महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाला असल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु झाल्या आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार का? योजनेचे निकष बदलणार का? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होत आहे. याबाबत स्वतः आदिती तटकरे यांनी माहिती दिल्याचं पुढे येत आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या सर्व अफवा असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. या योजनेसंदर्भात कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना, कोणतेही आदेश, शासन निर्णय, निकष बदल विभागाने काढलेले नाहीत. आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे की, लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पुढे त्यांनी म्हटलं की, ‘लाडकी बहीण योजनेबद्दल रिल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्या यावर लक्ष ठेवून आहे. तरी समाजमाध्यमातून होणा-या या चुकीच्या माहितीला कोणीही बळी पडू नये. अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
महिला व बाककल्याण विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रिल्स आणि व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरून कार्यालयाकडे विचारणा होत आहे. यामुळे आपणास सांगण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच महिला व बालकल्याण विभागाने शासकीय यंत्रणांना सुचवलं की, त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा. चुकीच्या माहितीमुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये, याकरता आपण अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी महिला आणि जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी.
लाडकी बहीण योजनेतील १६ लाख अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आचारसंहितेच्या आधी १६ लाखांची छाननी बाकी होती. ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. या १६ लाख अर्जांपैकी पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार आहे. आतापर्यंत राज्यातील २ कोटी ३४ लाख लाभार्थ्यांना लाडकी बहीणी योजनेचा लाभ मिळाला आहे. यात १६ लाख अर्जांची छाननी झाल्यानंतर पुन्हा एकदा संख्या वाढणार आहे. निवडणूक काळात प्रशासन व्यस्त असल्याने या १६ लाख अर्जांची छाननी बाकी होती. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता. आता या सर्व अर्जांची छाननी करून या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार असल्याचं म्हटल्या जात आहे.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९