Home गडचिरोली भारतरत्न जे.आर.डी. टाटा

भारतरत्न जे.आर.डी. टाटा

39

(जे.आर.डी.टाटा स्मृतिदिन पुण्यस्मरण विशेष)

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी.टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात. जेआरडींना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स.१९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स.१९९२ साली त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले. सन २०१२मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या दी ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये टाटा सहाव्या क्रमांकावर होते. त्यांच्या कार्याची रोचक माहिती श्री एन. के. कुमार जी. गुरुजींच्या सदर लेखात अवश्यच वाचा….

प्रथम थोडक्यात कर्तबगार टाटा घराण्याचा इतिहास जाणू या. भारतातील लोखंड व पोलाद उद्योगाचा पाया घालणारे, तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीकरिता कापडगिरण्या, जलविद्युत्‌ प्रकल्प उभारणारे जगप्रसिद्ध कारखानदार, व्यापारी, दानशूर व देशभक्त असे टाटा घराणे. टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी होते. त्यांचे दोन सुपुत्र सर दोराबजी व सर रतनजी. जमशेटजींचे पुतणे जहांगीर रतनजी दादाभाई- जेआरडी हे या घराण्यातील धडाडीचे, कल्पक व दीर्घोद्योगी असे कर्ते पुरुष होत. एकाच घराण्यातील तीन कर्तबगार पिढ्यांनी घडवून आणलेला देशाचा प्रचंड औद्योगिक विकास, ही एक अनन्यसाधारण वस्तुस्थिती होय. टाटा घराण्याचे कर्तबगार चतुष्टय संस्थापक जमशेटजी, दोराबाजी, रतनजी व जेआरडी हे होत. टाटा उद्योगाचे आद्य प्रवर्तक जमशेटजी नसरवानजी कार्यकाळ ३ मार्च १८३९-१९ मे १९०४ यांचा जन्म गुजरात राज्यातील नवसारी येथे एका पारशी घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांची मुंबईत व्यापारी पेढी होती. वयाच्या तेराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबईस आले. १८५६-५८ या काळात त्यांनी एल्‌फिन्स्टन कॉलेजमधून शिक्षण घेतले. रामकृष्ण गोपाळ भांडारकर व दिनशा वाच्छा हे त्यांचे सहाध्यायी होते. सन १८५८मध्ये ते एल्‌फिन्स्टनमधून ग्रीन स्कॉलर- पदवीप्राप्त म्हणून उत्तीर्ण झाले. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांचा करसेटजी डाबू या पारशी गृहस्थांच्या हीराबाई या कन्येशी विवाह झाला. दोराबजी व रतनजी हे त्यांचे पुत्र. सन १८५९मध्ये जमशेटजी आपल्या वडिलांच्या व्यवसायात शिरले. याच सुमारास हाँगकाँगच्या जमशेटजी अँड अर्देशिर या शाखेच्या व्यवहारात लक्ष घालण्यासाठी त्यांना तेथे पाठविण्यात आले. तेथूनच पुढे ते शांघायला गेले व तेथे त्यांनी दुसरी शाखा उघडली.

सन १८६५मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी ते मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर त्यांनी मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळे निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन तिचे कापडगिरणीत रूपांतर केले. तिचे ॲलेक्झांड्रा मिल असे नामकरण करून त्यांनी आपल्या औद्योगिक कारकीर्दीस प्रारंभ केला. या पहिल्याच उपक्रमामुळे त्यांना कीर्ती व संपत्ती या दोहोंचाही लाभ झाला. त्यांनी ही भरभराटीस आणलेली गिरणी विकून टाकली. यानंतर मोठ्या आकारामानाची कापडगिरणी स्थापण्याचा संकल्प सोडून ते कापडउद्योगाचे अधिक शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविण्याकरिता पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे फिरोजशहा मेहतांशी त्यांचा घनिष्ठ स्नेह जडला. सन १८७४मध्ये भारतात परतल्यावर अनेक मित्रांचा विरोध असूनही जमशेटजींनी मुंबईऐवजी नागपूर येथे एम्प्रेस मिल्स ही कापडगिरणी सुरू केली. एम्प्रेस मिल्सच्या स्थापनेपासूनच त्यांनी कामगारकल्याण योजना कार्यान्वित केल्या. कुर्ला येथील धरमसी मिल ही जुनी गिरणी विकत घेऊन तिचे स्वदेशी मिल्समध्ये रूपांतर केले व कापडधंद्याचा विस्तार केला. त्याच वर्षी त्यांनी अहमदाबाद येथील ॲडव्हान्स मिल्स ही कापडगिरणी भरभराटीस आणली. स्वदेशी मिल्स या गिरणीच्या रूपाने त्यांची स्वदेशी चळवळीबद्दल वाटणारी आस्था प्रकट झाली, तर ॲडव्हान्स मिल्सच्या रूपाने त्यांचा कापडउद्योगातील आधुनिकीकरणाचा दृष्टिकोन दिसून आला. भारतीय कापडउद्योगाचे आधुनिकीकरण करण्याचे श्रेय जमशेटजींना द्यावे लागते. त्याच्याच अनुषंगाने भारतात लांब धाग्याच्या कापूस उत्पादनासही त्यांनी प्रयत्न केले.

