भारतातील थोर समाज सुधारक, आधुनिक भारताचे शिल्पकार , विचारवंत, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजात स्वातंत्र्य – न्याय- समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी पुणे येथे झाला. शेती व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव व चिमणाबाई यांचे जोतिराव हे दुसरे अपत्य. गोविंदराव यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. जोतिराव यांना मातृप्रेम मात्र फारसे लाभले नाही.त्यांच्या बालवयातच चिमणाबाई यांचे निधन झाल्याने जोतिराव आईच्या मायेला पोरके झाले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमता असलेल्या जोतिराव यांना गोविंदराव यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहीलीच्या वर्गात टाकले व जोतिरावांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. परंतू गोविंदराव यांच्याकडे कारकून असलेल्या एका सनातनी ब्राह्मणाला मात्र हे रुचले नाही.त्याने गोविंदरावांना मुलगा शिकला तर शेती बुडेल, धर्म बुडेल अशी भीती दाखवली. त्याचा परिणाम म्हणून गोविंदराव यांनी जोतिराव यांची शाळा बंद केली. त्यावेळच्या बालविवाह प्रथेनुसार गोविंदराव यांनी सातारा जिल्हातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची जेष्ठ कन्या सावित्रीबाई यांच्याशी जोतीराव यांचा विवाह सन १८४० मध्ये लावून दिला आणि जोतिराव व सावित्रीबाई या नव दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनास प्रारंभ झाला.
जोतिरावांच्या शेजारी मुस्लीम समाजातील गफ्फार बेग मुन्शी राहत होते. गफार बेग व ख्रिश्चन असलेले लिंजीट साहेब यांच्या अभ्यास पुर्ण चर्चा जोतीराव ऐकत आणि अधुनमधुन चर्चेत सहभागी होत असत. शाळेत न जाणारा हा मुलगा प्रचंड बुद्धीमान आहे हे दोघांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोविंदरावांची भेट घेतली व जोतिरावांच्या शिक्षणासाठी आग्रह धरला. गोविंदराव यांनी ती गोष्ट मनावर घेतली व जोतिराव यांचे शिक्षण पुन्हा सुरू झालं.जोतिरावांनी शिक्षणात आपल्या बुद्धिमत्तेची छाप सोडली. त्यांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, मोडी अशा अनेक भाषा अवगत केल्या. जोतिराव यांचे गुरू लहुजी उस्ताद साळवे यांनी जोतिरावांना शारीरीक व्यायाम कुस्ती, दांडपट्टा अशा मैदानी खेळात पारंगत केले. जोतिराव फुले एक पट्टीचे पहेलवान होते. कुस्ती खेळात ते निपुण होते. शारीरीक दृष्टया तसेच बौद्धीक दृष्ट्या ते सक्षम होते. जोतीराव हे शिक्षण संपल्यावर व्यवसाय सुरू करून संसारात स्थिरस्थावर होण्याच्या विचारात असतांना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. आपला ब्राम्हण मित्र सखाराम परांजपे याच्या लग्नाच्या वरातीतुन त्या वेळच्या कर्मठ सवर्णानी त्यांना केवळ शुद्र जातीचा म्हणून अपमानीत केले व हाकलून दिले. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम आला. माझी ही अवस्था आहे तर सर्वसामान्यांचे काय ?…. हा प्रश्न जोतिरावांना पडला. त्यांनी मात्र या जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे ठरवले.त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास सुरू केला. जोतीराव फुले चिकीत्सक व अभ्यासु होते, पवित्र कुराण हजरत महंमद पैगंबर यांचा ते आदर करत. पुढे त्यांनी पैगंबरावर पोवाडा लिहला. हिंदु धर्मातील मनुस्मृती संहितेनुसार निर्माण झालेली चातुवर्ण्य व्यवस्था व जातिव्यवस्था हेच हिंदु धर्मातील विषमतेचे खरे कारण असल्याने त्यांच्या लक्षात आले आणि शिक्षण हाच यावर उपाय असल्याचे त्यांचे ठाम मत झाले. बहुजन समाजाची अवनती का झाली.याचे वर्णन करतांना जोतीराव फुले म्हणतात..
विद्ये विना मती गेली,
मतिविना निती गेली,
नितिविना गती गेली,
गतिविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले.
अशा बहुजन समाजाला विशेषतः स्त्रियांना शिक्षण देण्याचा वसा त्यांनी हाती घेतला. मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिका नाही म्हणून जोतीरावांचे कार्य थांबले नाही. त्यांनी काळ्या मातीत झाडाखाली बसुन निरक्षर सावित्रीबाई ला शिक्षणाचे धडे दिले व भारतातील प्रथम मुख्याध्यापिका व शिक्षीका म्हणुन मुलींसमोर उभे केले. पुणे येथे भिडेच्या वाड्यात १ जानेवारी १८४८ मध्ये भारत देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.
