✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.6डिसेंबर):-जगात राष्ट्र या संकल्पनेचा विचार फ्रान्सच्या क्रांतीनंतर उदयास आला मात्र भारतात राष्ट्र ही संकल्पना सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली आहे . देश व राष्ट्र यात जमीन अस्मानाचा फरक आहे . प्रत्येक राष्ट्र हे देश असतेच मात्र प्रत्येक देश हे राष्ट्र असतेच असे नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता म्हणूनच बाबासाहेबांना भारताला राष्ट्र म्हणून घडवायचे होते त्याकरिता त्यांनी समता , स्वातंत्र्य , बंधुता , न्याय ही तत्वे देशासमोर मांडली व संविधानात नमूद केली असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आयोजित अभिवादन सभेत वाघ बोलत होते .जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की आज भारतात राष्ट्र , देश या संकल्पना बाद ठरू पाहत आहे . धर्म , जात या पेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीच नाही ही मानसिकता तयार झाली आहे. राजकारणी लोक संविधान , देश , राष्ट्र याच्या फक्त वल्गना करतात व कृती संविधान विरोधी करतात . बाबासाहेबांचे संविधान , बाबासाहेबांचे संविधान फक्त भाषणात वापरावयाचे वाक्य होवून बसले आहे .
बाबासाहेबांनी जर संविधान लिहिले नसते तर हा देश कधीच एकसंघ राहिला नसता असेही वाघ यांनी स्पष्ट केले .
हरिश्चंद्र सोनवणे यांनी बाबासाहेबांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून त्यांचे राष्ट्रीय कार्य आज पुढं चालू ठेवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.चेतन नन्नवरे , सचिन बडगे , अनिल शिरसाळे, सुनील निकम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . सुरवातीस त्रिसरण , पंचशील ग्रहण करण्यात आले .
मुकुंद सपकाळे , प्रा. सत्यजित साळवे , प्रा. सी. पी. लभाने , डॉ. उल्हास ताडखेडकर , अनिल अडकमोल , नथू अहिरे , पी. डी. सोनवणे , जी. व्ही. भालेराव , दिलीप तासखेडकर , चंद्रशेखर अहिरराव आदींसह स्त्री पुरुष मोठ्यासंख्येने हजर होते .
कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्त घेण्यात आले या नंतर शेकडो स्त्री पुरुषांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याच ठिकाणी एक वही , एक पेन हा उपक्रम घेण्यात आला ३५० पेक्षा अधिक लोकांनी एक वही , एक पेन दिले . या वह्या , पेन संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहे .