✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
तळोधी (बा)(दि.14डिसेंबर):- राधा कृष्ण सभागृह येथे अखिल भारतीय बुरुड (कंडरा) समाजाच्या वतीने बुरुड (कंडरा) समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन तथा जेष्ठ नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन तळोधी स्थानिक बुरुड समाज आयोजन समिती तसेच अखिल भारतीय बुरुड समाज (कंडरा) कोअर कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले.
कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष श्री राकेश गराडे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुरेश गराडे यांनी भूषविले.
प्रास्ताविक भाषणामध्ये प्रा. प्रदीप हिरापुरे यांनी बुरुड समाजाची दिशा आणि दशा याबद्दल कथन केले. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व्हावे या तळमळीने प्रमुख वक्ते आणि उद्घाटक म्हणून मा. श्री. हेमंत कामडी (IFS अधिकारी), सहाय्यक वन निरीक्षक (NTCA) प्रादेशिक कार्यालय नागपूर, उपस्थित होते. या कार्यक्रमात मा. हेमंत कामडी सर आपले तळोधी येथील बालपण व शिक्षण, त्यांनी त्यांच्या गावातील जैवविविधतेचे महत्त्व आणि वनसंवर्धनाचे महत्त्व यावर भर दिला. त्यांनी वनांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग कसा वाढवावा, याविषयीही चर्चा केली. त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, योग्य वेळापत्रक, आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व कळाले. त्यांनी बुरुड समाजातील तरुणांना UPSC, MPSC व इतर सारख्या परीक्षांसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. बुरुड समाजाच्या पारंपरिक हस्तकलेला बाजारपेठ कशी मिळवून द्यावी, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी हस्तकला उत्पादने ब्रँडिंग आणि डिजिटल मार्केटिंगद्वारे विक्री करण्याच्या संधी शोधण्याचा सल्ला दिला. यामुळे रोजगार निर्मिती वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात मा. प्रा. शुभांगी पाकमोडे यांनी महिला सबलीकरण व महिला समोरील आव्हाने यावर आपले भाष्य केले. त्यानी आपल्या भाषणात खालील मुद्यावर मनोगत व्यक्त केले आहे. मुलगी म्हणून ती कुटुंबासाठी आनंदाचे प्रतीक असते, पत्नी म्हणून ती कुटुंबाचे आधारस्तंभ बनते, आणि सून म्हणून ती घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळते. त्यांनी महिलांना या भूमिकांमध्ये संतुलन साधण्याची कला आत्मसात करण्याचा सल्ला दिला, तसेच या भूमिकांच्या सामाजिक महत्त्वावर भर दिला. महिला केवळ प्राथमिक शिक्षणातच नव्हे, तर उच्च शिक्षणातही महत्त्वाचा वाटा उचलत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, आणि व्यवसाय क्षेत्रांमध्ये महिलांचे वाढते योगदान अधोरेखित केले, तसेच बुरुड समाजातील महिलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात मा. प्रा. नितीन पोटे, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, ब्रम्हपुरी यांनी शिक्षणासोबत मानवी मूल्य : काळाची गरज यावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. नितीन पोटे यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे विविध टप्पे स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षणाने मुलांमध्ये ज्ञानाची पायाभरणी केली जाते. माध्यमिक शिक्षण त्यांच्या कुतूहलाला दिशा देते, तर उच्च शिक्षण त्यांना विशिष्ट कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करते. या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात.तसेच कार्यक्रमामध्ये मा. सोनल कामडी, विभागीय वन अधिकारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तळोधी येथील स्थानिक आयोजन समितीमधील श्री. राकेश्जी गराडे, संदेश नागपुरे, गौरी नागपुरे, उकेशजी नागापुरे, रितेश नागापुरे, हेमंत नागापुरे, रवींद्र नागापुरे, विनेश गराडे, रमेशजी गराडे, प्रभाकरजी गराडे, तातोबाजी नागापुरे, धर्मारावजी नागापुरे, विनोग नागापुरे, सुनील नागापुरे, उषा गराडे, विद्या नागापुरेनंदू हांडे, भारती नागापुरे, दिपाली नागापुरे, वनिता नागापुरे व तळोधी येथील इतर बुरुड समाजबांधव तसेच वाढोणा येथील रामचंद्र मुंडे, भगवान मुंडे, मंगेश मुंडे, मनोज मुंडे तसेच कोअर कमिटीमधील सर्व पदाधिकारी व इतर बुरुड समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.