✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि.10डिसेंबर):-दरवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यान ग्राहक जागरण पंधरवाडा साजरा करण्यात यावा असे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा गंगाखेड च्या वतीने तहसीलदार उषाकिरण शृंगारे तसेच पुरवठा अधिकारी प्रीतम दोडाल यांना दिनांक 9 डिसेंबर रोजी देण्यात आले. ग्राहक दिन साजरा करण्याच्या संबंधाने केलेल्या नियोजनात शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, ग्राहकांना आवश्यक असलेली सर्व माहिती या गोष्टींचा समावेश असावा. यासाठी कॉलेज, शाळा, व, ग्रामीण भागातील खेडी अशा सर्व ठिकाणी ग्राहक जागरणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे. यासाठी शहर व तालुक्यातील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पथनाट्य, निबंध स्पर्धा, शेतकरी मेळावे अशा उपक्रमाद्वारे व्यापक जनसंपर्क करून ग्राहक जागरणाचे कार्य करावे.
ग्राहक जागरण पंधरवड्यामध्ये नव्याने आलेला ग्राहक संरक्षण कायदा, अन्नसुरक्षेच्या बाबतीत विविध माहिती ग्राहकांना पुरवने, दिशाभूल करणारी जाहिरात, सायबर फसवणूक गुन्हे आणि डिजिटल अटक याबद्दल ग्राहकांना माहिती देणे, दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या खरेदी संबंधी विविध कायद्याची माहिती, वैद्यमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासन संबंधीच्या मूलभूत अधिकाराची माहिती इत्यादी बाबींचा ग्राहक जागरण उपक्रमामध्ये समावेश असावा. अशा प्रकारचे निवेदनअखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा गंगाखेड चे तालुकाध्यक्ष गोपाळ मंत्री ,सचिव सय्यद ताजुद्दीन, शहराध्यक्ष सुधाकर चव्हाण, कोषाध्यक्ष मेहमूद शेख, जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले ,जिल्हा महिला सदस्य प्रतिमा वाघमारे, मंजुषा जामगे,सदस्य परशुराम पापडू, राजकुमार मुंडे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.