चोपडा: येथे दि.०७ जानेवारी २०२५ रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा तसेच गॅलेक्सी कॉम्प्युटर एज्युकेशन, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हय, मी सावित्रीबाई’ या दीर्घांक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या २५ वर्षांपासून संगणक साक्षरतेसाठी विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या चोपडा येथील गॅलेक्सी कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘व्हय मी सावित्रीबाई’ या प्रेरणादायी नाटकाचे विद्यार्थी, पालक आणि महिलांसाठी विनामूल्य आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, गॅलेक्सी कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक प्रा.नितीन शाह, एम.के.सी.एल. चे प्रशिक्षक आनंद वैद्य, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्र. रजिस्ट्रार डी.एम.पाटील त्याचप्रमाणे नाट्यकलाकार सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी भुजबळ व शिल्पा साने, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी.डी.कर्दपवार व सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.आर.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.प्रीती शहा यांनी केले.
या प्रयोगाच्या सादरीकरणाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या नाटकात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी भुजबळ व शिल्पा साने यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिका साकारल्या. तब्बल दीड तास ‘व्हय मी सावित्रीबाई’ या नाटिकेद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच महात्मा फुले यांचा संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखविला. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा केलेला प्रचार आणि प्रसार तसेच सामाजिक क्षेत्रात केलेली कामगिरी, केलेले साहित्य लेखन यांचे वास्तव दर्शन नाटिकेद्वारे घडविले.
यावेळी विद्यार्थ्यांनी नाटिकेचा आशय, विषय, दिग्दर्शन, कलाकार व त्यांची भूमिका यांचे कौतुक केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नाट्य कलाकारांशी सुसंवाद साधला. ज्ञानात भर टाकणाऱ्या नाटिकेचे विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फे आयोजन केल्याबद्दल संस्था, महाविद्यालय तसेच गॅलेक्सी कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटी, चोपडा यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी कौतुकोद्गार काढले. तसेच समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समन्वयक डॉ.एस.ए.वाघ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.डी.डी.कर्दपवार, डॉ.आर.आर.पाटील, डॉ.एम.एल.भुसारे व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या शिक्षणशास्त्र विद्यालय, बी. फार्मसी, डी.फार्मसी, तंत्रनिकेतन महाविद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.