Home गडचिरोली श्यामची आई आणि सुसंस्कारी श्याम

श्यामची आई आणि सुसंस्कारी श्याम

12

(पांडुरंग सदाशिव साने गुरूजी जयंती सप्ताह विशेष)

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा, यासाठी त्यांनी सन १९४६च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला त्यांनी महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. “एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले”, असे त्या वेळी म्हटले गेले. सदर माहितीपूर्ण लेख श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दशैलीतून जरूर वाचाच… 

साने गुरुजी हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. त्यांचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्याठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होतीही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने “बडा घर पण पोकळ वासा” झालेल्या या घराण्यात दि.२४ डिसेंबर १८९९ रोजी पांडुरंग सदाशिव सानेंचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच साने गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एमए. ही उच्च पदवी मिळवली होती.

“जो आवडतो सर्वांला।
तोचि आवडे देवाला।।”

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे- सन १९२४ ते १९३०पर्यंत नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. इ.स. १९२८ साली त्यांनी “विद्यार्थी” हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स.१९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी “काँग्रेस” नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन-१९३६ यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स.१९४२च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी मैला वाहणे व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.

साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या होत्या. त्यातील ही एक कविता-

“बलसागर भारत होवो।
विश्वात शोभुनी राहो।।
हे कंकण करी बांधियले।
जन सेवेत जीवन दिधले।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले।
मी सिद्ध मरायाला हो।।”

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा, यासाठी त्यांनी सन १९४६च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला त्यांनी महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. “एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले”, असे त्या वेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. सन १९४८मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे रचितट गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात-१९३२ साली सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या कुरल नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील लेस मिझरेबल्स या कादंबरीचे दुःखी या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ.हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञाच्या दी स्टोरी ऑफ ह्युमन या पुस्तकाचे मराठीत मानवजातीचा इतिहास असे भाषांतर केले.

“करील मनोरंजन जो मुलांचे।
जडेल नाते प्रभुशी तयाचे।।” हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते.

मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे मोरी गाय हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरीण नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली ही कविता खरा धर्म शिकविते-

“खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे।।
जगी जे हीन अतिपतित,
जगी जे दीन पददलित।।
तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे।।”
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात साने गुरूजी भारतीय समाजातील असमानता दूर करण्याच्या शक्यतेमुळे निराश झाले होते. महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. या शोकांतिकेबद्दल त्यांनी दिलेला प्रतिसाद २१ दिवस उपोषणासाठी होता. साने गुरुजी अनेक कारणांमुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतर खूप अस्वस्थ झाले. दि.११ जून १९५० रोजी झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक घेत त्यांनी आत्महत्या केली व जीवनयात्रा संपवली.

“अशी पाखरे येती, स्मृती ठेवुनीया जाती।
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती।।”

!! साने गुरूजींना सप्ताहभर जयंतीच्या पावन पर्वावर अनंत कोटी विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(संत व थोर पुरुषांचे प्रेरणादायी जीवनचरित्र अभ्यासक)रा. रामनगर वॉर्ड, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- 9423714883

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here