प्रसिद्ध हिंदी कथाकार आणि निबंधकार यशपाल यांचा जन्म 3 डिसेंबर 1903 रोजी फिरोजपूर (पंजाब) येथे झाला. त्यांचे पूर्वज हिमाचल हमीरपूरच्या भूमपाल गावचे होते. दादा गर्दुराम यांनी विविध ठिकाणी व्यवसाय केला आणि ते भोरंज तहसीलमधील टिक्कर भरिया आणि खरवरिया येथील रहिवासी होते. वडील हिरालाल हे दुकानदार आणि तहसील लिपिक होते. तो महासू जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या अर्की राज्यातील चांदपूर गावातून हमीरपूरला गेला होता. त्यांची आई त्यावेळी फिरोजपूर छावणी मधील अनाथाश्रमात शिकवत असे. यशपालचे पूर्वज कांगडा जिल्ह्यातील रहिवासी होते आणि त्याचे वडील हिरालाल यांना एक छोटा जमिनीचा तुकडा आणि कच्चे घर याशिवाय दुसरे काहीही वारसा म्हणून मिळाले नाही. त्यांची आई प्रेमदेवी यांनी त्यांना आर्य समाजाचे तेजस्वी धर्मोपदेशक बनवण्याच्या उद्देशाने त्यांना ‘गुरुकुल कांगडी’ येथे शिक्षणासाठी पाठवले.
यशपालचे बालपण अशा काळात गेले जेव्हा त्यांच्या फिरोजपूर कॅन्टोन्मेंट शहरातील कोणीही भारतीय पाऊस किंवा उन्हापासून स्वतःला वाचवण्यासाठी ब्रिटिशांसमोर छत्री घेऊन जाऊ शकत नव्हता. दारिद्र्य, अपमान आणि ब्रिटीश अत्याचाराच्या वेदना त्यांच्या मनात भरत गेल्या. लहानपणापासूनच त्यांच्या हृदयात आणि मनात इंग्रजांबद्दल द्वेषाची ठिणगी पेटू लागली. त्यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात उडी घेतली. 1921 मध्ये देशात असहकार आंदोलन सुरू असताना यशपाल ऐन तारुण्यात होते. देशभक्तीसाठी त्यागाची भावनाही त्यांच्यात वाढू लागली. ते काँग्रेसच्या प्रचारात उतरले. त्यांना वाटलं की अशा आंदोलनांना भारतातील गरीब लोकांसाठी आणि सामान्य माणसांसाठी काही अर्थ नाही. तसेच या असहकार आंदोलनाचा ब्रिटिश सरकारवर काहीही परिणाम होणार नाही.
त्यांनी लाला लजपत राय यांनी स्थापन केले आणि राष्ट्रीय विचारांचे केंद्र असलेल्या लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे भगतसिंग, सुखदेव आणि भगवती चरण बोहरा यांच्या संपर्कात आले. नंतर ते ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी ते भगतसिंगच्या नौजवान भारत सभेच्या कार्यात सक्रिय झाले. देश बदलांची स्वप्ने पाहण्यास आणि सशस्त्र क्रांतीच्या चळवळीत सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. सायमन कमिशन विरोधी आंदोलनात लाला लजपतराय यांच्यावर इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्ज व त्यांच्या मृत्यूमुळे ते आणखीनच संतप्त झाले आणि सांडर्स हत्याकांडच्या नियोजनात सक्रीय सहभाग घेतला. 1929 मध्ये त्यांनी ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड इर्विनच्या ट्रेनखाली बॉम्बस्फोट केला, भगतसिंग यांना लाहोरच्या बोर्स्टल तुरुंगातून सोडवण्याच्या प्रयत्नात भाग घेतला आणि कानपूरमध्ये त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिस दलातील दोन हवालदारांना ठार केले. याच काळात त्यांनी त्यांची भावी पत्नी, 17 वर्षीय प्रकाशवती हिला भेटले, जिने आपले कुटुंब सोडले आणि त्यांच्या क्रांतिकारी चळवळीत सामील झाल्या होत्या. त्यांना चंद्रशेखर आझाद यांनीच बंदूक चलवण्याचे प्रशिक्षण दिले होते.
1931 मध्ये इलाहाबाद येथे पोलिसांशी झालेल्या सशस्त्र चकमकीत चंद्रशेखर आझाद शहीद झाले. क्रांतिकारकांचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की, चंद्रशेखर आझाद यांच्या हौतात्म्यानंतर यशपाल यांची ‘हिंदुस्थान समाजवादी रिपब्लिकन आर्मी’ (एचएसआरए)चा कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी दिल्ली आणि लाहोर येथे दिल्ली आणि लाहोर कट खटला चालू होता. या प्रकरणांमध्ये यशपाल हे मुख्य आरोपी होते, त्यांची खबर देणाऱ्याला 3000 रुपयांचा बक्षीस ब्रिटिशांनी जाहीर केलं होतं. पण ते फरार झाले आणि पोलिसांच्या हाती लागले नाही. पुढील दोन वर्षात यशपालने अनेक ठिकाणी बॉम्ब बनवण्यासाठी छुप्या पद्धतीने स्फोटके तयार केली. 1932 मध्ये इलाहाबाद (आता प्रयागराज) येथे एका घरात शरण घेतलेली असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांना घेरले. चकमकीत गोळ्या संपल्याने त्यांना अटक करण्यात आली. लाहोर कट प्रकरणातील तो मुख्य आरोपी होते. मात्र लांबलचक कारवाई व जनआंदोलनाच्या भीतीने सरकारने या खटल्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला होता. पुरेशा पुराव्यांअभावी आणि साक्षीदार नसल्यामुळे त्याच्यावरील इतर काही खटलेही फेटाळावे लागले. आणि शेवटी सशस्त्र चकमकीची शिक्षा म्हणून त्यांना चौदा वर्षांच्या सश्रम कारावासाची किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली तेव्हा ते अवघ्या 28 वर्षांचे होते.
