Home चंद्रपूर महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, सन्मानाची अमूल्य भेट देणारी राजमाता जिजाऊ !!!!

महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, सन्मानाची अमूल्य भेट देणारी राजमाता जिजाऊ !!!!

19

भारतात अनेक वीरमाता, वीरश्री, रणरागिनी, होऊन गेल्या त्यात छत्रपती शहाजीराजांची स्वप्नपूर्ती करणारी कणखर राणी म्हणजे माता जिजाऊ होय. राजे शहाजी यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न माता जिजाऊंनी आपल्या शूर शिवाजीराजाकडून पूर्ण केले. त्या काळात परक्यांच्या सत्ता भारतभर होत्या. महाराष्ट्र मध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही यांच्या सत्ता फोपावल्या होत्या. राजांचे अन्यायकारी कायदे जनतेला सोसावे लागत. कोणत्या जनतेचा विचार केला जात नव्हता. राजेशाही एकमेकावर कुरघोडी करून राज्य पटकावण्याला लागली होती. जनतेचे जुलमी राजांकडून हाल केले जात होते. स्वाभिमानाने जगण्याचे स्वातंत्र्य नव्हते. समाजामध्ये कर्मठ, सनातनी, विषमतावादी विचाराचे थैमान माजले होते. बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा काळात म्हणजे 12 जानेवारी 1598 रोजी बहुजनांना स्वातंत्र्याची पहाट दाखविणारी माता जिजाऊ चा जन्म झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावात या स्वराज्य जननी चा जन्म झाला. माता जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव होते. आईचे नाव म्हाळसाबाई होते.

लखुजी जाधव वंशज मूळचे देवगिरीचे होते. अहमदनगर या क्षेत्रात लखुजी जाधव यांचा वास्तव्य असल्याचे उल्लेख आहेत. लखुजी जाधव व त्यांचे बंधू हे देवगिरी प्रांतातील वर्चस्व संपुष्टात आल्यावर शिंदखेडा राजा या भागात निजामशाहीचे सरदार म्हणून नावा रूपाला आले. लखुजी जाधव हे निष्णांत जहागीरदार होते. मोठमोठ्या लढाया जिंकून आणण्याची त्यांची ख्याती होती. लखुजी जाधव यांना पाच आपत्य होते. त्यात दत्ताजी, राघोजी, बहादुरजी ,अचलोजी,जिजाऊ अशी त्यांची नावे आहेत. सरदार लखुजी जाधव हे युद्धनीती, राजकारण, न्याय निवाडा, शेतीतंत्र, डावपेच यात पटाईत होते.

आई म्हाळसाबाई धाडसी स्त्री होती. माता जिजाऊच्या लहानपणापासूनच्या विविध कौशल्यात वाढ करण्याचे काम म्हाळसाबाईंनी केले. माता जिजाऊंनी आपल्या आई-वडिलांकडून विविध युद्ध कलेचे शिक्षण घेतले. सरदार लखुजी जाधव यांना विविध भाषा येत होत्या. त्यापैकी मराठी , हिंदी ,पारसी, उर्दू, कन्नड, संस्कृत भाषा ते जाणत. आपल्या मुलीला सर्व गुणसंपन्न करण्यासाठी लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांनी पुढाकार घेतला. वडिलांसोबत न्याय निवाडा करताना माता जिजाऊ जात असत. त्यावेळी त्यांना न्याय निवाडा करण्याचे ज्ञान मिळाले. लखुजी जाधव यांनी जिजाऊंना शिक्षण देण्यासाठी काही सरदारांना नियुक्त केले होते. वडील नामांकित सरदार असल्याने त्यांच्याकडून जिजाऊंनी अनेक कला शिकल्या.

माता जिजाऊ लहानपणी छोट्या छोट्या युद्धाचा अनुभव घेत असत. माता जिजाऊंनी सिंदखेडराजा परिसरातील अनेक मुलींना एकत्र करून त्यांना युद्ध कलेचे प्रशिक्षणही दिले होते. घोड्यावरून तलवार फिरवण्याचे कसब जिजाऊंनी प्राप्त केले होते. भाला , दांडपट्टा,तलवार फिरविणे यात माता जिजाऊ तरबेज होत्या. वडील धाडसी, कर्तबगार, न्यायप्रवीण, शिस्तप्रिय, लढाऊ, प्रामाणिक होते.आई वडीलांच्या गुणांचा वारसा माता जिजाऊंनी पुढे चालविला.आई वडीलांकडे वारकरी संताचा संचार होता. त्यामुळे संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर, यांचे विचार माता जिजाऊंनी वाचले. या विचारांचा चांगला प्रभाव माता जिजाऊंनी शिवाजी राजे लहान असताना त्यांना या संतांचे विचार आत्मसात करायला लावले. त्याकाळी हिंदू मुस्लिम हा वाद न होता. मुस्लिम राजांकडे सर्व जाती-धर्माची लोक होती. निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही यामध्ये हिंदू मुस्लिम सरदार होते. त्यांचे युद्ध हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर नव्हते.

माता जिजाऊ युद्धनीतीमध्ये निपुण होऊन भोसले घराण्याच्या सून झाल्या. निजामशहाच्या दरबारात सरदार म्हणून काम करणारे मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजीराजे यांच्याशी जिजाऊंचा विवाह सोळाशे दहा मध्ये वेरूळ येथे पार पडला. त्यावेळी माताजी जाऊ तेरा वर्षाच्या तर राजे शहाजी सोळा वर्षाचे होते. भोसले घराणे व जाधव घराणे हे निजामशाहचे सरदार होते. सुरुवातीला भोसले घराणे व जाधव घराणे ‌ यांचे घनिष्ठ संबंध होते. कालांतराने हत्तीच्या झालेल्या चेंगराचे चेंगळीत प्रसंगी दत्ताजी जाधव व संभाजी भोसले यांच्या त झालेल्या वादावादीमुळे दत्ताजी जाधव व संभाजी भोसले यांचे मृत्यू झाल्यानंतर दोन्ही घराण्यांचे संबंध बिघडले. माता जिजाऊ भोसले घराण्याची सून होती. तिने नंतर आपले वडील व इतर भाऊ यांच्याशी संबंध ठेवले नाही. राजे शहाजींना आयुष्यभर साथ दिली. परक्याच्या राजवटीत स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवला जातो हे ओळखून राजे शहाजींनी स्वराज्य स्थापनेची कल्पना माता जिजाऊ पुढे मांडली.

निजामशहाने दिलेल्या जहांगिरीवर माता जिजाऊ यांच्याकडे पुणे ,सुपे जबाबदारी देऊन राजे आपल्या इतर मुलांना घेऊन दक्षिण प्रांतातील आपल्या सरदारकी सांभाळण्यासाठी गेले. इकडे माता जिजाऊ गरोदर होत्या. तरीही त्यांनी आपल्याकडे असलेल्या प्रांताची धुरा सांभाळली. शिवनेरी किल्ल्यावर राजे शिवाजी यांचा जन्म झाला. राजे शिवाजी यांना माता जिजाऊने सर्व प्रकारचे शिक्षण दिले. केवळ राजा न होता जनतेच्या मनातील, हृदयातील शिरोमणी होण्याचे राजे शिवाजींना सुचविले. मावळ भागातील बारा बलुतेदार , अकरा अलुतेदार व सर्व जातीमधून कर्तबगार तरुण निवडण्याचे सुचविले. माता जिजाऊंनी समाजातील सर्व स्तरातील लोकांमधून शूर वीरांची निवड स्वराज्यासाठी केली. त्यात मदारी मेहतर, बाजी पासलकर, काझी हैदर, शिवा काशिद, जीवा महाले, इब्राहिम खान, तानाजी मालुसरे बहिर्जी नाईक यासारखे निष्ठावान मावळे मिळाले. शिवाजी महाराजांनी माता जिजाऊंचा विचार मनात रुजविला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ शिवाच्या मंदिरात घेऊन स्वराज्याचा संकल्प केला.

