✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.15डिसेंबर):- आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी या छोट्याशा गावात नुकताच रोगनिदान शिबिराचे आयोजन तसेच रा.जं. बोढेकर स्मृती सामाजिक सेवागौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदीराच्या आवारात करण्यात आले होते .
ग्रामगीता प्रणित ग्राम नवनिर्माण अभियान अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ डोंगरतमाशी द्वारा आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चंद्रकांत लेनगुरे, डॉ. चिंतेश्वर खुणे, ग्रामपंचायत सदस्य आनंद उईके, माजी जि. प. सदस्य रेखाताई कन्नाके, गंगाधर भोयर, चंद्रशेखर किरमे, अशोक जोरगेवार , रमेश भरणे, प्रदीप पायाळ, डोमाजी गेडाम, ज्ञानेश्वर कुटे, शालिकराव डोंगे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात झालेल्या रोगनिदान शिबिरात एकूण ११० रूग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच आरोग्य विषयक माहिती डॉ. लेनगुरे यांनी दिली.
याच कार्यक्रमात राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने रा. जं. बोढेकर स्मृती सामाजिक सेवागौरव पुरस्कार उदाराम बावणे महाराज (वडेगाव), जगदीश वणवे (डोंगरतमाशी) आणि आनंदराव उईके यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सामुदायिक प्रार्थना आणि लोकसहभागातून सेवाकार्य हा डोंगरतमाशी गावाचे वैशिष्ट्य असून राष्ट्रसंतांच्या विचारांनुसार गाव वाटचाल करीत असल्याचे मत यावेळी बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक बावणे महाराज यांनी केले तर सूत्रसंचालन रामदास पेंदाम यांनी केले.डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या डोंगरतमाशी गावाची लोकसंख्या सुमारे ३०० असून खोब्रागडे नदीच्या पूर्वेला आहे. येथील लोकांचे आराध्य दैवत डोंगरदेव असून येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, हे विशेष.