Home महाराष्ट्र २३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचा प्रबोधनपर ग्रंथ दिंडीने प्रारंभ

२३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचा प्रबोधनपर ग्रंथ दिंडीने प्रारंभ

158

▪️फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांच्या जयघोषांनी संपूर्ण हिवरखेड नगरी दुमदुमून गेली .

✒️हिवरखेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

हिवरखेड(दि.28नोव्हेंबर):-येथील सर्वोदय शिक्षण समिती व वऱ्हाड विकास अमरावतीच्या वतीने 23 व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व सौ.गंगाबाई सितारामजी चौधरी कन्या हायस्कूल, हिवरखेड, ता.मोर्शी, जि.अमरावती येथेदिनांक 26 व 27 नोव्हेंबरला संपन्न झाले. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून प्रबोधनपर समता ग्रंथदिंडी मधून स्वातंत्र्य, समता,बंधूता आदि मूल्यांचा जागर करण्यात आला.

सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण व अभिवादन करून प्रबोधनपर समता ग्रंथदिंडीची सुरुवात झाली. सर्वोदय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सा.मो.पाटील, वऱ्हाड विकासचे संपादक तथा संमेलनाचे संयोजक प्रा.श्रीकृष्ण बनसोड,माजी प्राचार्य रवींद्र उ. वासनकर, प्रा.डॉ. बी. एस. चंदनकर, प्राचार्य सुनंदा दातीर, प्रा.अरुण बुंदेले, सौ.संजयताई टाक, श्री. वसंतराव तडस, प्रकाशराव भोजने,नारायणराव मेंढे,जितेंद्र फुटाणे (वार्ताहर), प्रा.सुभाष पारीसे, किशोर गहूकर, सौ. नंदाताई थोरात , गावातील ग्राम वाचनालयाचे पदाधिकारी, साहेबरावजी निंभेकर, अनंतराव फांजे, पंकज भडके, भूषण बेलसरे यासह फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार जोपासणारे अनेक मान्यवर हजर होते. समता ग्रंथदिंडीत महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अनुक्रमे रोहित बचले, ढोरे, अलकेश परतेती,कु. आरती महेंद्र हे विद्यार्थी विशेष आकर्षण ठरले होते.

भारताच्या 75 व्या संविधान दिनी 23 वे राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातून सत्यशोधकीय, धर्मनिरपेक्ष व परिवर्तनाच्या विचाराला गती मिळणार असल्याचे प्रा. श्रीकृष्ण बनसोड म्हणाले .महात्मा फुले लिखित सत्याचे अखंड गायनाने ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली . गावातील मुख्य मार्गाने दिंडीचे व पालखीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले तसेच बौद्ध विहार येथे स्वागत करण्यात आले. फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांच्या जयघोषांनी संपूर्ण हिवरखेड नगरी दुमदुमून गेली होती.प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या ह्या मन वेधून घेत होत्या तसेच साफसफाई करण्यात आली होती.

या प्रबोधनपर ग्रंथदिंडीच्या यशस्वीतेसाठी सर्वोदय शिक्षण समिती, हिवरखेड व वऱ्हाड विकास, अमरावतीचे सदस्य, महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व सौ. गंगाबाई सी. चौधरी कन्या हायस्कूल हिवरखेडचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here