✒️अत्तदिप धुळे विशेष प्रतिनिधी)मो:-9511953580
माणगाव(दि.20डिसेंबर):- ‘घर घर संविधान’ ह्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करुन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घर घर संविधान पोहोचवण्यासाठी माणगाव तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांची कार्यशाळा गोरेगाव व माणगाव येथे दोन टप्प्यात गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या दरम्यान श्रीमती सुरेखा तांबट गटशिक्षणाधिकारी, माणगाव यांच्या संकल्पनेतून ‘घर घर संविधान’ ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या दरम्यान सुचवलेले सर्व उपक्रम स्वयंस्फूर्तीने प्रभावीपणे राबवून घर घर संविधान पोहोचवण्याचा निर्धार उपस्थित सर्व शिक्षकांनी आपला हात उंचावून केला.
सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी संविधान म्हणजे नक्की काय आणि ते समजून घेण्याची आवश्यकता का आहे, याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानाच्या माध्यमातून आपण आपला देश कसा बनवणार आहोत आणि आपल्या देशातील सर्व नागरिकांना काय देणार आहोत, याविषयी सविस्तर मांडणी केली. ठरलेल्या नियोजनानुसार आज कार्यशाळेत संविधानाविषयी मिळालेली माहीती उपस्थित शिक्षक आपल्या शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना देणार असून ऐकलेली माहीती विद्यार्थी आपल्या पालकांना सांगणार आहेत. उद्यापासून संविधानाविषयी रोज परीपाठादरम्यान संविधानाचे अंतरंग उलगडणारी माहीती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ही माहिती संकलित करून तालुक्यातील सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांना सोपविण्यात आली आहे.
‘घर घर संविधान’ ह्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सुचवलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करून माणगाव तालुक्याचा एक आदर्श पॅटर्न बनवण्यासाठी सर्व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी श्रीमती सुरेखा तांबट गटशिक्षणाधिकारी माणगाव यांनी केले. या कार्यशाळेस विस्तार अधिकारी कुमार खामकर, धूळदेव कोळेकर, सर्व केंद्र प्रमुख, सर्व साधन व्यक्ती व माणगाव तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व प्रसार माध्यम प्रमुख अनिल नाचपल्ले उपस्थित होते.