जमशेटजींनी आपल्या औद्योगिक ध्येयवादात स्वदेशाच्या आणि स्वकीयांच्या गरजांची जाणीव सतत राखली होती. त्यांनी दूरदृष्टीने टाटा सन्स लि. या संस्थेची स्थापना करून तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा उद्योगसमूहातील विविध उद्योगांना आणि संस्थांना होणारा फायदा न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो. भारतातील आधुनिक उद्योगधंद्यांचे प्रवर्तन जमशेटजींनी केले. इतर पुढारलेल्या राष्ट्रांच्या बरोबरीने जर हिंदुस्थानला जावयाचे असेल, तर त्याचे औद्योगिक कार्यक्षेत्र विस्तृत झाले पाहिजे हिंदुस्थानची भौतिक उन्नती होण्याचा शक्य कोटीत असणारा मार्ग हाच आहे, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. व्यवहारी दृष्टीबरोबरच कल्पकता, उपक्रमशीलता, समयोचितता, धाडसीपणा आणि निकोप व्यापारी दृष्टी ह्या गुणांमुळेच जमशेटजींना अपार यश लाभले. रूढ धंद्यांपेक्षा नवेनवे औद्योगिक क्षेत्र शोधण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. राष्ट्रीय व आर्थिक पारतंत्र्याच्या काळात स्वदेशीच्या संकल्पनेला सिद्धीचे रूप देण्यात, देशातील नैसर्गिक साधनसामग्रीच्या शोधाकरीता व विकासाकरिता प्रचंड श्रम घेण्यात आणि वैज्ञानिक अन्वेषणाची प्रेरणा देण्यात जमशेटजी टाटा हे अग्रभागी होते. देशातील खनिजसंपत्तीचा शोध व विकास हा देशातील लोकांनीच देशी भांडवलाच्या साहाय्याने घडवून आणला पाहिजे, या मतावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. यशस्वी उद्योगपती तसेच व्यापारी असूनही त्यांचे औदार्य व दानशूरत्व अनन्यसाधारण होते. औद्योगिक क्रांतीच्या काही अनिष्ट परिणामांचेही त्यांना यथार्थ भान होते. त्यांपासून आपल्या कारखान्यांतील कामगारांना वाचविण्यासाठी कामगार-कल्याणाच्या अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या.

ग्रंथ वाचणे व टिपणे काढणे, हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांच्या सर्व लहानमोठ्या औद्योगिक प्रकल्पांना त्या त्या उद्योगधंद्यातील अद्ययावत ज्ञानाचे अधिष्ठान होते. नाउहाइम- प.जर्मनी येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सर दोराबजी व सर रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली. सर रतनजींचे पुत्र जेआरडी होत.

जे.आर.डी.टाटांचा जन्म दि.२९ जुलै १९०४ रोजी पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्समध्येच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेनंतर शिकू शकले नाहीत. इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स.१९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स.१९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स.१९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले. वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी म्हणजे इ.स.१९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेल आणि तंत्रज्ञान अशा नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. त्यांच्या पुढाकाराने इ.स.१९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये दिवसातून आठ तास काम, मोफत आरोग्यसेवा, भविष्य निर्वाह निधी आणि अपघात विमा योजना अशा पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या. उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स.१९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स.१९४१ साली मुंबईत सुरू केले.

जेआरडींना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स.१९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स.१९९२ साली त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले. सन २०१२मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या दी ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये टाटा सहाव्या क्रमांकावर होते. दि.२९ नोव्हेंबर १९९३ साली वयाच्या ८९व्या वर्षी जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

!! पुण्यस्मरण म्हणून त्यांना व त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन !!

✒️श्री एन. के. कुमार जी. गुरुजी(वैभवशाली भारतातील थोर पुरुषांच्या जीवनचरित्राचे गाढे अभ्यासक)पोटेगांवरोड, गडचिरोली. संपर्क सूत्र- ७७७५०४१०८६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here