महात्मा जोतीराव फुलेंकडून बहुजन समाजाचा होत असलेला शैक्षणिक कायापालट मात्र त्यावेळच्या कर्मठ सनातन्यांना मान्य नव्हता. त्या वेळच्या काही सवर्ण लोकांनी त्यांची शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला, मुली शिकल्या तर धर्म बुडेल असा अपप्रचार केला. सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात तेव्हा त्या वेळच्या सन्यातनांनी मुलांकडून दगड, शेण, चिखलाचा मारा केला, मात्र सावित्रीबाई ह्या जोतीरावांच्या कार्याप्रती ठाम होत्या. त्या डगमगल्या नाहीत, शिक्षणाचे अखंड कार्य त्यांनी सुरू ठेवले. सनातन्यांचे ऐकुण गोविंदरावांनी जोतीरावांना घरातुन बाहेर काढले. अशा वेळेस मुस्लीम समाजातील उस्मान शेख यांनी जोतीरावांना आश्रय दिला. एवढेच नाही तर उस्मान शेख यांच्या भगिनी फातिमाबी शेख यांनी सावित्रीबाई सोबत शिक्षणाचे कार्य सुरु ठेवले, मुस्लीम समाजातील पहिली शिक्षीका म्हणुन त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
महात्मा जोतिरावांनी शिक्षणासोबत प्रबोधनाचे काम सुरू केले. मेळा, जलसे, नाटके, उभे केले व समाजप्रबोधन केले. “तृतीय रत्न ” हे नाटक व “शेतकऱ्यांचा आसूड ” हे पुस्तक त्यांनी लिहले.शेतकरी व बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम सुरू केले. जातिभेद निर्मुलन व अस्पृश्यता निर्मुलनाचं काम जोतीरावांनी हाती घेतले.अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.अनाथ बालकांसाठी बाल सुधारगृह चालवले. समाजातील अनिष्ट चालीरीती जसे सतीची चाल, स्त्रीभ्रुणहत्या, केशवपनासारख्या वाईट प्रथा बंद केल्या. त्याकाळी त्यांनी न्हाव्यांचा पहिला संप घडवून आणला. संकटात सापडलेल्या काशीबाई नावाच्या ब्राम्हण समाजातील महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत केलं. तिला आधार दिला एवढेच नाही तिचे मुल दत्तक घेतले, त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्याला डॉक्टर बनविले. पुढे चालुन याच यशवंताने गोर- गरीब जनतेची सेवा केली, जोतिरावांना लोक आदराने तात्यासाहेब म्हणत.
सन १८६९ मध्ये रायगडावर जाऊन अथक प्रयत्नांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधली. त्यावर फुले वाहुन समाधीचं पुजन केले. पुण्यामध्ये १८७० ला आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रथम शिवजन्मोत्सव सुरू केला. ” कुळवाडीभुषण ” हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील ११०० ओव्यांचा प्रदीर्घ पोवाडा लिहून प्रकाशित केला व शिवरायांचा इतिहास जगासमोर आणला.
“जगातील पहिली शिवजयंती ” सुरू करण्याचा मान राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांनाच जातो.
छत्रपती शिवरायांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी वैदिक व्यवस्था झुगारून देत अवैदिक ( शाक्त ) पध्दतीने दुसरा राज्यभिषेक करून घेतला होता.या दिवसाचे औचित्य साधुन जोतीरावांनी २४ सप्टेंबर,१८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याच माध्यमातुन सत्य धर्माची घोषणा केली. सत्य धर्मात असणाऱ्या ३३ कलमा द्वारे समाज प्रबोधन केले. तृतीयरत्न हे १८५५ च्या सुमारास जोतीरावांनी लिहलेलं मराठी भाषेतील पहीले नाटक होय. त्याअर्थी जोतीराव हे मराठी भाषेतील आद्य नाटककार होत!.गावातील ब्राम्हण जोशी शेतकरी कुटुंबास कसा फसवतो यावर हे नाटक आधारित आहे. ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मिती करून जोतीरांवानी समाज जागृत केला. जोतीराव यांचे काव्य व ग्रंथ पाहता त्यांची साहित्य क्षेत्रातील मुशाफिरी लक्षात येते.
जोतिराव हे त्या वेळचे गर्भश्रीमंत व्यक्ती होते, परंतू भौतिक सुखामागे न धावता त्यांनी आपला सर्व पैसा शिक्षणावर व समाजकार्यावर खर्च केला. सामाजिक कार्य करतांना जोतिरावातील उद्योजकही मात्र शांत नव्हता, ते यशस्वी उद्योजक होते. आताचे मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनसं (CST) रेल्वे स्टेशन व पुणे येथील खडकवासला धरणाला महात्मा जोतिरावांच्या कंपनीनेच चुना पुरविला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ही महात्मा फुलेंच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव होता.महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फुलेंच्या गंजपेठ पुणे येथील घराचा क्रमांक ३९५ ध्यानात ठेवून संविधानात ३९५ कलमे घातली. स्त्री शिक्षण,न्याय, समता, बंधुता तसेच बहुजनांच्या उद्धारासाठी अवघे जीवन व्यतीत करणाऱ्या जोतिरावांना लोकांनी महात्मा या उपाधीने गौरविले.फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा ही मागणी जोर धरत आहे.मागणी जरी रास्त असेल तरी जनतेकडून महात्मा ही उपाधी मिळविलेल्या जोतीरावांचे आभाळाएव्हढे कार्य भारतरत्न सारख्या पुरस्कारात सामावू शकणार नाही, हे ही मात्र खरे !..
अशा या भारतातील थोर समाज सुधारकाची ज्योत २८ नोव्हेंबर, १८९० रोजी मालवली. खरचं आज तात्यासाहेबांना जाऊन १३४ वर्ष झाली.आज ही तात्यासाहेबांच्या विचारावर चालून समाज निर्मिती करणे हेचखऱ्या अर्थाने त्यांना वंदन ठरेल अशा या क्रांतीसूर्याला, राष्ट्रपित्याला कोटी – कोटी त्रिवार वंदन !
***
पी डी पाटील सर
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव.