
राजुरा 6 एप्रिल
महाराष्ट्र कासव पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत ३४० भारतीय स्टार कासवांची मुक्तता राजूरा वनपरिक्षेत्र, मध्य चांदा वनविभाग येथे करण्यात आली. वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना, ३४० भारतीय स्टार कासवांना मध्य चांदा वनविभागातील राजूरा राखीव जंगलात मुक्त करण्यात आले. ही मुक्तता महाराष्ट्र वन विभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नाने राबविण्यात आलेल्या कासव पुनर्वसन प्रकल्पाचा (TRP) एक भाग आहे. २०२४ च्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या सघन पुनर्वसन प्रक्रियेनंतर ही राज्यातील स्टार कासवांची सर्वात मोठी संघटित मुक्तता मानली जाते. या मुक्ततेमुळे चंद्रपूरचे राखीव जंगल अवैध वन्यजीव व्यापारातून वाचविण्यात आलेल्या स्टार कासवांचे निवासस्थान बनले आहे. TRP ची स्थापना अवैध वन्यजीव व्यापारातून आणि कैदेतून वाचविण्यात आलेल्या कासवांच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती.
मागील काही महिन्यांत ४४१ भारतीय स्टार कासव या प्रकल्पात दाखल करण्यात आले होते. त्यातील बरेचसे अत्यंत अशक्त अवस्थेत होते. सुमारे ८०% बचाव दरासह, सध्या मुक्ततेसाठी तयार असलेल्या या समुहाने वैद्यकीय उपचार, विलगीकरण आणि पर्यावरण सानुकूलनाची सर्व टप्पे पूर्ण केली आहेत. उर्वरित काही कासव सध्या देखील पुनर्वसन प्रक्रियेत असून त्यांची भविष्यात मुक्ततेसाठी निवड होण्याची शक्यता आहे. बावधन, पुणे येथील वन्यजीव ट्रान्झिट उपचार केंद्रात पुनर्वसनासाठी नैसर्गिक जीवनशैलीचे अनुकरण करणारे अधिवास तयार करण्यात आले. बरेचसे कासव कैदेत दीर्घकाळ असलेल्या, अयोग्य आहार, जागेचा अभाव आणि पुरेशा सूर्य प्रकाशा शिवायच्या स्थितीतून आले होते. ज्यामुळे पोषणतुट, हालचालीतील त्रुटी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागला होता. पोहोचल्यावर कासवांना त्यांचा आकार आणि लिंग यानुसार वर्गीकृत करण्यात आले. जेणेकरून कमी तणाव आणि योग्य देखरेख होऊ शकेल.पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय उपचार, विलगीकरण आणि निरीक्षण होते. त्यानंतर त्यांना अर्ध-नैसर्गिक बाह्य अधिवासात हलविण्यात आले. येथे त्यांना स्थानिक गवत आणि हंगामी वनस्पतीवर आधारित आहार देण्यात आला. ज्यामुळे पाचनतंत्र सुधारले आणि नैसर्गिक खाण्याच्या सवयी निर्माण झाल्या. विशेष लक्ष UV किरणप्राप्ती आणि तापमान नियंत्रणासाठी विशिष्ट विश्रांती आणि ऊन घेण्याच्या जागा तयार करण्यात आल्या. कैदेतून नैसर्गिक अधिवासात जाण्याच्या प्रक्रियेस मदत करण्यासाठी हवामान सानुकूलन आणि नैसर्गिक वर्तन पुनःप्रस्थापनेवर भर देण्यात आला. नियमित बायोमेट्रिक मूल्यांकन जसे की वजन, कवचाची स्थिती आणि पाण्याशी संबंधित व्यवहार यावरून प्रगती मोजली गेली. प्राण्यांच्या आरोग्याच्या गरजेनुसार सतत देखरेख करणारे अनुभवी वन्यजीव उपचारक आणि पशुवैद्यकीय तज्ञ यांच्या मदतीने ही प्रक्रिया राबवली गेली.
उत्साहवर्धक बाब म्हणजे या समुहातील बहुसंख्य कासवांमध्ये नैसर्गिक आहार आणि हालचालीत लक्षणीय सुधारणा दिसून आली, जी त्यांच्या मुक्ततेनंतरच्या जगण्याची शक्यता वाढवते. पुण्याहून चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत नवशे किलोमीटरचा प्रवास करून ही कासवे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. येथील हवामान व परिस्थिती त्यांच्यासाठी योग्य आहे. याआधीच्या छोट्या प्रमाणातील मुक्ततेत चांगले परिणाम मिळाले आहेत. वनविभागाच्या निरीक्षणात या भागात कासवांच्या पुनरुत्पादनाचे आणि तरुण कासवांचे पुरावे आढळले आहेत. जे त्यांच्या यशस्वी पुनर्संस्थापनाचे संकेत आहेत.
या मुक्ततेच्या वेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजूरा येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांनी व बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, शिक्षीका जयश्री धोटे यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. यावेळी कासवांच्या प्रजाती, त्यांचे खाद्य व अन्य माहिती देण्यात आली. पुढील पिढीच्या संवर्धनशीलतेचे प्रतीक ठरेल . या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन स्वेता बोड्डू, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग आणि पवनकुमार जोंग, उपविभागीय वन अधिकारी, राजूरा यांनी केले. मुक्ततेनंतर निरीक्षणाची जबाबदारी आदेश शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक, सुरेश येलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा, क्षेत्रीय वन अधिकारी आणि स्थानिक वनकर्मचाऱ्यांकडे आहे.
———————————————
डॉ. क्लेमेंट बेन, IFS, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी पुण्यातून निघण्यापूर्वी या समुहाच्या मुक्ततेवर लक्ष ठेवले आणि सांगितले, ही मुक्तता फक्त कायद्याची अंमलबजावणी न करता महाराष्ट्रात वन्यजीव व्यापारा विरोधात दीर्घकालीन आणि शाश्वत पुनर्वसन व पुनर्स्थापन कार्यक्रमांद्वारे लढण्याची वाढती बांधिलकी दर्शवते.
———————————————
मागील काही वर्षांमध्ये अशा अनेक मुक्ततेवर मी देखरेख केली असून, प्रत्येक वेळेस या प्रजातीची पुनस्थापना क्षमतेविषयी आणि अनुकूलते विषयी मौल्यवान माहिती मिळाली आहे. हे प्रयत्न स्थानिक कासवांच्या लोकसंख्येला मजबूत करतातच, पण पर्यावरणीय समतोल पुनर्संचयित करण्यास देखील हातभार लावतात. आगामी मुक्ततेसाठी आम्ही नवकल्पनायुक्त टॅगिंग उपायांवर काम करत आहोत, जे मुक्ततेनंतर कासवांची हालचाल आणि वर्तन अधिक प्रभावीपणे ट्रॅक करण्यास मदत करतील. ही मुक्तता विज्ञानाधारित, कल्याणकेंद्रित संवर्धनाचा एक आदर्श ठरते. ती केवळ वन्यजीव तस्करी विरोधातील कठोर कारवाईचे प्रतीक नाही, तर नैसर्गिक अधिवासात पुनःस्थापनेची दूरदृष्टी सुद्धा दर्शवते असे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी केले.
जितेंद्र रामगावकर, IFS, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर
