सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.24मार्च):- चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी आपल्या राजवटीत सुमारे ९८ हजार स्तूपांची निर्मिती केली.या स्तूपांतून समता,बंधुता,प्रेम साऱ्या जगभर प्रसारित करण्याचे कार्य त्याकाळी झाले.आजही अनेक बुद्धविहारांतून सामाजिक समतेचा संदेश दिल्या जातो.विहारे ही भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असणारी धम्म चळवळीची केंद्रे व्हावीत, या विहारांमधून सामाजिक चळवळीचे कार्य सातत्याने होत रहावे या उद्देश्याने चिमूर तालुक्यातील विहारांकरिता चक्रवर्ती सम्राट अशोक सुंदर बुद्धविहार स्पर्धेचे आयोजन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेकडून करण्यात आली आहे.या स्पर्धेकरिता पुरस्कार समितीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या स्पर्धेकरिता पुरस्कार निवड समितीने काही निकष ठरवले असून त्या निकषांच्या आधारे निवड समिती बुद्धविहारांचे मूल्यांकन करणार आहे. यानुसार जे बुद्ध विहार जास्तीत जास्त निकष पूर्ण करेल त्यास हा पुरस्कार दिला जाणार आहे १ एप्रिल ते ५ मे दरम्यान स्पर्धेत सहभागी विहारांचे प्रत्यक्ष मूल्यांकन निवड समितीतर्फे करण्यात येईल.स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विहाराला १० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल.तसेच १० हजार रुपयांचा एक संगणक आणि ५ हजार रुपयांची पुस्तके भेट देण्यात येतील असा एकूण २५००० रुपये या पुरस्काराचे स्वरूप असेल.
पुरस्कार वितरण १२ मे २०२५ रोजी बुद्ध पौर्णिमेला आयोजित कार्यक्रमात करण्यात येईल.चिमूर तालुक्यातील जास्तीत जास्त बुद्धविहारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. सर्व स्पर्धकांनी त्यांचे प्रस्ताव हे विहार कमिटीतर्फे पाठवायचे आहेत.वैयक्तिकरित्या पाठवलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत असे आवाहन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूपेश पाटील, सचिव सुरेश डांगे यांनी केले आहे.स्पर्धेत सहभागी होण्याकरिता 9403316835 या क्रमांकावर संपर्क करता येईल असेही वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने कळविले आहे.
