✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
चंद्रपूर(दि.12डिसेंबर):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपकरणे पुरविणे या योजनेत बदल करण्यात आला आहे. सदर योजनेंतर्गत लाभार्थी बचत गटाला देण्यात येणारे ट्रॅक्टर व त्याची उपसाधने हे वस्तु स्वरुपात न देता आता मंजूर अर्थसहाय्य 3 लक्ष 15 हजार रुपये बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
🔺योजनेच्या अटी व शर्ती :-1) स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. 2) बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत यात अध्यक्ष व सचिवांचा समावेश असावा. 3) राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे तसेच सदर खाते हे अध्यक्ष व सचिव यांच्या अधार क्रमांकाशी संलग्न असावे. 4) स्वयंसहायता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याण विकास तसेच सहकार्य यांनी निर्धारीत केल्यानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करून जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावेत. 5) पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाने त्या त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. 6) योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहायता बचत गटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 7) बचत गटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तशा आशयाचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे. 8) ज्या स्वयंसहायता बचत गटांनी पॉवर टिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, ते बचत गट या योजनेसाठी पात्र राहणार नाही.
वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहायता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे संपर्क साधून अर्ज करावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.