Home महाराष्ट्र सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी व्यंकाप्पा भोसले तर स्वागताध्यक्षपदी डॉ....

सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी व्यंकाप्पा भोसले तर स्वागताध्यक्षपदी डॉ. अमर कांबळे यांची निवड

42

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.10डिसेंबर):-रविवार दि. 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वा. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन, येथे होणाऱ्या एकदिवसीय सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत आणि भटक्या विमुक्त चळवळीचे मार्गदर्शक नेते व्यंकाप्पा भोसले यांची तर स्वागताध्यक्षपदी साहित्यिक व समीक्षक डॉ. अमर कांबळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी दिली.

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तथागत बुद्धांच्या मानवतावादी विचारांना घेऊन काम करणारी महत्त्वपूर्ण अशी संस्था असून या संस्थेच्या वतीने धम्म विचारांचा जागर करण्यासाठी दर वर्षी धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे आयोजन केले जाते.

या वर्षीच्या सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी व्यंकाप्पा भोसले तर स्वागताध्यक्षपदी डॉ. अमर कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून व्यंकाप्पा भोसले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत आणि भटक्या विमुक्त चळवळीचे मार्गदर्शक नेते म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. आम्ही उपेक्षित, चळवळ हेच बळ, भटक्याचे अंतरंग, काळोख्याचे सोबती, चळवळीचे साथी, राजर्षी शाहू महाराज आणि भटके विमुक्त, भटकंती, परिवर्तनाच्या चळवळी आणि जागतिकीकरणाचा अवकाश या गाजलेल्या पुस्तकासह दहा हुन अधिक ग्रंथ त्यांच्या नावे आहेत. साहित्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मानाचे व सन्मानाचे 50 हुन अधिक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. तर डॉ. अमर कांबळे हे संवेदनशील मनाचे ख्यातनाम वक्ते व समीक्षक असून स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना, मुलाखत, आदिवासी समूह, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदी ग्रंथाचे त्यांनी लेखन केले आहे.

सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी व्यंकाप्पा भोसले तर स्वागताध्यक्षपदी डॉ. अमर कांबळे यांची निवड झाल्याबद्दल साहित्य व सामाजिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.पत्रकार परिषदेला सुरेश केसरकर, विश्वासराव तरटे, संजय सासने, अंतिमा कोल्हापूरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here