डॉ. प्रा. सुनंदा बोरकर जुलमे यांचा ‘साहित्याचा सौंदर्यबोध’ हा समीक्षाग्रंथ नुकताच वाचण्यात आला. योगायोगाने त्यांना हा समीक्षा ग्रंथ दुबईत सुप्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे आणि सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्याची संधी मिळाली. त्यांनी या समीक्षाग्रंथातून विविध साहित्यकृतींचा सुक्ष्म अवलोकानाने मागोवा घेतला आहे.
साहित्य हे मानवी मनातील जाणिवा-नेणिवांच्या प्रकटीकरणाचे सशक्त माध्यम आहे. प्रत्येक साहित्यकृती स्वतःची वैशिष्ट्ये घेऊन साकार झालेली असते. लेखक, कवी हा आपल्या वेदना, दुःख, जाणिवा, जुगप्सा, विद्रोह, नकार, प्रेम, मैत्री, शांती, करुणा, मुदिता अशा विविध भावनांच्या माध्यमातून साहित्यातून सौंदर्यांत्मकता रेखाटत असतो. पण फक्त सौंदर्यबोध असणारी कलाकृती श्रेष्ठ ठरते असे नाही. तर जी कलाकृती वाचकाच्या मनाला, जीवनाला नवा आयाम देते. नवी महाऊर्जा देते. नव्या विचारातून परिवर्तन घडवते. मानवाच्या हितासाठी कार्य करते तीच कलाकृती सौंदर्यबोधयुक्त असते असे मला वाटते.
डॉ. यशवंत मनोहर आपल्या बुद्धिवादी सौंदर्यशास्त्र या ग्रंथात लिहितात की, “सौंदर्य हे प्रचारी नसते. ते बोधनवादी नसते. सौंदर्य हे सौंदर्य असते. सौंदर्याने फक्त सौंदर्य व्हावे. त्याने मग कोणत्याच गोष्टीचा प्रचार करण्याची गरज नाही. सौंदर्य हीच सौंदर्याची संस्कृती आहे. सौंदर्य हीच सौंदर्याची भूमिका आहे. तीच त्याची प्रकृती आहे. तीच त्याची महाशक्ती ही आहे. कारण सौंदर्य हे स्वतः सर्व विधायक मूल्ये पोटात वागवणारे महामूल्य आहे.” मनोहर सरांचे हे विचार बुध्दिवादी सौंदर्याचा परिपोष आहे.
‘साहित्याचा सौंदर्यबोध’ हा समीक्षाग्रंथ साहित्याच्या सौंदर्यभावाचा उत्तम नमुना आहे. श्रीपाद जोशी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की, “सौंदर्य ही संकल्पना निरपेक्ष, स्थायी, नित्य असत नाही. ती अनित्य, बदलती सापेक्ष असते. सौंदर्यबोध पौर्वात्य असो वा पाश्चिमात्य, तो त्या तत्त्वज्ञानाचाच प्रांत असतो. हे विचार देखील वर्गजाणीवमुक्त होत नाहीत. पारंपरिक साहित्यशास्त्रांनी सत्य, सत्ता, सौंदर्य हे केवळ अलौकिकाशीच नव्हे तर सरळ सरळ पारलौकिकाशीच जोडले होते. त्यामुळे ते स्थायी, नित्य, निरपेक्ष अपरिवर्तनीय मानले. याच्या अगदी विरोधात श्रमण संस्कृतींनी ते बहुआयामी, बहुमाध्यमी, बुद्धीप्रामाण्यवादी, लौकिक मानवी जीवनव्यवहाराशी आणि त्याच्या आस्वाद्यतेशी जोडले. म्हणून ते सापेक्ष, अनित्य, अस्थायी, परिवर्तनीय मानले.” जोशी सरांचे हे विचार नक्कीच सत्यनिष्ठ सौंदर्यभावाचे अचूक निदान करणारे आहे.
डॉ. सुनंदा जुलमे यांच्या ‘साहित्याचा सौंदर्यबोध’ हा समीक्षाग्रंथपरिवर्तनशील साहित्याचा अचूक सौंदर्यभाव आहे. :साहित्याच्या सौंदर्यबोध’ या समीक्षाग्रंथात एकूण सदतीस कलाकृतींचे उत्कृष्ट असे समीक्षण केले आहे. कवितासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, ललितलेखन, वैचारिक लेखसंग्रह अशा विविध कलाकृतीचा सूक्ष्मवेध आपल्या समीक्षेतून त्यांनी घेतलेला आहे.
