✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.7डिसेंबर):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन तथा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के विचार मंचावर उपस्थित होते. महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. जगदीश मेश्राम, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. प्रकाश उके यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी जाती-अंतासाठी पुकारलेला लढा यावर विस्तृत विवेचन करून आजचे राजकारणी स्वतःच्या राजकीय लाभासाठी जातीच्या भिंती पुन्हा कशा मजबूत करत आहेत हे जाती अंतर्गत आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या माध्यमातून पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. सतेंद्र सोनटक्के यांनी ”आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि त्याचे दूरगामी परिणाम ” या विषयावर भाष्य करतांना आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे एकाच प्रवर्गातील विविध जाती-जातीमध्ये द्वेष आणि कलह निर्माण होईल. शासनव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेला कदाचित तेच अपेक्षित असावे असे त्यांच्या ऐकून धेय्य धोरणावरुन भासमान होते आणि या अन्यायकारी, प्रतिगामी तथा जुलमी व्यवस्थेचा प्रतिकार करण्यासाठी प्रखर जन-आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही असे प्रतिपादन करून बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाचे सारथ्य करावे असे आवाहन केले.
प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांनी आजचा दिवस हा बाबासाहेबांना नुसते स्मरण करण्याचा नाही तर त्यांच्या विचारांना आचारात आणण्यासाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस आहे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट प्रा. सरोज शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार प्रा. माला कांबळे यांनी मानले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, एन. सि. सि. कॅडेट, तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा द्वारे संचालित डॉ .बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालय, ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल, फार्मसी कॉलेज, मीराबाई नर्सिंग कॉलेज येथिल प्राध्यापक- शिक्षक-कर्मचारीवृंद बहुसंख्येने उपस्थित होते.