▪️नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीतर्फे खुदीराम बोस यांची जयंती संपन्न
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमराती(दि. 4डिसेंबर):-“1903 मध्ये बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश शासनाने निश्चित केले.हा बंगालच्या फाळणीचा निर्णय खुदीराम बोस यांना अन्यायकारक वाटला तेव्हा ते 13 वर्षाचे होते.त्यांनी पुढे सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला.नववीत असताना शाळा सोडून पुढील आयुष्याचा पूर्ण वेळ देशासाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरविले .चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हे क्रूर अधिकारी म्हणून ओळखले जात.क्रांतिकारकांवर ते खूप अन्याय अत्याचार करीत होते तसेच त्यांच्या बंगालच्या फाळणीचा विचारही अन्यायकारक वाटत होता. म्हणून किग्जफोर्डची हत्या करण्यासाठी 30 एप्रिल 1908 रोजी रात्री आठ वाजता किंग्जफोर्डच्या बग्गीवर खुदीराम बोस व प्रफुल चंद यांनी बॉम्ब हल्ला केला पण त्यांचा अंदाज चुकला त्यामुळे किंग्जफोर्ड वाचले.हल्ल्यात किंग्फोर्डचा मृत्यू झाला असे समजून यांनी तेथून पळ काढला.पुसा रेल्वे स्टेशनवर संशयास्पद हालचालीवरून खुदीराम बोस यांना पोलिसांनी पकडून केवळ पाच दिवस खटला चालवून यांना 11 ऑगस्ट 1908 रोजी फाशीची शिक्षा दिली तेव्हा त्यांचे वय 18 वर्षे आठ दिवस होते .त्यांच्या स्मरणार्थ पुसा रेल्वे स्टेशनचे नाव खुदीराम बोस रेल्वे स्टेशन ठेवण्यात आले.असे खुदीराम बोस हे थोर युवा क्रांतिकारक होते .” असे प्रतिपादन प्रमुख अतिथी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी केले .
ते नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती तर्फे महावीर नगर,अमरावती येथे दि .३ डिसेंबर 2024 रोजी शहिद क्रांतिकारी खुदीराम बोस यांचा जन्म दिवस सांप्रदायिकता विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते .थोर क्रांतिकारक खुदीराम बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय देशमुख,प्रमुख वक्ता समितीचे सचिव सतीश ढोरे तर प्रमुख अतिथी समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले सर होते .
अध्यक्ष वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते थोर क्रांतिकारक खुदीराम बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले.जमलेल्या सर्वच श्रोत्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धनंजय देशमुख विचार व्यक्त करताना म्हणाले ,” समाजामध्ये चालत असलेल्या कुप्रथा, भ्रष्टाचार,चारित्र्य पतन, बलात्कार,चोरी,सांप्रदायिकता, महागाई, बेरोजगारी तथा इतर ज्वलंत सामाजिक मुद्द्यांवर महापुरुषांचे विचारच समाजाला मुक्तीचा मार्ग दाखवू शकतात तथा आजच्या या सभ्य समाजामध्ये जे काही सभ्यता निर्माण झाली आहे त्यासाठी अनेक महापुरुष, क्रांतिकारी, वैज्ञानिक तथा सामाजिक भान असणाऱ्या असंख्य लोकांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या विचारांना जिवंत ठेवणे व त्यांच्या कार्यांना सन्मानपूर्वक स्मरण करणे या उद्देशाने नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती सातत्याने महापुरुषांच्या विचारांना समाजामध्ये घेऊन जाते तथा नवयुवकांमध्ये क्रांतिकारी चरित्राचे आकर्षण निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम करत असते .”असे विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सतीश ढोरे म्हणाले की .” आज समाज जात,धर्म,प्रांत या इंग्रजांच्या नीतीच्या आधारे विभागला गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे की स्वतंत्रता लढाईमध्ये या सर्व महापुरुष,क्रांतिकारी यांनी धर्म, जात, प्रांत या सर्वांवर मात करत एकत्रित येऊन लढा उभा केला होता. त्याच पद्धतीने आज सांप्रदायिकता,बेरोजगारी, नीतीहिनता, अश्लीलता, स्त्रियांवर अत्याचार, महागाई यांसारख्या अनेक ज्वलंत समस्यांवर लढण्यासाठी सर्व जनतेला एकत्र येऊन एक मजबूत जन आंदोलन निर्माण करणे आवश्यक आहे असे आमच्या समितीला वाटते.”असे विचार व्यक्त केले.याप्रसंगी कु.निलू दास, गुंजन दास,प्रियांका मुंधरे,रुपेश वानखडे,वैभव सरोदे,सागर जामुळकर,किशोर पेंढारकर, विक्रांत सातारकर यांनी “खुदीराम बोस एक थोर क्रांतिकारक ” या विषयावर भाषण दिले.
श्री गणेश मुंधरे व सौ . प्रियांका मुंधरे यांनी क्रांतिकारी गीताचे गायन केले. तर प्रा.अरुण बुंदेले यांनी ” खुदीराम बोस ” या स्वरचित अभंगाचे व वंदन गीताचे गायन केले .कार्यक्रमाचे संचालन श्री आकाश महोरे तर आभार श्री गणेश मुंधरे यांनी मानले .याप्रसंगी इन्कलाब जिंदाबाद ,शहीद खुदीराम बोस अमर रहे, महान क्रांतिकारी खुदीराम बोस यांच्या स्मृती मिटवण्याच्या षडयंत्राला विफल करा, क्रांतिकारकांना बदनाम करणं बंद करा, नग्नता और अश्लीलता परोसना बंद करो, खुदीराम बोस यांच्या जीवनातून नव युवकांनी प्रेरणा घ्या, नारी मर्यादेसाठी छात्र नौजवान एक व्हा, पुंजीवाद साम्राज्यवाद मुर्दाबाद, नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती जिंदाबाद, महान क्रांतिकारी शिवदास घोष जिंदाबाद हे नारे देण्यात आले.