✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि.4डिसेंबर):-परभणी- परळी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार आहे. यात शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा जूना रेल्वे मार्ग काढून टाकण्यात येणार असून दोन्ही रेल्वे मार्ग शहराच्या बाहेरून प्रस्तावित करण्यात आले आहेत. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केलेली मागणी आणि पाठपुराव्यास यश आले असून यादव यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.
गंगाखेड शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या रेल्वे मार्गा मुळे शहर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. तसेच वाढलेल्या रेल्वे फेऱ्यांमुळे तहसील जवळील रेल्वे गेट क्रमांक १७ सतत बंद राहून वाहतुकीचा खोळंबा होत होता. तसेच या गेटमुळे नांदेड – परळी या महामार्गावरील वाहतूकही सतत विस्कळीत होत होती. या त्रासातून मुक्तीसाठी याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात येवून या कामावर दोनशे कोटी रूपये खर्च अपेक्षित होता. तसेच हा उड्डाणपूल झाल्यास तहसील परिसरातील व्यवसायावर याचा वाईट परिणाम होणार होता.
या सर्व बाबींचा विचार करता सध्या अस्तित्वात असलेला रेल्वे मार्ग शहराबाहेर स्थलांतरीत करणे आवश्यक होते. अशातच परभणी-परळी या दुहेरी रेल्वे मार्गाची घोषणा होवून निधी मंजूर करण्यात आला. तसेच दुहेरी मार्गाचे सर्वेक्षणही सुरू झाले. सर्वेक्षण पुर्ण होताच कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी रेल्वेच्या नांदेड विभाग व्यवस्थापक निती सरकार यांची भेट घेतली. या भेटीत प्रस्तावित दुहेरी मार्ग करताना सध्या अस्तित्वात असलेला जूना रेल्वे मार्ग रद्द करून हा मार्ग नवीन बायपास रेल्वे मार्गाकडे स्थलांतरित करावा, अशी मागणी केली. तसेच परभणीचे खासदार संजय जाधव, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचेकडेही पाठपुरावा केला.
रेल्वे विभागाने गंगाखेड परळी दुहेरी मार्गाचा नकाशा तयार केला असून त्यास प्राथमिक मंजूरीही देण्यात आली आहे. यात दर्शविल्यानुसार गंगाखेड शहरातून जाणारा जूना रेल्वे मार्ग काढून टाकण्यात येणार असून दोन्ही मार्ग शहराबाहेरून टाकण्यात आले आहेत. यामुळे राज्य शासनाचे उड्डाणपूलासाठी खर्च होणारे सुमारे दोनशे कोटी रुपये वाचणार असून वाहतूकीच्या कोंडीतून शहरवासीयांची कायमची सुटका होणार आहे.
*रेल्वे विभागाचा निर्णय समाधानकारक- गोविंद यादव*
जूना रेल्वे मार्ग शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय योग्य आणि समाधानकारक आहे. यामुळे अनेक समस्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. तसेच नवा मार्ग होताना त्या त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा मिळतील ही अपेक्षा आहे. अंडरब्रीज, सर्व्हिस रोड या सुविधा मिळत नसतील तर त्यांची पुर्तता करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शेत जमीन, भूखंड मालकांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती गोविंद यादव यांनी दिली आहे.