ते तुरुंगात असताना त्यांच्या जीवनात एक महत्वाची घटना घडली जेल अधिकाऱ्याने एक सरकारी पत्र यशपाल यांना दिले, ज्यात त्यांच्या सोबत चळवळीत काम करणारी सहकारी प्रकाशवती कपूर यांनी यशपाल यांच्या सोबत विवाह करण्याची इच्छा दर्शवली आणि त्यासाठी यशपाल यांची संमती मागितली. प्रकाशवती ह्या यशपाल यांच्या कामाने फार आधी पासूनच प्रभावित होत्या आणि त्यांनी देखील स्वातंत्र्य चळवळीसाठी आपल्या घरचा त्याग केला होता. कैद्यांच्या लग्नाबाबत जेल मॅन्युअलमध्ये कोणताही नियम नसल्याने ब्रिटिश अधीक्षकांनी लग्नाला परवानगी दिली. एवढ्या धोकादायक कैद्याला हातकड्यांशिवाय लग्नासाठी न्यायालयात नेण्यास पोलीस तयार नव्हते. आणि यशपाल बांधून ठेवत लग्न करायला तयार नव्हता. शेवटी आयुक्तांनी स्वतः येऊन तुरुंगातच लग्न करण्याचे मान्य केल्यावर तडजोड झाली. ऑगस्ट 1936 ला बरेली जेल मध्ये विवाह संपन्न झालं ज्याला फक्त एक साक्षीदार होता. लग्नानंतर, वराला पुन्हा त्याच्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आणि वधू नंतर डेंटल सर्जन म्हणून तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कराचीला गेली. यशपाल-प्रकाशवती यांचा तुरुंगात झालेला विवाह ही भारताच्या इतिहासातील अशा प्रकारची एकमेव घटना होती. या बातम्यांना वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. या गदारोळाचा परिणाम म्हणून, सरकारने नंतर जेल मॅन्युअलमध्ये एक विशेष कलम जोडले, जे भविष्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना तुरुंगात लग्न करण्यास मनाई करते. यशपाल यांनी होकार दिल्यावर यानंतर जेल मध्ये तेव्हा लग्नासाठी परवानगी दिल्याने ही प्रकरण सगळीकडे बरेच गाजले आणि त्या नंतर जेल मधे विवाह करण्यास कैद्यांवर निर्बंध लावण्यात आले.
बंदिवासच्या या मोकळ्या वेळात त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास आणि लेखन करायला मिळाले, त्यांनी देश-विदेशातील अनेक लेखकांचा मोठ्या आवडीने अभ्यास केला. तुरुंगवासात यशपालने फ्रेंच, रशियन आणि इटालियन या भाषा शिकल्या आणि जगातील क्लासिक मूळ भाषा वाचण्यात प्रभुत्व मिळवले. ‘पिंजरे की उडान’ आणि ‘वो दुनिया’ ही कथासंग्रह त्यांनी तुरुंगातच लिहिले. त्यांच्या जेल अनुभवांवर आधारित ‘मेरी जेल डायरी’ या पुस्तकात महात्मा गांधींची अहिंसा आणि सत्याग्रह, लेनिनची राजकीय पद्धत आणि फ्रॉइडचे मनोविश्लेषण यासारख्या परस्परविरोधी विचारसरणींमध्ये पोहोचण्याची, पाहण्याची आणि समजून घेण्याची यशपालची चिंता दिसून येते. ते त्यांच्या सर्जनशील अस्वस्थतेचा पुरावा आहे, ज्यावर मात करून तो पत्रकार आणि लेखक म्हणून स्वत: ला घडवतात.
1937 मध्ये भारताला राजकीय गृहराज्य मिळाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आश्वासन दिले होते. 1938 मध्ये पहिले स्वदेशी सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका केली जात होती. गांधीजींच्या सत्याग्रहादरम्यान तुरुंगात टाकलेल्या कैद्यांची सुटका झाली, परंतु सरकारने यशपाल सारख्या क्रांतिकारकांना सोडण्यासाठी ते सशस्त्र आणि हिंसक कारवायांचा त्याग करण्याची यात ठेवली. यशपाल यांनी ही सरकारी अट मान्य करण्यास नकार दिला. आखेर, 02 मार्च 1938 रोजी त्यांचा तुरुंगवास संपण्याच्या दहा वर्षांपूर्वी त्यांची सुटका झाली. त्यांना पंजाब प्रांतात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. लखनौ तुरुंगातून सुटल्यानंतर यशपालने संयुक्त प्रांताची राजधानी लखनौ येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या समस्या त्यांच्यासमोर होत्या. यशपाल आणि त्यांच्या पत्नीकडे राहायला जागा नव्हती. तुरुंगातून सुटल्यानंतर ते कोणत्याही मोठ्या माणसाच्या दरबारात गेले नाही, जशी त्यांच्यापैकी काहींची अपेक्षा होती. त्यांची पत्नी आणि यशपाल यांनी मिळून मातीची आणि कागदाची खेळणी बनवली, ती विकली, रस्त्यावर पडलेली सुतळी गोळा केली, त्यातून पिशव्या बनवल्या, शूपॉलिश बनवून विकल्या आणि मग त्यांच्या तुटपुंज्या साधनसामग्रीने एक घर भाड्याने घेतले.