आज अनेक साहित्यकृती तयार होत आहेत. पण मराठी साहित्यात पूर्वी समीक्षक कमी होते व आजही कमीच आहेत. कलाकृतीच्या मुळामध्ये जाऊन त्यांच्या विविधांगी व विविधार्थी पैलूची समीक्षा करणे अत्यंत क्लिष्ट आहे. हल्ली अशी समीक्षा होताना दिसत नाही. डॉ. यशवंत मनोहर, डॉ. भूषण रामटेके, प्रशांत ढोले, प्रा. दीपक खोब्रागडे, प्रा. संदीप गायकवाड, डॉ. प्रकाश खरात आणि अनेक समीक्षक आहेत की त्यांनी आंबेडकरी विचारांच्या कलाकृतीचे समीक्षक अत्यंत प्रभावीपणे केलेले आहे. त्यांच्या समीक्षेतून आंबेडकरवादी साहित्याला नवीन दृष्टी लाभली आहे.
साहित्य ही आशयनिष्ठ कला आहे आणि आशयाचा जन्म हा जाणीवमूल्यांच्या पोटी होत असतो. कलावंताच्या जीवनदृष्टीने टिपलेली निरीक्षणे त्याच्या साहित्याचे अंतरंग असते. त्याच्या साहित्याचा सौंदर्यबोध कसा आहे याचे मूल्यमंथन म्हणजे समीक्षा होय. साहित्य जसे सौंदर्यबोध असते तसेच ते जीवनाचे तत्वज्ञान असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञानाविषयी लिहितात की, “philosophy is no purely theoretic matter. It has practical potentialities. Philosophy has its roots in the problems of life and whatever theories philosophy propounds must return to society as instruments of reconstructing society.” मानवी जीवनाचे खरे तत्त्वज्ञान त्यांनी या विधानातून अधोरेखित केले आहे.
साहित्याचा सौंदर्यबोध या ग्रंथात डॉ. सुनंदा जुलमे यांनी अत्यंत प्रभावी नोंदींचे विश्लेषण अचूक केलेले आहे. त्यांची समीक्षा ही कसदार असून लेखकाच्या अंतरंगातील सूक्ष्मातिसुक्ष्म प्रतिबिंबांचे धागे त्यांनी शोधून काढलेले आहेत.
‘आता वह्या सगळ्या बुडीत खाती’ या अनुराधा पाटील यांच्या कवितासंग्रहातील समूहनिष्ठ जाणीव अत्यंत प्रगल्भ आहे. या कवितासंग्रहातील विविधांगी आशयाचा उत्तम वेध त्यांनी घेतलेला आहे. लबाडाची फौज जणू साध्याभोळ्या लोकांना कसे लुटतात याचे मार्मिक दर्शन त्यांनी घडवलेले आहे. वर्तमान भवताल दिवसेंदिवस अराजकतेने व्यापत चालला आहे, या वर्तमानाचे निर्देशन अनुराधाताईंनी आपल्या कवितेतून केले आणि ते डॉ. जुलमे यांनी आपल्या समीक्षेतून यथोचित उलगडून दाखवले आहेत.
‘माझं नर्सिग: शोध अस्तित्वाचा’ या आत्मचरित्रात्मक कलाकृतीतील सौंदर्यभावाचे मनोवेधक विश्लेषण यांनी केले आहे. सुजाता लोखंडे यांच्या जीवनसंघर्षाचा परिपथ त्यांनी अचूक मांडलेला आहे. डॉ. सुनंदा जुलमे यांनी या समीक्षेत अनेक मानसशास्त्रीय विचाराचे विश्लेषण करून मांडणी केली आहे. स्त्री वेदनेची जाणीव जशी त्यांनी मांडली तसेच स्त्रीमधील खंबीरपणा व स्वतंत्रबाणा याचा अचूक ठाव त्यांनी घेतलेला आहे. ज्योती लांजेवार यांच्या ‘एका झाडाचे आक्रंदन’ या कवितासंग्रहातील शोकात्म भावनेचा त्यांनी शोधलेला तळ वाचमनाला सांद्र करतो. कविवर्य वामन निंबाळकरांच्या ‘वाहत्या जखमांचा प्रदेश’ या कवितासंग्रहातील भळभळत्या वेदनेचे शब्दांकन डॉ. जुलमे यांनी त्या वेदनेच्या पातळीवर जाऊन प्रस्तुत केले आहे. ‘फुटपाथ ते नोटरी’ या कादंबरीचे कथानक वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. बदलत्या सामाजिक व शैक्षणिक जाणिवांचा बोध देणारी ही कादंबरी आपल्या वांड्.मय रूपात जे सत्य मांडते त्या सत्याचे सौंदर्य ही समीक्षा उघडून दाखवते. मार्क्सवादी समीक्षक जार्ज ल्युकास साहित्यिक वास्तव यावर भाष्य करतांना लिहितात की, “साहित्यातील वास्तव म्हणजे व्यक्तिच्या दैनंदिन जीवनातील वास्तव नव्हे; तर त्या व्यक्तीनिष्ठ अनुभवाच्या तळाशी साऱ्या मानवतेला समान असणारे, मानवाला एकमेकांशी जोडणारे एक अदृश्य वास्तव असते. या तळ वास्तवाचा व आंतरिक वास्तवाचा कलात्मक शोध म्हणजे साहित्यिक वास्तव,” या विचारातूनच ही समीक्षा समृद्ध झाली आहे.
‘कवी ग्रेस आणि त्यांची कविता’ यामधून त्यांनी ग्रेस यांच्या कवितेतील दुर्बोधता व व्याकुळता यावर भाष्य केले आहे. भल्या भल्या समीक्षकांच्याही हाताला न गवसणारी ग्रेसांची कविता डॉ. जुलमे यांनी कवीच्या जीवनाभूतीच्या आणि मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे उलगडून दाखविली आहे. ‘हे असेच होत राहिले तर…’ या संजय गोडघाटे यांच्या कवितासंग्रहाला अस्वस्थ वर्तमानाची कविता संबोधून, अत्यंत मार्मिकपणे समीक्षा करत डॉ. जुलमे यांनी कवीच्या संवेदनेला यथोचित न्याय दिला आहे. ‘प्रश्नाची मातृभाषा’ व ‘अग्नीशाळा’ या कवितासंग्रहांमधील युवराज सोनटक्के यांच्या काव्यसंवेदना अचूक हेरल्या आहेत. या संग्रहातील सदतीसही समीक्षा आस्वादक, अभ्यासक, रसिक मनाला नवी दृष्टी देणाऱ्या आहेत.
‘साहित्याचा सौंदर्यबोध या समीक्षाग्रंथातून डॉ. सुनंदा जुलमे यांनी मराठी समीक्षा लेखन प्रांतात स्वतःचे नाव उमटवले आहे. त्यांचा हा पहिला समीक्षाग्रंथ असला तरी त्यांची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी निरपेक्ष व तटस्थ आहे. कलाकृतीला न्याय देण्याची त्याची भूमिका अत्यंत प्रभावी आहे. कलाकृतीला फक्त मोठेपणा न देता त्या कलाकृतीतील काही मर्यादाही विशद केलेल्या आहेत. त्यामुळे हा समीक्षा ग्रंथ अत्यंत उपयुक्त असा ठरलेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रियेतून निर्माण झालेल्या कलाकृतीचा आस्वाद त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळेच ‘हा समीक्षाग्रंथ आंबेडकरी जाणिवांचा सौंदर्यबोध साकार करणारा ग्रंथ आहे’, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वाघुर नदीच्या जलाकाठी ज्याप्रमाणे अजिंठा लेण्यांचे सौंदर्य निर्माण झाले. तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान जगमान्य झाले. तथागत बुद्धाचे विचार जगण्याची प्रेरणा झाले, त्या कलाकृतीमधील सौंदर्यबोधाप्रमाणेच आंबेडकरी विचारविश्वाच्या काठावर नजर स्थिरावून लेखिकेने हा सौंदर्यबोध घडविला आहे, असे मी मानतो. ‘साहित्याचा सौंदर्यबोध’ हा समीक्षाग्रंथ शब्दसौंदर्याचे अजिंठा लेणे आहे. या नंतरचीही समीक्षा अशीच दर्जेदार व वास्तवगर्भी यावी ही अपेक्षा. त्यांच्या पुढील समीक्षा लेखनाला माझ्याकडून सहृदय मंगलकामना!
‘साहित्याचा सौंदर्यबोध’
डॉ. प्रा. सुनंदा बोरकर जुलमे
अविशा प्रकाशन, नागपूर
सहयोगमूल्य : तिनशे पन्नास रूपये
संपर्क क्रमांक 8766422475.
✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-9637357400