबईहन ६०० किलोमीटरचा जहाज – बैलगाडी – पायी प्रवास करून शेतकऱ्यांचे आंदोलन पढे चालविले. चरीचा संप म्हणजे देशातील शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला ज्यात २५ गावातील शेतकरी शेतात गेले नाहीत. उपासमार होऊ नये म्हणून त्यांना मुंबई येथून बाबासाहेब आंबेडकरांनी मदत मिळवून दिली.
१९२८ साली मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये अर्थसंकल्पावर भाषण करताना आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी योजना मांडल्या. ६५ बर्षावरील शेतकरी पुरुषास व ६० वर्षावरील शेतकरी महिला यांना पेन्शन देण्यात यावे. सन १९३८ मध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत काढला ज्यामध्ये २५ हजार शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनाचा परिणाम दोन लाख हेक्टर जमीन ही कुळाच्या नावावर झाली. हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाचे फलित होय. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा प्रधानमंत्री हा शेतकऱ्यांचा मुलगा असावा आणि प्रशासनातील अधिकारीही शेतकऱ्यांची मुले असावीत असा विचार मांडला. ज्यावेळी चिपळूणकर यांनी शेतसारा वाढवावा अशी केसरी वर्तमानपत्राद्वारे लेख लिहून मागणी केली त्यावेळी डॉ. आंबेडकर यांनी
त्यास विरोध केला आणि त्यापेक्षा इन्कम टैक्स वाढवावा अशी चर्चा केली. शेतकरी आणि आणि शेतीच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये शेतकरी आयोग, हमीभाव यासह अनेक तरतुदी केलेल्या आहेत. त्या इथल्या मनुवादी व्यवस्थेने समजू दिल्या नाहीत आणि आम्हीही त्या घरात संविधान नसल्याने समजून घेतल्या नाहीत.
*कष्टकरी,श्रमकरी कामगारांचे डॉ.आंबेडकर* :-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, कर्तृत्व, बुद्धिमत्ता, संघटन याची जाणीव इंग्रजांना निश्चितपणे झालेली होती. म्हणून जुलै १९४२ साली केंद्रीय मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांना कॅबिनेट मंत्री बनवलं, इरिगेशन मिनिस्टर म्हणून काम करत असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड डोळ्यासमोर ठेवला आणि भाकरा नांगल धरण, दामोदरखोरे प्रकल्प, महानदीवर प्रकल्प, कोसी गंगा ब्रह्मपुत्रा यावर प्रकल्प उभारले. जलविद्युत निर्मिती, जलवाहतूक, पर्यटन स्थळांचा विकास, छोटे छोटे धरण आणि जल आयोगाची निर्मिती केली. पाण्याबरोबरच शेतकऱ्यांना, गरिबांना वीज स्वस्तात उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली, कामगार मंत्री म्हणून निर्णय घेत असताना ते स्वतः कामगारांच्या चाळीत राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या प्रत्र, समस्या माहित होत्या. कामगारांच्या संघटना व व्यवस्थापन यांच्यामध्ये चर्चा घडवून आणल्या. व्यवस्थापनात कामगारांचे प्रतिनिधी असावेत अशी व्यवस्था केली. आसाममध्ये चहामळा कामगारांच्या भेटी घेतल्या. पश्चिम बंगालमध्ये कोळसा खाण कामगारांच्या भेटी घेतल्या. एक खाणकामगार म्हणून खोलखाणीतून वर आलेल्या एका गरोदर महिलेला प्रश्न विचारून चर्चा केली. त्याच ठिकाणी आदेश काढून महिला आणि पुरुष समान मजुरी, कामाचे तास १२ वरून ८ तास केले. प्रसूती रजाही पगारी करण्यात आली.
डॉ आंबेडकर यांचे स्त्रीविषयक कार्य:-
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ‘भिमाई’ असे सुद्धा म्हटले जाते. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना अतिशय हीन, नीच लेखले त्या मनुस्मृतिचे त्यांनी दहन केले. पर्यायी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केली आहे. भारतीय संविधानातील कलम १३ मनुस्मृति अवैध ठरवते..म्हणजेच तिचे सर्व कायदे,नियम आता अवैध असतील. ते कालबाह्य ठरले आहेत. कलम १५ भेदभाव नष्टता, म्हणजेच व्यक्ती -व्यक्ती यात जात,धर्म,लिंग,भाषा किंवा कशावरून फरक भेद करता येणार नाही. कलम १६ नोकरीत आरक्षण, कलम १९ भाषण स्वातंत्र्य,यास प्रत्येकाला आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे. कलम २५ धर्म स्वातंत्र्य यासह अनेक तरतुदी स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय यावर आधारित संविधानात समाविष्ट केलेल्या आहेत.
शेड्युल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनात डॉ बाबासाहेब आंबेडकर सहभागी होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत येताना एका स्त्रीला सोबत आणले पाहिजेच असा आदेश देतात..ज्यात आई / बहीण/ पत्नी यांना सोबत घेऊन या असे आवाहन करतात. यावेळी ५० हजार पुरुष आणि पंचवीस हजार स्त्रिया सहभागी होत्या.
या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक एका सत्रात स्त्रियांनी कपडे कोणते कसे वापरावे, केस कसे असावे, कुटुंबनियोजन बाबत काय करावे, चुकीच्या गोष्टीसाठी नकार देण्यास शिकणे याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करतात. सोबत मताचा अधिकार हा स्त्रियांना ही दिला,ज्याचे मूल्य समान आहे. *हिंदू स्त्रियांची अवनती* या संशोधन पेपरमध्ये तसेच हिंदूकोड बीलमाध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या प्रगतीसाठी उपाययोजना सांगितल्या आहेत. परंतु त्यावेळेपासून आजपर्यंत ते बील अंमल केले नाही. जगाच्या पाठीवर एकमेव नेतृत्व आहे, ज्यांनी स्त्रियांच्या साठीच्या बिलासाठी सतत पाठपुरावा केला,तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत संघर्ष ही झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरू मंत्रिमंडळातून कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी हिंदू कोड बील लागू करीत नाहीत, हे एक कारण होते. ज्या महिलांच्या इतका संघर्ष केला त्या महिलांना विनंती की किमान ते बील महिलांनी वाचावे, पहावे, समजून घ्यावे.जर हिंदू कोड बील त्यांनी वाचले तर निश्चितच त्या बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या माता पित्यापेक्षा यापेक्षाही मोठं समजतील असं वाटतं!
नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या महिलांनी आपल्याला आज जे काय मिळाले आहे, याचे कारण किंवा स्रोत शोधला की समजेल यासाठी राष्ट्रपिता जोतीराव, सावित्रीमाई, छ.शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आणि त्याग, समर्पण आहे. नाहीतर सनातनी मनुवादी धर्माने अनेक बंधन घालून स्त्रीला गुलाम बनविले होते.फक्त चूल आणि मुलं एवढ्यावर मर्यादित केले होते. ज्या मनुस्मृतीच्या धर्माने स्त्रियांना बंदिस्त करून जनावरांच्या पेक्षाही हीन वागणूक दिली होती, ती मनुस्मृतीच 25 डिसेंबर 1927 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केली…
माझी समस्त स्त्रियांना विनंती की त्यांनी जातीपातीचा चष्मा काढून पहावे!
*बहजन समाजातील नेते, नाते, नीती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर* याबद्दल संवाद साधणार आहे :-
कृष्णराव केळुसकर गुरुजी यांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील पहिला मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार कार्यक्रम घेतला. यावेळी केळुसकर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धांचे चरित्र हे पुस्तक त्यांना भेट दिले. बाबासाहेब आंबेडकर यांची उच्च शिक्षण घेण्याची जिद्द पाहून त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या कडून शिष्यवृत्ती मिळवून दिली. केळुस्कर गुरुजी हे मूळचे कदम आहेत, जे मराठा आहेत. तर सयाजीराव महाराज हे सुद्धा मराठा होत. कोकणात खोती आंदोलन ज्यांनी चालविले ते नारायण नागू पाटील जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शेतकऱ्यांचा नेता घोषित करतात ते ही कुणबी होत. तसेच राजर्षी शाहू महाराज ज्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी प्रचंड आदर आहे. जे त्यांना भेटण्यासाठी कोल्हापूर येथून मुंबई येथे डबक चाळीत येवून भेटतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करतात.अनेक परिषदात बाबासाहेब यांच्या सोबत सहभागी होतात.
मूकनायक वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी आर्थिक मदत शाहू महाराज यांनी केली आहे. विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी बनले होते. तर मराठा जातीतील पहिले सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश पी. बी. सावंत म्हणतात की, बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या नाईट लॉ कॉलेजमुळे मला संधी मिळाली. तर भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेब आंबेडकर जिवंत असतांनाच त्यांचा सन्मान म्हणून जगातील
पहिला पुतळा ९ मार्च १९५० ला कोल्हापूरच्या बिंदू चौकात उभारला.,
मौलाना शौकत अली हे लंडन राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुद्द्यावर मदत करतात. संत गाडगेबाबा है बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास सक्रियपणे पाठिंबा देतात. आपला वेळ, बुध्दी, श्रम व संपत्ती ही डॉ. आंबेडकर यांच्या कार्यासाठी सुपूर्द करण्यासाठीची व्यवस्था करतात. महाड आंदोलनावेळी कोणीही जागा देत नाही, त्यावेळी एक मुस्लिम जागा उपलब्ध करून देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांचा आदर्श घेवून कार्यरत राहिले त्यात तथागत गौतम बुद्ध जे कुणबी होते. तर दुसरे आदर्श क्रांतिकारक संत कबीर होत, जे मोमीन आहेत. तर तिसरे आदर्श राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले होत, जे माळी या जातीतील होत. म्हणजे हे आदर्श रक्ताचे किंवा जातीचे नसून विचारांचे आदर्श आहेत.
सीताराम शिवतरकर, बी.जी.देवरुखकर, नानकचंद रत्तू. सुरभानाना टिपणीस ही सर्व जातीची नाही तर मतीचे माणसं आहेत.
जोगेंद्रनाथ मंडल हे बाबासाहेबांच्या प्रतिनिधीत्वा साठी स्वतः चा राजीनामा देवून त्यांना निवडून आणतात.
मूकनायक मुखपत्राच्यावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग
*काय करू आता धरूनिया भीड नि:शंक हे तोंड वाजविले*। तसेच ज्या मनुस्मृतिने छत्रपती शिवाजी महाराज यांना शुद्र उखून राज्याभिषेक नाकारला होता, त्या अपमानाचा बदला रायगडाच्या पायथ्याशी ती मनुस्मृति दहन करून घेतला. बाबासाहेबांच्या राजगृहात शिवरायाची मूर्ती आहे. अनेक पत्रांत सर्वात वर ‘जय शिवराय’ घोषवाक्य असायचे.
संत भगवानबाबा यांना ‘नारायणगडाच्या’ वादाबाबत भेट घेतली त्यावेळी कायदेशीर सल्ला दिला. संत भगवान बाबांनी पर्यायी गड निर्माण करून शिक्षण आणि वसतिगृह सोयी, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सदाचार यासाठी ही कार्य केले. साहित्यसम्राट, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मज भीमराव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श म्हणतात.
तुकोजी होळकर आणि मिस मिलर यांच्या विवाहामुळे होळकर घराण्यात निर्माण झाला होता त्यावेळी सर्वांना एकत्र करून ४ मार्च १९२८ ला त्याच्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समेट घडवून आणला. तसेच मातंग, मेकर जाती परिषदा घेवून त्यातून त्यांच्या हक्क अधिकाराच्या लढाईचे नेतृत्व केले. ओबीसी ही ओळख १९२८ साली सायमन कमिशनला दिलेल्या मेमोरंडममध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. १६२६ साली ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकाविरोधात कोर्टा लढण्यासाठी जेधे, जवळकर यानेत्यांना डॉ. आंबेडकर यांनी युक्तिवाद करुन देत केस जिंकून दिली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानामध्ये देशातील सर्वात मोठा भाऊ ओबीसीसाठी अगोदर तरतूद केली. कलम ३४०, त्यानंतर कलम ३४१ ला अस्पृश्यासाठी ज्यात देशातील १५०० जातींना एकत्र करून अनुक्रम दिला. आणि त्यानंतर अनुसूचित जमातीच्या बांधवासाठी कलम ३४२ मध्ये प्रतिनिधित्व तरतुदी केल्या. सोबतच ५वी आणि ६वी अनुसूचीही ST साठी जोडली. बहुजननायक मान्यवर कांशीरामजी यांनी डॉ. आंबेडकरांचे कार्य आणि विचारधारा सामाजिक व राजकीय आंदोलनातून भारतभर पुढे नेली.

*विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तकप्रेमी डॉ.आंबेडकर* : –

महात्मा फुले यांनी सांगितले की, मती, नीती, गती, वित्त व स्वाभिमान हे शिक्षणामुळे येते. तोच राजमार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेला.
४ जानेवारी १९२५ रोजी सोलापूर येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले. ज्याचे व्यवस्थापक शिवाप्पा एस. आयदले होते. तसेच १० जुलै १९२५ ला निपाणी येथे वसतिगृह काढले ज्याचे व्यवस्थापक बी. एच. वराळे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना अनेक भाषणं देवून मार्गदर्शन केलेले आहे ज्यात आर्थिक, गरिबीचे भांडवल कुणीही करू नये. कारण सर्वात जास्त गरिबी मी अनुभवली आहे,हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करत रहावे. ज्ञानाबरोबरच त्यांच्याकडे शील असावेच, असे म्हटले आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद कॉलेज औरंगाबाद, सिद्धार्थ कॉलेज मुंबई ,स्कूल ऑफ पोलिटिक्स पुणे, नाईट लॉ कॉलेज मुंबईची स्थापना केली. ज्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षित झाले. अनेक विद्यार्थ्यांना यामुळेच शिकायला संधी मिळाली, या कॉलेज व वसतिगृहातुन अनेक युवक घडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगातील एकमेव व्यक्ती आहे, ज्यांच्याकडे ५० हजार पुस्तके होती. पैकी ३० हजार वाचून टिपण काढलेले होते. त्यासाठी स्वतंत्र घर ‘राजगृह’ होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या १९१८ च्या भारतातील जाती, अनहीलेशन ऑफ कास्ट, शुद्र पूर्वी कोण होते ? रानडे, गांधी आणि जीना, थॉट्स ऑन पाकिस्तान,
बुद्ध अँड हिज धम्म, व्हॉट गांधी अँड काँग्रेस डन फॉर अनटचेबल्स तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया आहे.त्यांचे संविधानासह २२ ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही वृत्तपत्रेही त्यांनी चालविली होती. या सर्वांचा उद्देश हाच की आपल्या लोकांपर्यंत गतीने विचार प्रसार प्रचार होईल.त्यांच्यात स्वाभिमानी नेतृत्व घडेल.स्त्रीयासह बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ते झोकून देवून कार्य करतील..

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश* : –

धम्म अनुयायांनी पंचशील पालन करावे असा आग्रह होता. आज असे होते काय ? तर नाही हे उत्तर येते! आज ज्यांच्यामुळे प्रतिनिधित्व संधी मिळाली त्यांच्या संदेशाला विसरून त्याउलट वर्तन काही लोक करीत आहेत. ज्या डॉ. आंबेडकरांनी परदेशात थंड प्रदेशात मदिरा सहजपेय आहे, त्याठिकाणी आणि भारतात दारुच्या ग्लासला स्पर्श केला नाही. कोणतेच व्यसन केले नाही. आताचे काही राजकीय पदाधिकारी, वरिष्ठअधिकारी रात्री ‘बार’ मध्ये बसून दिवसभरात बहुजन समाजासह, कांबळे, येडे, म्हस्के, सोनवणे यांना कसं अडवून लुटलं याच्या गप्पा ग्लासला ग्लास लावून जयभीम नावाचा ‘चिअर्स’ करून करत आहेत! कंदुऱ्या, जावळ, नवस आजही सुरु आहेतच की ! याचा विचार करावा.
१८ मार्च १९५६ रोजी आग्रा येथील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे, “मुझे पढे लिखे लोगोंने धोका दिया !’ असे विधान करतात. कारण शिकलेले लोक बेईमानी करून समाजाची लुबाडणूक करीत आहेत. स्वतःचे कुटुंब, घर यांचीच पोटे भरत आहेत. समाजाला वेळ, बुद्धी, पैसा देत नाहीत. आजची काही मंडळी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानातात मात्र त्यांनी सांगितलेल्या संदेशाला मानत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेवटच्या दिवसात स्वीय सहायक नानकचंद रत्तू हे निरीक्षण करतात की, डॉ आंबेडकर हे रात्रीचे अनेकवेळा न झोपता फुंदत फुंदत रडतात. एके दिवशी म्हणजेच ३१ जुलै १९५६ रोजीचा प्रसंग नानकचंद सांगतात,डॉ बाबासाहेब आंबेडकर अनेक रात्री पायात डोके घालून फुंदतात,रडतात. त्या दिवशी धाडस करून मी त्यांना विचारले की, बाबासाहेब तुम्ही रात्र रात्र झोपत नाहीत! आणि असे का रडतात ? त्यावेळी बाबासाहेब सांगतात, नानकचंद,”माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी केलेल्या धोकाधडीचे आणि मी संघर्ष करून मिळविलेल्या हक्क अधिकार यासाठी पुढे नेणारे अनुयायी नसल्याचे दुःख यामुळे मी रडतो आहे!
यातून आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त न बनता अनुयायी होवूया.
ज्या संविधानामुळे प्रतिनिधित्व मिळाले, हक्क अधिकार मिळाले आणि देशात समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यावर आधारित राष्ट्र निर्माण होत आहे. यासाठी संविधान टिकविणे, त्याचा संपूर्णपणे अंमल ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संविधान समजून घेऊया, आपण प्रत्येक जण ‘मिशनमोड’ मध्ये संघटीतपणे काम करुया. आपली समस्या ही राष्ट्रव्यापी आहे, म्हणून राष्ट्रव्यापी संघटनेत सतत कार्यरत राहणे हाच एकमेव पर्याय आहे. आपण आपला वेळ, बुध्दी, श्रम आणि पैसा देऊन डॉ. आंबेडकरांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी द्याल अशी आशा आणि विश्वास वाटतो.

लेखक:-रामेश्वर तिरमुखे.
मो 9420705653.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here