Home नागपूर पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसारमाध्यामांची महत्त्वाची भूमिका-जिल्हाधिकारी विनय गौडा

पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसारमाध्यामांची महत्त्वाची भूमिका-जिल्हाधिकारी विनय गौडा

69

▪️चंद्रपूर मध्ये पत्र सूचना कार्यालयाचे वतीने प्रसारमाध्यम कार्यशाळा ‘वार्तालाप’ संपन्न

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चंद्रपूर(दि.17 डिसेंबर):-महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ति असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या व्यतिरिक्त इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज असून पत्रकारांनी पर्यटनाची क्षमता ही गोंंडकालीन मंदिरांमधील सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, गावांमधील खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अशा बाबीमध्ये शोधण्याचे आवाहन करुन प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज चंद्रपूर मध्ये केले.

https://www.purogamisandesh.in/news/82967

विनय गौडा यांच्या हस्ते प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) नागपूरने आयोजित केलेल्या प्रसार माध्यम कार्यशाळेचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.या एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळेची संकल्पना ‘चंद्रपुरातील संवर्धन आणि विकासाच्या दिशेने प्रयत्न’ अशी होती. याप्रसंगी उद्घाटकीय सत्राला केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार मंगेश इंदापवार, पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम संवाद अधिकारी सौरभ खेकडे, धनंजय वानखेडे उपस्थित होते.

त्यानंतर आयोजित तांत्रिक सत्रा मध्ये चंद्रपूर वन अकादमीच्या अतिरिक्त संचालक पियुषा जगताप (भारतीय वन सेवा) यांनी ‘वन्यजीव संरक्षण आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, धारणा निर्माण करण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रसारमाध्यमांनी वन संबंधित समस्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवर प्रकाश टाकावा. मनुष्य आणि प्राणी यांचेही संघर्षाव्यतिरिक्त सहअस्तित्व आहे, ज्याला प्रसारमाध्यमांनी चांगल्या वृत्तांकनाच्या माध्यमातून रेखांकित करणे गरजेचे आहे. इकोटूरिझमला चालना देणे, मांसाकरीता वन्यप्राण्याच्या शिकारीच्या दंडात्मक कारवाईबद्दल जागरूकता पसरवणे हे प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनासाठी काही रोचक पैलू आहेत ज्यामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण जागरूकता निर्माण होऊ शकते, असेही जगताप यांनी सांगितले. जंगलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी ‘पर्यायी उपजीविके’ बद्दल संबंधितांमध्ये जागरूकता पसरवावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पत्रकारांनी मानव वन्यजीव संघर्षाबाबत प्रश्न विचारले ज्याला श्रीमती जगताप यांनी त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवांसह उत्तर दिले.

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीचे शैक्षणिक सल्लागार मंगेश इंदापवार ‘वन्यजीव संरक्षण आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावरील तांत्रिक सत्राला संबोधित करताना म्हणाले की, पर्यावरणविषयक समस्यांवरील पत्रकारांनी केलेल्या वृत्तांकनामुळे पर्यावरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायपालिकेने स्वत:हून याचिका दखल घेतली आहे. वन्यजीव संरक्षण हे मानवी जीवनाइतकेच महत्त्वाचे आहे आणि प्रसारमाध्यमे या मुद्द्यांवर एक सजग प्रहरी म्हणून काम करत असल्याने असल्याने संबंधितांमध्ये प्रभावी बदल घडवून आणण्यास मदत होऊ शकते.

या एक दिवसीय प्रसारमाध्यम कार्यशाळे दरम्यान शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादाच्या सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. लाभार्थ्यांनी पंतप्रधान-स्वनिधी, दीनदयाल उपाध्याय अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान एनयुएलएम सारख्या योजनांमधून त्यांना मिळालेल्या लाभांबद्दल समाधान व्यक्त केले. बांबू प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र -बीआरटीसी चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनीही या संस्थेतील बांबूच्या पायाभूत सुविधांशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्याच्या अनुभवाची माहिती दिली.
पीएम स्वनीधी योजनेचे लाभार्थी अजब ठावरे यांनी त्यांच्या झुणका भाकर केंद्राला पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्ज सहाय्यामुळे फायदा झाल्या असल्याचे सांगितले. शिवशंकर कोलते या दिव्यांग लाभार्थी यांनी एनएलयूएम या योजनेअंतर्गत त्यांना स्वयंरोजगार मिळाला असल्याचे सांगून दिव्यांगांना मदत करणारी ही योजना केंद्र सरकारने आणल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभार मानले .

बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची कास धरणाऱ्या महिला कीर्ती तसेच बांबू रिसर्च ट्रेनिंग सेंटर मधून डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी चा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थी आकाश यांनी आपले अनुभव कथन केले.

‘चंद्रपूर विभागातील पर्यावरण शाश्वतता आणि रोजगार निर्मितीच्या संधी’ या विषयावर आधारित कार्यशाळेच्या सत्रात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी-सिपेट, चंद्रपूरचे पुष्कर देशमुख म्हणाले की, प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात होत असून ते सर्वव्यापी आहे. या क्षेत्रात प्रचंड रोजगार क्षमता असून केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत सिपेट सारख्या केंद्रीय संस्था प्लॅस्टिक अभियांत्रिकीमध्ये अल्पकालीन व्यावसायिक अभ्यासक्रम, त्याचप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत. ज्यामुळे कुशल तरुण प्लास्टिकशी संबंधित उद्योगांमध्ये नोकरी शोधू शकतात आणि स्वयंरोजगारही निर्माण करू शकतात. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांच्या मोठ्या फायद्यासाठी प्रसार माध्यम संस्था अशा संस्थात्मक प्रयत्नांना पुढे आणू शकतात आणि पर्यावरण स्नेही प्लास्टिकच्या व्यवस्थापनाबाबत जागृती करु शकतात असेही देशमुख यांनी सांगितले.

या प्रत्येक तांत्रिक सत्रा नंतर पत्रकारांनी वक्त्यांना प्रश्न विचारले ज्याची उत्तरे विस्तारपूर्वक देण्यात आली. या कार्यशाळेच्या शेवटी पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम संवाद अधिकारी सौरभ खेकडे यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कार्यप्रणाली बाबत एक सादरीकरण केले. याप्रसंगी श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूरचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ. पंकज मोहरील यांनी प्रातिनिधीक स्वरूपात या कार्यशाळेच्या संदर्भात आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया शेवटी व्यक्त केली.

या एकदिवसीय कार्यशाळेत चंदपूर आणि लगतच्या भागातील पत्रकार सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन आकाशवाणी चंद्रपूरचे उद्घोषक हेमंत शेंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here