माता जिजाऊ यांनी पुण्यातील मुरारी जगदेव याने पुण्याच्या भूमीत लोखंडी नांगर फिरवून ही भूमी नापीक झाल्याचे जाहीर केले होते. माता जिजाऊंनी या भूमीत राजे शिवाजी यांच्या हातून सोन्याचा नागर फिरवून ह्या भूमीला सुपीक बनविले. शेतकऱ्यांसाठी विविध अवजारे बनवून ती वाटप केली. बी बियाणे यांचे वाटप केले. शेतीला लागणाऱ्या पाण्यासाठी दोन ठिकाणी बंधारे बांधले. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण केले . शेतकऱ्यांच्या शेतीचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. शेती चे नुकसान करणाऱ्या लोकांना शिक्षा केली. सर्व धर्मातील संतांचा आदर राखला. शिवाजी राजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले असता मिर्झा राजे जयसिंग हा आपल्या राज्यावर चालून आले असता माता जिजाऊ युद्ध करण्यासाठी सुसज्ज झाल्या. युद्धासाठी निघाले असताना नेताजी पालकर यांनी जिजाऊंना माफी मागितली व ते युद्धासाठी निघाले.

युद्धनीतीमध्ये निपुण असलेल्या माता जिजाऊंनी अफजल खान आपला भूमीवर चालून आला असता त्याच्यासाठी शिवाजी राजे यांना आपल्या गुप्तहेरा मार्फत सर्व माहिती अफजलखाना बाबत मिळवून ठेवलेले होते. कोणत्या युक्त्या त्यासाठी वापरला पाहिजे याबाबत शिवाजीराजांना माहिती दिली. शिवाजी राजे यांना आग्र्याला जाण्याचा व त्या निमित्ताने आपले साम्राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण बनविण्यामागे माता जिजाऊंचा मोलाचा हात आहे. अफजलखानाच्या वधानंतर त्याला सन्मानाने पुरण्याचे व त्या जागेवर त्याची कबर करण्याचे माता जिजाऊंनी सुचविले. प्रत्येक सैनिकाला त्याच्या योगदानाबद्दल सन्मान करण्याचे तसेच त्याच्या कुटुंबीयांना नोकरी व वारसाला मानधन देण्याचे राजे शिवाजींनी माता जिजाऊंच्या सल्ल्यानुसार सुरू केले. माता जिजाऊंच्या आई म्हाळसाबाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांना सती न जाण्याचे माता जिजाऊंनी सुचविले. माता जिजाऊ रुढीवादी नव्हत्या. युद्ध करताना जिजाऊंनी राजे शहाजी यांनी शिकवलेल्या गनिमी कावा वापरला. माता जिजाऊनीं जनतेला स्वातंत्र्याने जगायला शिकविणारा शिवाजी राजा घडविला.

माता जिजाऊंनी आपल्या शिवाजी राजास परस्त्रीस माते समान मानण्याची शिकवण दिली होती. त्यामुळे राजे शिवाजी यांनी आपल्या राज्यकारभारात परस्रीला सन्मानाने वागविले. आपल्या मुलांवर सदगुणांची बरसात करणारी एकमेव माता म्हणजे माता जिजाऊ होय. माता जिजाऊंनी मातृसत्ताक पद्धतीने राज्यकारभार करण्याचे शिवबाला शिकविले होते. त्यामुळे शिवबांनी आपल्या सून बायांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी दिली. ताराबाई शिंदे या सुनबाई ने परिवर्तनवादी विचार मांडून राज्यकारभार चांगल्या पद्धतीने पार पाडला.

सर्वच राज्यकर्त्यांनी आपापल्या सत्ता आल्यावर राज्याभिषेक केले. शिवाजी राजे हे सार्वभौम राजे असतांना त्यांच्या राज्याभिषेक होण्यास सनातनी लोक अडसर होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सनातनी असल्याने शिवाजी राजे शूद्र असल्याचे ते मानत होते. राजे शिवाजी यांनी काशीच्या गागाभट्ट्याला बोलवून आपला पहिला राज्याभिषेक करून घेतला. त्यानंतर मात्र त्यांना सनातन्यांच्या विरोधात जाऊन आपला राज्याभिषेक पुरोगामी पद्धतीने केला. माता जिजाऊंनी आपल्या राज्यकारभार सुरक्षित चालावा म्हणून बहिर्जी नाईक या अष्टपैलू गुप्तहेर संघटनेच्या व्यक्तीला विराजमान केले होते. बहिर्जी नाईक यांना बऱ्याच भाषा येत होत्या. बहिर्जी नाईक यांनी ‌ शिवाजी महाराजांना सर्व ठिकाणी मदत केली.