काही महिने कठीण परिस्थितीत घालवल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 1938 मध्ये आईकडून काही पैसे उसने घेऊन त्या भाड्याच्या घरालाच कार्यालयाचा स्वरूप दिलं. क्रांतिकारक चळवळीत काम करतानाच पत्रके काढण्यासाठी यशपालकडे आधीच हाताने चालणारी मशीन होती. त्यानेच ‘विप्लव’ पत्रिका काढण्यास सुरुवात केली. हा पत्रिका गाजू लागली. यासोबतच प्रकाशवती ज्या आता डॉ. प्रकाशवती पाल बनल्या होत्या त्यांनी ‘विप्लव ऑफिस’ मधूनच दंतचिकित्सेची प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळी महिला डॉक्टरांची संख्या फारच कमी असल्याने प्रकाशवती यांनी त्यांच्या क्षेत्रात भरीव यश मिळवले, परंतु काही काळानंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ पतीला समर्पित करण्याच्या उद्देशाने प्रॅक्टिस करणे बंद केले. मासिकाच्या मुखपृष्ठावर घोषवाक्य होते: ‘तुम्ही शांतता आणि समानतेचा प्रचार करा, विप्लव गात अपना अनल गान.’
हिंदी राजकीय पत्रकारितेच्या इतिहासात ‘विप्लव’ने अभूतपूर्व आणि उल्लेखनीय भूमिका बजावली. त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे, हे मासिक एक खुले व्यासपीठ बनले ज्यामध्ये कट्टर गांधीवादी, मार्क्सवादी आणि सामाजिक-राजकीय क्रांतीचे समर्थक सर्व एकाच ठिकाणी आपले विचार व्यक्त करू शकत होते. 1939 पर्यन्त विप्लव इतके लोकप्रिय झाले की बागी नावाचे त्याचे उर्दू संस्करण देखील येऊ लागले. आर्थिक प्रश्नावर मार्ग काढताना त्यांची पत्नी प्रकाशवती पाल ह्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण घेतले व 1940 मध्ये यशपाल आजारी पडल्यावर प्रकाशवती यांनी मासिकाच्या संपादनाची जबाबदारी घेतली. दरम्यान, त्यांनी कथा-कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली होती. छपाई-प्रकाशनाच्या अडचणी, इंग्रजांचे निर्बंध लक्षात घेता, त्यांना वाटले, स्वतःचे लिखाण स्वतःच प्रकाशित का करू नये? त्यांनी व प्रकाशवती या दोघांनी ‘विप्लव प्रकाशन’ सुरू केलं. यशपाल लेखक म्हणून अधिकाधिक गंभीरतेने लिहू लागले. एक क्रांतिकारक आता एक पूर्ण लेखक बनला होता.
थेट आव्हान देणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग झाला होता. त्यांचा ‘ सेवाग्राम के दर्शन’ हा लेख त्याचं पुरावा आहे, ज्यात ते महात्मा गांधींना भेटायला सेवाग्राम आश्रमात जातात, त्याना द्वितीय विश्व युद्धात असहकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी व्यक्तिगत सत्याग्रह आणि ईश्वरवर प्रेरणा म्हणून श्रद्धा या दोन अनिवार्य अटी काढून सार्वजनिक सत्याग्रह आणि देवावर श्रद्धा नसणारी व्यक्ति देखील सहभागी व्हावी म्हणून ती देवश्रद्धा ही अट काढण्याची मागणी केली. यशपाल यांनी गांधीजींशी वाद केलं की देवा वर श्रद्धा ठेवण्याची अट म्हणजे कॉँग्रेसचा लोकशाही आधार नष्ट करणे आणि व्यवस्था परिवर्तनासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकांना दूर लोटणे आहे. वाद-विवाद होऊन गांधीजी सहमत नव्हतेच. यशपाल बाहेर पडले. नंतर यशपाल यांनी सेवाग्राम आश्रमाचा अनुभव व असुविधेबाबत ‘विप्लव’ मध्ये छापलं.
