▪️सागर बंगल्यावर भेटून दिला पाठींबा:फडणवीसांचे केले भरभरून कौतुक
✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि. 27नोव्हेंबर):-विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा मोठ्या फरकाने पराभव केला. महायुतीला बहुमत मिळाले असले तरी यात सर्वाधिक वाटा हा भारतीय जनता पक्षाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने हा विजय प्राप्त केला. ‘रेकॉर्डब्रेक’ जागा निवडून आल्याने यावेळी राज्याचे मुख्यमंत्रिपद हे भारतीय जनता पक्षाकडे असावे, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी फक्त माझीच नव्हे तर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे, अशी अपेक्षा गंगाखेडचे नवनिर्वाचित रासप आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेले बंड व त्यानंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती यामुळे भाजपाकडे जास्त आमदार असतानाही महायुतीत मोठे मन दाखवून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यावेळी भाजपाला २०१९ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षाही जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यंदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री करून त्यांच्या त्यागाला न्याय दिला पाहिजे, असेही आ. डॉ. गुट्टे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात
महायुतीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार, असे महायुतीचे नेते सांगत आहेत. असे असले तरी महायुतीत सर्वाधिक आमदार असणाऱ्या भाजपाकडेच मुख्यमंत्रिपद यावे, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी माझी प्रामाणिक भावना असल्याचेही आ. डॉ. गुट्टे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस हे सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याच नेतृत्वात राज्यात भाजपाने मोठे यश प्राप्त केले आहे. माझ्यासह महायुती मधील इतर घटकपक्षांच्या उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला प्रचार हा महत्त्वाचा ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, याकडे सुद्धा आ. डॉ. गुट्टे यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आ.डॉ.गुट्टे मुंबई येथे तळ ठोकून आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि फडणवीसांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. तसेच फडणवीसांचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे फडणवीसांच्या मंत्री मंडळात आ.डॉ.गुट्टे यांची वर्णी लागण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. परिणामी, मतदारसंघात सर्वत्र आ. डॉ. गुट्टे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.