Home लेख डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता !

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता !

85

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! जागतिक कीर्तीचे विचारवंत अशी ओळख आलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे विचारवंत म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जगभर ओळख आहे मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्या जाहिराती किंवा शुभेच्छा संदेश दिल्या जातात त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ओळख दलितांचे उद्धारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशीच करून दिली जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दलीत उद्धाराचे कार्य तर जगजाहीर आहे. जगाला हेवा वाटेल अशी राज्यघटना त्यांनी देशाला दिली. त्यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती असलेला आपला देश एकसंघपणे बांधला गेला आहे. भारतासारखी राज्यघटना नसल्याने भारताच्या शेजारी असलेल्या देशांची आज काय अवस्था झाली आहे हे आपण पाहतोच आहे. त्यामुळे त्यांची दलीत उद्धारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ही ओळख यथायोग्यच असली तरी त्यांचे कार्य केवळ एवढ्या पुरतेच मर्यादित नाही. थोर अर्थतज्ज्ञ, महिलांचे उद्धारक, कृषी तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, जलतज्ज्ञ इतिहास तज्ज्ञ, समाज शास्त्रज्ञ, कायदेपंडित, धर्म चिकित्सक, राजनीती तज्ज्ञ, कामगार नेते, शांतीचे उपासक, कलाप्रेमी, लेखक, पत्रकार असे विविध पैलू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विविध पैलू कायम दुर्लक्षित केले जातात म्हणूनच मी माझ्या महिलांचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जलविषक धोरण या मागील दोन लेखात डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेले कार्य आणि जलतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन पैलूंची ओळख करून दिली होती आज मी डॉ बाबसाहेब आंबेडकरांची पत्रकार म्हणून असलेल्या पैलूंची ओळख करून देणार आहे.
डॉ बाबसाहेब आंबेडकरांचा पत्रकारितेचा प्रवास मूकनायक पासून सुरू झाला. नंतर हा प्रवास बहिष्कृत भारत, जनता व प्रबुद्ध भारत पर्यंत सुरूच राहिला. सामाजिक आणि राजकीय ध्येयासाठी स्वतःचे वर्तमानपत्र असावे असे डॉ बाबसाहेब आंबेडकरांना वाटले म्हणूनच त्यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. दलितांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मूकनायक पाक्षिकानं निष्ठेनं केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. सुरुवातीला पांडुरंग नंदराम भटकर पाक्षिकाचे संपादक होते. त्यानंतर मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी असणारे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी आली. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे, ही जाणीव निर्माण केली. ‘मूकनायक’ पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. ‘मूकनायक’ एप्रिल १९२३ मधे बंद पडले.
इ.स. १९२४ मध्ये डॉ बाबसाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. ३ एप्रिल १९२४ रोजी बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये बाबासाहेबांनी “आम्ही शासनकर्ती जमात बनणार” या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची लेखनी झुंजार, क्रांतिकारी आणि प्रभावी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समजू शकत होती.
गंगाधर पानतावणे यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे की, “या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. बाबासाहेब महान पत्रकार होते.”
पत्रकार महामानव डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here