डॉ.प्रकाशवती आणि यशपाल यांच्या ब्रिटिशविरोधी बंडखोर भावना शांत करण्यासाठी ब्रिटीश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ‘विप्लव’ विरोधात नोटीस बजावली. यशपाल यांना छत्तीस तासांच्या आत स्पष्टीकरण देण्यास किंवा प्रकाशन थांबवण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी यशपाल जाऊन त्याला भेटले व जेव्हा ते समोरच्या खुर्चीवर बसले होते, त्या ब्रिटीश अधिकाऱ्याने अपमान करण्यासाठी त्याचे दोन्ही पाय यशपालच्या दिशेने टेबलावर ठेवले. यशपालला ते सहन होत नव्हते. लगेच त्यांनीही त्यांचे दोन्ही पाय त्याच टेबलावर पसरवले. अधिकारी अतिशय संयमाने म्हणाला, “धन्यवाद मिस्टर यशपाल! आम्हाला तुमचे स्पष्टीकरण मिळाले आहे, आता तुम्ही जाऊ शकता.” आणि यशपाल निघून आले. सरकारी आदेशाने मासिकाकडून 12,000 रुपयांची हमी मागितली. विप्लवचे प्रकाशन थांबले. मग दोघांनीही ‘विप्लव’ बंद करून ‘विप्लव ट्रॅक्ट’ नावाने मासिक काढायला सुरुवात केली. अटक झाल्यामुळे, तुरुंग फेरी आणि वारंवार पोलिस धाडिंचे नवे कीर्तिमान बनवण्याऱ्या या मासिकाचे प्रकाशन 1941 मध्ये थांबवावे लागले. स्वातंत्र्यानंतर, 1947 मध्ये ‘विप्लव’चे प्रकाशन पुन्हा सुरू झाले, परंतु स्वतंत्र भारताच्या प्रेस सेन्सॉरशिप कायद्यामुळे, काही प्रकरणांनंतर ते कायमचे थांबले.
याच काळात बराच मार्क्सवादी साहित्य इंग्रजीत असल्याने त्यांनी समाजवादावर आस्था व समाजवादाशी वैर ठेवणाऱ्या लोकांना समजावं म्हणून सोप्या मांडणीचा ‘मार्क्सवाद’ हा कार्ल मार्क्स यांच्या सिद्धांतावर आधारीत लिहिलं. हा पुस्तक मार्क्सवाद परिचयमला म्हणून आज देखील वाचला जातो. हिंदीत अशा परिस्थितीत त्याची लेखणी धारदार व धाडसी होती.
6 वर्षे ब्रिटिशांनी तुरुंगात डांबून ठेवल्याने त्या बंदिवासात 21 कथांचा ‘पिंजरे की उडान’ हा कथासंग्रह 1939 वर्षी त्यांच्या विप्लव कार्यालयातून त्यांनी काढला. तेव्हा ‘विप्लव’ प्रकाशन संस्था म्हणून आकारास यायचाच होता. त्याला चांगला प्रतिसाद भेटला. याच वर्षी शोषणविहीन जगाचे स्वप्न बाळगूळ लिहिलेली 12 कहाण्यांचा कथासंग्रह ‘वो दुनिया’ विप्लव’ काढून काढण्यात आला. 1941 सालच्या त्यांच्या ‘दादा कॉमरेड’ या कादंबरीत त्यांनी क्रांतिकारी चळवळीत काम करणाऱ्या तरुणाची जी वास्तविकतेवर आधारित मानसिक-नैतिक गोंधळ दाखवलं आहे त्याने ती कादंबरी बरीच गाजली. क्रांतिकारकांनीही त्यावर टीका देखील केली. आजही त्यावर चर्चा होत असते. त्यांनी गांधीवाद आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली असून समाजवादी व्यवस्थेचा आग्रह धरला आहे.
8 जून1941 रोजी त्यांना भारत रक्षा कानूनच्या कलम 38 अन्वये पुनः अटक झाली परंतु मित्रांनी कसं तरी जामिनीवर बाहेर काढले. त्यांना लवकरच पुनः जेलवारी होईल या आशंकेने लिहून ऑगस्ट 1941 मध्ये ‘गांधीवाद की शव परीक्षा’ हा पुस्तक लिहून प्रकाशित केले. यात त्यांनी तरुण डावा-क्रांतिकारक कार्यकर्ता म्हणून त्यांनी गांधीवादी चळवळीच्या मर्यादा आणि त्यातल्या उणिवा स्पष्टपणे मांडल्या. हा पुस्तक आज देखील वाचला जातो. बौद्ध भिक्खू, पाली भाषेचे प्रख्यात अभ्यासक आणि लेखक डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी गाँधीवादावर टीका असलेल्या या पुस्तकाला त्या वर्षाचा सर्वोत्तम सर्वोपायोगी पुस्तक म्हटलं.त्यापाठोपाठ बोलबच्चन क्लब संस्कृतीच्या लोकांवर व्यंग करत लिहिलेलं ‘चक्कर क्लब’(1942) हा पुस्तक आला. मानवाच्या विवेक व तार्किक क्षमता-प्रयत्नांवर आधारित 16 कथांचा ‘तर्क का तूफान’ ही आला. यशपाल यांनी ‘दादा कामरेड’ (1941), ‘देशद्रोही’ (1943), ‘दिव्या’ (1945 ई.), ‘पार्टी कामरेड’ (1946), ‘मनुष्य के रूप’ (1949), ‘अमिता’ (1956), ‘झूठा सच’ (1958), ‘बारह घंटे’ (1962), ‘अप्सरा का शाप’ (1965) ‘क्यों फँसे’ (1968), ‘तेरी मेरी उसकी बात’ (1974) इत्यादी अनेक कादंबऱ्या रचल्या.
1945 साली प्रकाशित झालेल्या दिव्या कादंबरी ने हिन्दी साहित्य नव्या बंडखोर पत्रांची भर घातली. राजवाड्याच्या सुरक्षित भिंतींच्या आत आनंदी जीवन जगत असलेली दिव्याच्या बाहेरचं जग जातीय राजकारण आणि धार्मिक संघर्षाशी झुंजत असताना प्रियकराशी गर्भवती होते, पण तिचा प्रियकर तिला नाकारतो. आपल्या उच्च कुळाचे नाव वाचवण्यासाठी तिने आपले सुरक्षित अस्तित्व सोडले आणि प्रथम दासी म्हणून आणि नंतर दरबारी नृत्यांगना म्हणून स्वतःचे जीवन जगू लागते. प्रतिकूलतेने शेवटी तिचे डोळे उघडले – उच्च जन्माची स्त्री मुक्त नाही. फक्त वेश्या मुक्त आहे. दिव्या ठरवते की, तिच्या शरीराची गुलामगिरी करून ती तिच्या मनाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवेल अश्या व्यस्तवाला ती स्वीकारते. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात हिंदू आणि बौद्ध विचारधारा यांच्यातील वर्चस्वासाठीच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, कल्पनाशक्ती आणि समृद्ध ऐतिहासिक तपशील दिव्या ही एक मार्मिक कादंबरी आहे.
नाविक बंडाच्या संघर्षाच्या अनेक प्रसंगांनी भरलेला ‘पार्टी कॉमरेड’ 1946 वर्षी प्रकाशित झाला. नंतर हीच कादंबरी ‘गीता’ नावाने निघाली. त्याच्या केंद्रस्थानी गीता नावाची एक कम्युनिस्ट मुलगी आहे जी पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि पक्षासाठी निधी गोळा करण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर तिचे वर्तमानपत्र विकते. पक्षाला एकनिष्ठ असलेली गीता पक्षाच्या कामानिमित्त अनेक लोकांच्या संपर्कात येते. त्यातीलच एक पद्मलाल भवरिया हा पैशाच्या जोरावर मुलींना फसवतो. गीता आणि भवरिया यांच्यातील दीर्घ संपर्कामुळे शेवटी भावरिया बदलतो. अशी याची कथा. त्याच वर्षी ‘फूलो का कुरता’ हा कथासंग्रह देखील प्रकाशित झाला. त्यांच्या कथासंग्रहांमध्ये फूलों का कुर्ता, धरम युद्ध, सत्य बोलण्याची चूक, ज्ञानदान, भस्मवृत्त चिंगारी, कथासंग्रह आहेत. त्यांच्या कथांमध्ये आख्यानात्मक रस भरपूर आहे. वर्गसंघर्ष, मनोविश्लेषण आणि टोकदार व्यंगचित्रे ही त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये आहेत. दिव्या, देशद्रोही, झूठा सच, दादा कॉम्रेड, अमिता, मानुष के रूप, मेरी तेरी उसकी बात, इत्यादी कादंबऱ्या लिहिण्याबरोबरच त्यांनी ‘सिंहावलोकन’ आणि. या कथा माणसांच्या महत्त्वाकांक्षा आणि इच्छांचा खोलवर वेध घेतात. माणसाच्या कुतूहलातून अर्जित केलेल्या ज्ञानच्या दृष्टीने निर्मित केलेल्या 13 कहाण्या त्यांच्या ‘ज्ञानदान’ (1944) या कथासंग्रहात भेटतात.
‘अभिशप्त’ या कथासंग्रहातील दासधर्म, शंबूक आणि आदमी का बच्चा या कथा दलित वर्गाच्या प्रश्नांवर आधारित होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्रीय धोरणांच्या काही मुद्यांवर असहमत असूनही त्यांच्या जागतिक शांततेच्या प्रामाणिक प्रयत्नांना मान देऊन त्यांचे आभार मानत 1956 साली आपली ‘अमिता’ ही कादंबरी त्यांनी पाठकांना समर्पित केली. तेव्हा भांडवलदारी अर्थव्यवस्थेकडे झेप घेणाऱ्या अमेरिकेच्या कामगारवर्गावर 1946 साली फॉस्टर डलेस यांनी लिहिलेला ‘लेबर इन अमेरिका’ या महत्वपूर्ण पुस्तकाचे हिंदीत त्यांनी ‘अमेरिका के मजदूर’ या नावाने हिंदीत भाषांतर केले. लोकांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, मान्यता याचे विवेचन करणारे ‘उत्तमी की माँ’ हा कथासंग्रह त्यांनी लिहिला. 1951 साली त्यांनी सिंहावलोकन हा महत्वपूर्ण पुस्तक तीन भागांमध्ये लिहिलं. 