आग्र्याच्या सुटकेच्या वेळी बहिर्जी नाईक याला माता जिजाऊनी शिवाजी महाराजांना आग्रा जाण्यापूर्वी त्या भागातील मार्ग यासाठी योग्य माहिती संग्रहसाठी पाठविले होते. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची निवड करताना माता जिजाऊंनी अचूक मावळ्यांची स्वराज्याच्या उभारणीसाठी निवड केली. माता जिजाऊंना अनुभव सिद्ध ज्ञान होते. समय सूचकता त्यांच्या अंगी होती. प्रभावी निर्णय क्षमता त्यांच्या अंगी होती त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय कधीही चुकीचा ठरला नाही. माता जिजाऊ मानवतेच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या राणी होत्या. मनोवाद्यांनी चालवलेल्या जुनाट रूढी परंपरा यांच्या विरोधात जाऊन शिवाजी महाराजांनी सैनिकांना समुद्रापार पाठविले. सनातन्यांनी मांडलेली काल्पनिक कल्पना खोटी ठरवली. माता जिजाऊ कणखर , मुत्सद्दी, मनमिळाऊ, संघटन कौशल्य असलेल्या राणी होत्या. शिवाजी राजे यांना जिजाऊंनी महापुरुषाच्या जीवनातील उदाहरणे देऊन, वारकरी पंथातील संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर यांची उदाहरणे देऊन शिवाजी राजांना मानवतावादी बनवले. राजा आणि प्रजा यामध्ये बंधुत्वाचे नातं शिकवणारे माता जिजाऊ थोर सम्राज्ञी होत्या.

माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांचा राज्याचा विस्तार वाढवा म्हणून त्याचप्रमाणे आपल्याकडे सामर्थ्य वाढावी म्हणून त्यांनी सहा लग्ने लावून महाराष्ट्रभर संबंध प्रस्थापित केले. माताजी जिजाऊंना अनेक संकटांना सामोरे जाऊन हे स्वराज्य उभे करावे लागले. स्व जातीय, आप्तेष्ट यांच्याही कट कारस्थानाला सामोरे जावे लागले. माता जिजाऊ खंबीर उभ्या राहिल्या. माता जिजाऊंनी राजा शिवबाला संस्कारक्षम घडविले. आपला राजा कोणाकडे झुकला नाही. युद्धकलेचे डावपेच शिवबाला शिकविले. राजा शिवबात राजातला माणूस निर्माण केला. स्वराज्य उभारण्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग केला. स्वराज्यातील प्रत्येक माणूस आपला मानला. मराठी भाषा संवर्धनासाठी विविध प्रयत्न केले. आज आपल्याच जातीमध्ये आम्ही श्रेष्ठ कनिष्ठ , हलका भारी असा भेद करण्यात सारे जीवन वाया घालवतो. अशा लोकांकडून बहुजनांची उन्नती होणार नाही. एका संघटनेत असलेले लोक एकमेकांना कमी लेखतात. संघटना नावालाच असते. संघटनेची नावे मात्र महापुरुषांच्या नावावर असतात. महापुरुषांची विचारधारा ते अंगीकारत नाही. कोणतीच चळवळ उभी करत नाही. केवळ जयंती, स्मृतिदिन यावेळी डी .जे , रॅली, मोर्चा यात सहभागी होतो. वर्षभरात दोन-तीन कार्यक्रम झाले की आम्हाला वाटते आम्ही मोठे काम केले? अजून सुद्धा आम्ही कर्मठ विचारापासून दुर झालो नाही.

अजूनही आमच्या महाराष्ट्रात वारकरी परंपरा असताना बाहेरील भोंदू कोट्यावधी पैसा कमवून जातात. खरा वारकरी, मावळा, सत्यशोधक होण्याची आज गरज आहे. आज पुरोगामी माणसांचे आवाज प्रतिगामी बंद करीत आहेत . यातच आमचा पराभव आहे. प्रत्येक घरात जिजाऊ, सावित्री, रजिया सुलतान होण्याची गरज आहे. माता जिजाऊ ८० वर्ष जगल्या. माता जिजाऊंच्या केवळ फोटोला पूजण्याची गरज नाही. माता जिजाऊ अभिवादन करायचे असेल तर त्यांचे विचार जीवनात रुजविण्याची गरज आहे. बहुजनांनी जाती, धर्म विरहित जगण्याची गरज आहे.

✒️एस.एच.भवरे(उप संपादक लेखन मंच साप्ताहिक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here