
रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.23मार्च):- मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत बाजीराव महाराजांच्या विचारांचे उपासक , धार्मिक ग्रंथलेखक तथा कवी मारोतराव चोपणे (वणी) यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती चंद्रपूरच्या वतीने ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . याप्रसंगी एड. राजेंद्र जेनेकर (राजुरा) यांनी सभेची प्रस्तावना करून मारोतराव चोपणे यांच्या जीवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला .
तर योगतज्ञ विनायक साळवे (बल्लारपूर) , नामदेव गेडकर (चंद्रपूर),इंजि. विलास उगे(नागपूर) , सौ. ललिता भागवत (कळमेश्वर), संदीप कटकुरवार (ब्रम्हपुरी) यांनी मारोतराव चोपणे यांनी तळमळीने केलेले प्रचारकार्य यासंबंधीत विचार व्यक्त केले तर डॉ.श्रावण बानासुरे (बल्लारपूर), प्रा. नामदेव मोरे (घुग्घुस)यांनी दिवं. चोपणे काका यांनी केलेल्या लेखन कार्यावर प्रकाश टाकला. अँड . सारिका जेनेकर, प्रकाश सोनटक्के, रमेशचंद्र सरोदे (साहुर), संजय तिळसमृतकर , रविंद्र भेदोडकर, प्रभाकर नवघरे सांगडी (तेलंगण स्टेट), मनोहर बोबडे, सुभाष पावडे(राजुरा),भाऊराव बोबडे (रामपूर), पालिकचंद बिसने (भंडारा), सुरेश डांगे (चिमूर) यांनी चोपणे काकांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात दिलेले योगदान सांगत त्यांच्या काही आठवणी कथन केल्या. कार्यक्रमाध्यक्ष बंडोपंत बोढेकर म्हणाले की, ज्येष्ठ गुरुदेव उपासक दिवं. मारोतराव चोपणे यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार प्रसार यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात केला.
संत बाजीराव महाराजांच्या प्रेरणेने त्यांनी ग्रंथ निर्मिती केली. काव्यलेखन केले. आपले जन्मगाव सावर्ला ग्रामगीता ग्रंथानुरूप घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शासनाचे स्वच्छता व तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात त्यांना यश मिळाले. एकंदरीत त्यांनी ग्रामगीतेतील ग्रामसुधारणेचा विचार रूजविण्याचे केलेले सेवाकार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत श्री. बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. या सभेचे तंत्रनियोजन डॉ. श्रावण बानासुरे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. धर्मा गांवडे (सावली )यांनी केले. राष्ट्रवंदना व जयघोषानंतर सभा संपन्न झाली.
