▪️‘जिल्हास्तरीय अविष्कार २०२४’ स्पर्धेचे आयोजन- जळगाव जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयातून ८०२ संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक होणार सहभागी
✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.3डिसेंबर):-येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती व नवनिर्मितीक्षमता वाढीस लागावी तसेच संशोधकवृत्ती विकसित करून युवा संशोधक निर्माण व्हावेत या उद्देशाने दि.०५ डिसेंबर २०२४ गुरुवार रोजी ‘जिल्हास्तरीय अविष्कार २०२४ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
या अविष्कार स्पर्धेचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, संस्थेच्या सचिव ताईसाहेब डॉ.स्मिताताई संदीप पाटील व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव स्कुल ऑफ लाईफ सायन्सचे प्रा.डॉ.पी.आर. पुराणिक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत हुम्यानिटीज, लैंग्वेजेस अँड फाईन आर्ट्स, कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ, प्युअर सायन्सेस, ऍग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिसिन अँड फार्मसी अशा एकूण सहा विभागांमधील पदवी, पदव्युत्तर तसेच पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांसाठी अविष्कार (पोस्टर व मॉड्युल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हुम्यानिटीज, लैंग्वेजेस अँड फाईन आर्ट्सचे १०९, कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ चे १४६, प्युअर सायन्सेसचे १२८, ऍग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरीचे ३२, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे ७८ तसेच मेडिसिन अँड फार्मसीचे ९० असे पोस्टरर्स व मॉडेल्सचे सादरीकरण केले जाणार असून जळगाव जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांमधील एकूण ८०२ संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होणार आहेत.
युवा संशोधक निर्माण व्हावेत या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमातून निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होईल.विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देणारी ही अविष्कार स्पर्धा आयोजित करण्याची संधी विद्यापीठाकडून महाविद्यालयाला प्राप्त झाली, त्याबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी आनंद व्यक्त केला.
तरी जळगाव जिल्हा परिक्षेत्रातील संस्था व महाविद्यालयांतील बहुसंख्य संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांनी या अविष्कार स्पर्धेप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार परिषदेवेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील यांनी केले.
यावेळी अविष्कार स्पर्धेचे स्थानिक सल्लागार समितीप्रमुख व प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.शैलेश वाघ, रजिस्ट्रार श्री.डी.एम. पाटील तसेच अविष्कार संयोजन समितीचे प्रमुख व समन्वयक डॉ.व्ही.आर.हुसे व डॉ.डी.डी.कर्दपवार यांनीही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ८६९८१५१५४३ व ९४२१८५१९४१ या नंबर संपर्क साधावा.