1951 ते 1955 या कालावधीत त्यांनी याचं लिखाण करताना स्वतः पेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांच्याबाबतीत अमूल्य माहिती दिली. क्रांतिकरकांच्या जीवनाचे चढउतार, अनेक रहस्य, सैद्धांतिक व मनोवैज्ञानिक पैलू त्यांनी यात उलगडले. यशपाल भारताच्या क्रांतिकारक आंदोलनाचे सक्रिय नेते होते. वर्तमानचा यथार्थ विसरून भूतकाळाला कवटाळून बसलेल्या लोकांना उद्देशून त्यांनी ‘ओ भैरवी’ हा कथासंग्रह, 1962 ते 64 दरम्यान लिहिलेल्या नव्या ‘आदमी और खच्चर’ हा कथासंग्रह, समस्यामूलक 14 कहाण्यांचा कथासंग्रह चित्र का शीर्षक, वैयक्तिक व कौटुंबिक प्रश्नांचा सामाजिक दृष्टिकोनातून आढावा घेणारा ‘जग का मुजरा’, अस्कद मुखतार यांची सामाजिक कादंबरी ‘जुलेखा’चा त्यांनी उर्दूतून हिंदीत भाषांतर केला. त्यांच्या अनुभवांवर लिहिलेलं ‘जो देखा सोचा समझा’, 1942च्या भारत छोड़ो आन्दोलनच्या पार्श्वभूमीवर 1974 साली लिहिला गेलेला ‘तेरी मेरी उसकी बात’ या कादंबारित त्यांनी रेखांकित केला आहे की क्रांतिचा अभिप्राय फक्त शासक बदलने नसून समाज व त्याच्या दृष्टिकोणात आमूल परिवर्तन आहे.1975 वर्षी ते मॉरिशस दौऱ्यावर आमंत्रित करण्यात आले. तिथे त्यांनी तिथच्या साम्राज्यवादी शोषणापासून मुक्ती मिळवल्यानंतरची परिस्थिती आणि इतिहासाचा अभ्यास करून संस्कृति, सेक्स, साहित्य, जातीयवाद आदि प्रश्नांवर लिहिलेलं पुस्तक ‘स्वर्गोद्यान:बिना सर्प’ हा पुस्तक लिहिलं.
1951-52च्या आसपास सरकार विरोधात आंदोलने करणाऱ्या कम्युनिस्टांना धरपकड व अटक सुरू झाली. यशपाल यांना देखील जेल मध्ये टाकले गेले. यशपाल यांची पत्नी तेव्हा संयुक्त प्रांतचे (उत्तरप्रदेश) मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना भेटल्या व अटकेचे कारण विचारले की -यशपाल यांना अटक का केली गेली. ते तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद देखील नाहीत. तेव्हा पंत बोलले,-“तो कम्युनिस्ट पक्षाचा सभासद नाही तर काय झालं, तो लिहून लिहून लोकांना कम्युनिस्ट बनवतो आणि पक्षात भर्ती करतो म्हणून त्याला पकडलं.” त्यांच्या विचार, लेखन आणि कार्यपद्धतीत एक विशेष प्रकारची विरोध भडकावणारी मौलिकता होती. यशपाल यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत विरोधाचा सामना करावा लागला. यशपालने या विरोधांना आणि संघर्षांना पूर्ण निर्भयपणे तोंड दिले. स्वातंत्र्योत्तर काळात देशात वाढत्या असमानतेवर व सरकारच्या धोरणांवर त्यांनी ‘रामराज्य की कथा’ हा राजकीय पुस्तक लिहिलं.
1962 च्या बारह घंटे या कदंबरित ख्रिश्चन समाजाच्या विधवा विनी आणि विधुर फँटम यांचे विशिष्ट परिस्थितीत पारंपारिक भावनिक नाते दखवताना सामाजिक ढोंगीपणाला आव्हान देतात जिथे ते प्रेम किंवा वैवाहिक निष्ठा राखता न आल्याने विनीला कलंक लावण्याचा निर्णय घेताना, केवळ पारंपारिक श्रद्धा आणि मूल्यांवरून नव्हे तर पुरुष आणि स्त्रीच्या वैयक्तिक जीवनाची गरज आणि पूर्तता ही समस्या म्हणून त्याच्या वर्तनाकडे पाहण्याचा एक बोल्ड आग्रह करतात. मानवांमध्ये प्रचलित असलेल्या प्रेमाची नैसर्गिक आवश्यक गरज म्हणून ते पाहतात. पुरुष आणि स्त्री यांच्यातील परस्पर आकर्षण किंवा वैवाहिक संबंध हे केवळ सामाजिक कर्तव्य म्हणून पाहणे आवश्यक आहे का, असा प्रश्न ते विचारतात. यशपाल यांची ही कादंबरी त्यांचा जन्म संस्कार झालेल्या आर्यसमाजी निषिद्ध आणि दृष्टी यावर तार्किक टीकाकरणारी एक विचारप्रवर्तक कादंबरी आहे.
यशपाल हा व्यक्ती अतिशय गोड आणि आनंदी स्वभावाचे होते. त्यांना गप्पाटप्पा आणि चांगल्या संवादाची आवड होती. घरचे वातावरण अतिशय प्रेमळ आणि व्यवस्थित होते. यशपालजी कधी-कधी अतिशय विनोदी मूडमध्ये म्हणायचे – आम्हाला कोणत्याही धर्माच्या कट्टरतेने स्वीकारले नाही. म्हणूनच आपल्याला आपली जात आणि धर्म काय हेच कळत नाही? होय,पण जेव्हा जेव्हा माझी आर्यसमाजी आई मला म्हणते – यश, तू आर्य रक्ताचा आहेस, तेव्हा मी निश्चितपणे विचार करतो – माझ्या नसांमध्ये वाहणारे रक्त माझे नाही का, आणि मला स्वतःवरच हसायला येत.
एकदा त्यांना त्यांच्या एका सहकार्याने विचारले यशपालजी, तुम्ही विवेकी आणि पुरोगामी विचारांचे लेखक आहात, मग तुम्ही हे नफा देणारं प्रकाशनगृह का सुरू केले?” तर ते हसत हसत म्हणाले , आजचे शिक्षणही नफेखोरीचे आहे, मग प्रगतीशील असताना तुम्ही असे शिक्षण का स्वीकारले? मी कोणत्याही प्रकारचे शोषण स्वीकारले नाही, मग ते राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा धार्मिक असो. तुम्ही व्यवसायाबद्दल बोलत आहात. जर मी माझ्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी काही कमावले आहे, तर तुम्ही त्याकडे चुकीच्या नजरेने का पाहता? मी कोणाकडेही स्वातंत्र्य मागायला गेलेलो नाही… तुमचे स्वातंत्र्य नेहमीच कमावले जाते – मग ते आर्थिक असो, सामाजिक असो किंवा वैचारिक असो, तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य द्यायला कोणी येत नाही, तुम्हाला ते घ्यावेच लागेल. सोयीसुविधांचा प्रश्न आहे, लेखक भुकेने मरतात, वेडेपणाने मरतात – तुम्ही या रोमँटिसिझमचे बळी का आहात? मी चुकीचे लिहून सुविधा गोळा केल्या असतील तर मला मूर्ख म्हणा. माझ्या कादंबऱ्या आणि कथा नष्ट करा”.
मग दुसरा प्रश्न आला – ‘तुम्ही ‘फॅमिली प्लॅनिंग’वर एक दीर्घ कथा लिहिली होती, ती ‘सारिका’मध्ये प्रसिद्ध झाली होती. अशा प्रकारचे प्रचारात्मक लेखन करताना तुम्हाला त्रास होत नाही. यशपाल यांचं म्हणणं होतं- ‘मी या कथेचा बचाव शेवटी प्रत्येक साहित्यिक प्रचारात्मक आहे असे सांगून करणार नाही, परंतु मी हे नक्की सांगेन की जर तुमच्या लेखनाने निवड करण्यायोग्य गोष्टींचे आत्मपरीक्षण केले नाही आणि समाजाच्या भयंकर परिस्थितीचे दर्शन घडवले नाही. जर एखाद्याने चेतावणी दिली नाही, तर मानवी मानसिकतेचे केवळ सौंदर्य निर्मितीद्वारेच मनोरंजन केले जाऊ शकते. ज्या साहित्याला उद्देश नसतो ते जड असते. आपल्या संस्कृतीत आपल्याला आवश्यक1903 असलेले सर्व काही आहे या अभिमानावर आपण विसंबून राहून नवीन कल्पना आणि नवीन जीवनशैलीपासून दूर राहिलो तरीही, हा अभिमान आपल्याला भूतकाळात घेऊन जाऊ शकतो – तो आपले भविष्य ठरवू शकत नाही. मी गंमत म्हणून लिहित नाही”.
यशपाल यांच्या ‘झूठा-सच’ ही कादंबरी फाळणीच्या वेळी देशात झालेल्या भीषण रक्तपात आणि अराजकतेच्या विस्तृत पटावर सत्य आणि असत्य यांचे रंगीत चित्र रेखाटले गेले आहे. फाळणीपूर्वीच्या पंजाब आणि फाळणीनंतरच्या भारतातील दोन कुटुंबांच्या जीवनातील चढ-उतारांची ही हृदयस्पर्शी कथा आहे. त्याचे दोन भाग आहेत – मातृभूमी आणि देश आणि देशाचे भविष्य. पहिल्या भागात फाळणीमुळे लोकांनी आपली मायभूमी गमावली आणि दुसऱ्या भागात अनेक समस्यांचे निराकरण चित्रित केले आहे. देशाचे समकालीन वातावरण शक्य तितके ऐतिहासिक ठेवले गेले आहे. विविध समस्यांबरोबरच या कादंबरीत प्रस्थापित झालेली नवी नैतिक मूल्ये रूढीवादी विचारांना जोरदार धक्का देतात. यशपालचे सर्वोत्कृष्ट कार्य आणि सर्वात महत्त्वाच्या हिंदी कादंबरीपैकी एक, “झूठा सच” (1958 आणि 1960) यांची तुलना टॉल्स्टॉयच्या “वॉर अँड पीस” या कादंबरीशी केली जाते. अमेरिकेच्या “न्यू यॉर्कर” या जगातील आघाडीच्या मासिकाने या पुस्तकाला “…भारताबद्दलची कदाचित सर्वात मोठी कादंबरी” असे म्हटले आहे. समीक्षकांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही दृष्टिकोनांच्या संतुलित चित्रणासाठी त्याचे कौतुक केले, तर वाचकांना सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अंतरंग आणि सूक्ष्म वर्णन आणि स्वातंत्र्यानंतरच्या महत्त्वाकांक्षी परंतु निराधार काँग्रेस नेत्यांचे निर्दयी वर्णन यासाठी ते अविस्मरणीय ठरले.
यशपाल यांना राष्ट्रीय सन्मानासाठी नामांकन मिळाल्यानंतर एका दशकानंतर काँग्रेस सरकारवर कादंबरीची टीका पुन्हा सुरू झाली. असे म्हणतात की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः ‘काँग्रेस सरकारचा धिक्कार’ संबंधित पाने वाचल्यानंतर त्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. शेवटी सरकार आणि प्रस्थापित विरोधी यशपाल यांना 1970 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या साहित्य सेवेने आणि प्रतिभेने प्रभावित होऊन सोव्हिएत भूमी माहिती विभागाने त्यांना ‘सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार’ (1970), हिंदी साहित्य संमेलन प्रयागने त्यांना ‘मंगला प्रसाद पुरस्कार’ (1971) दिला गेला. 1960 मध्ये “झूठा सच” कडे दुर्लक्ष करण्याच्या चुकीची भरपाई करण्यासाठी, साहित्य अकादमीने 1976 मध्ये यशपाल यांच्या शेवटच्या कादंबरीला ‘मेरी तेरी उसकी बात’ पुरस्कार जाहीर केला. यशपालच्या 73 वर्षांच्या संघर्षमय जीवनातील शेवटच्या दोन दशकांत यशपाल यांना पूर्ण ओळख मिळाली. सर्वोत्कृष्ट कथाकारांमध्ये त्यांना मानाचे स्थान होते.
यशपाल यांचे 26 डिसेंबर 1976 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे निधन झाले. तेव्हा त्यांच्या क्रांतिकारी चळवळीच्या आठवणींवर लिहिलेल्या ‘सिंहावलोकन’ या पुस्तकाच्या चौथ्या भागावर काम करत होते. त्यांच्या जाण्याने एक आधुनिक मार्क्सवादी, एक अत्यंत जागरूक लेखक गेला, ज्याची निर्मिती हिंदीने त्या कठीण दिवसांत केली होती, सर्वत्र व्यक्तिवाद आणि विलगतेची लाट असण्याच्या कठीण काळात पेन उचलणारे ते एकटे तसे लेखक होते. ‘विप्लव’चे लेखक आणि संपादक म्हणून यशपाल यांच्या रूपाने हिंदी साहित्याला सामाजिक आणि राजकीय सुधारणांच्या दिशेने एक भक्कम समर्थक मिळाला. स्त्रीयांप्रति त्यांचा दृष्टिकोण पुरोगामी आणि आणि आधुनिक असल्याने त्यांच्या कथा कादंबऱ्यांमद्धे महिला पात्र परिस्थितीशी लढणाऱ्या आणि मार्ग काढऱ्या होत्या. वंचित, दलित आणि उपेक्षित वर्गाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या लेखनाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी भारतीय समाजाच्या पुरातन आणि कठोर विचारांच्या विरोधात जोरदार संघर्ष केला. त्यांनी सर्व धर्मातील पारंपारिक आणि प्राचीन रीतिरिवाजांवर कडाडून टीका केली. त्याच्या टीकेमुळे त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. महात्मा गांधी आणि काँग्रेस पक्षाचे विचार आणि कार्यक्रम यांची निरर्थकता पाहून यशपाल यांनी त्यांच्या साहित्यावर आणि विचारसरणीवर मार्क्सवादाचा प्रभाव स्पष्टपणे मान्य केला आहे.
यशपालच्या वडिलांचे हमीरपूरच्या भोरंज उपविभागातील टिक्कर खत्रियांमध्ये घर होते. आज परिस्थिती अशी आहे की अनेक वर्षांपासून येथे वास्तव्य न केल्याने त्यांच्या महसूल नोंदीत लाल रेषा आहे. त्यांच्या जमिनीवर आणखी कुणीतरी अतिक्रमण केल्याचे सांगण्यात येत आहे. यशपालला हिमाचली म्हणवून राज्यस्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या राज्य सरकारला आज त्यांचे घर नक्की कुठे होते हेच माहीत नाही. हे देशासाठी जीव ओतून लढणाऱ्या क्रांतिकरांप्रति अनास्थेचे उदाहरण.
यशपाल हे राजकीय आणि साहित्यिक अशा दोन्ही क्षेत्रात क्रांतिकारक होते. त्यांच्यासाठी राजकारण आणि साहित्य हे दोन्ही माध्यम होते आणि समान ध्येय साध्य करण्यात मदत होते. यशपाल यांच्या कथा, कादंबरी, सामाजिक-राजकीय निबंध, एकांकिका, प्रवासवर्णने आणि क्रांतिकारक जीवनाच्या आठवणी यांसह 60 पुस्तकांचा हिंदी साहित्य आणि राजकीय विचारांवर खोल प्रभाव पडला. क्रांतिकारी व सामाजिक चेतनेने संपन्न यशपाल यांचे लेखन आजही प्रासंगिक आहेत. स्वातंत्र्य आंदोलन आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या परिस्थितीवर त्यांनी जे काही लिहिले, ते दस्तावेज आणि वैचारिक साहित्य म्हणून महत्वाचे आहे.
✒️कल्पना पांडे(मो:-9082574315)
(kalpanapandey281083@gmail.com)