Home लेख संविधान; भारताचा राष्ट्रीय ग्रंथ

संविधान; भारताचा राष्ट्रीय ग्रंथ

55

 

आज २६ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहे. गेली ७५ वर्ष संविधानाने देशाला एकसंध ठेवण्याचे काम केले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानामुळेच जिवंत आहे. संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे. भारतातील विविधता, अनेक भाषा, संस्कृती, धर्म, जात, पंथ, वंश, वेगवेगळ्या चालीरीती, रूढी-परंपरा या सर्वांन एका सूत्रात बांधणारा गुरुमंत्र म्हणजे संविधान.
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्याच्या व त्याचा सर्व नागरिकांस; सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्यासर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.
ही भारतीय संविधानाची उद्देशिका आहे. संविधानाची उद्देशिका हाच संविधानाचा आत्मा आहे. संपूर्ण संविधान याच उद्देशिकेवर आधारित आहे. भारतीय संविधानात नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांना फार महत्त्व देण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क, शैक्षणिक हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क हे मूलभूत हक्क घटनेने नागरिकांना बहाल केले आहेत. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे, संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, देशाचे सार्वभौमत्व कायम राखणे, देशाची अखंडता कायम राखणे, सार्वजनिक मालमत्तांची काळजी घेणे, देशासाठी नेहमी तत्पर राहणे ही मूलभूत कर्तव्यही संविधानात दिली आहेत. आपल्या हक्कांसोबत आपल्या कर्तव्याचीही जाणीव करुन देणारे व जगातील सर्वात मोठे असणाऱ्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास जाणून घ्यायला हवा.
२६ जानेवारी १९३० ला लाहोर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात पंडित नेहरूंनी तिरंगा फडकावून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. त्याच महत्वपूर्ण दिवसाचे स्मरण म्हणून २६ जानेवारी हा दिवस संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात आला. ९ डिसेंबर १९४६ ला घटना समितीचे कामकाज सुरू झाले. ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. बी एन राव हे या समितीचे सल्लागार होते. या समितीत पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर, एस. आर. जयकर, सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता, राजकुमारी कौर यांचा मान्यवर सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. घटना समितीच्या ११४ बैठका झाल्या होत्या. घटना समितीने ११ उपसमित्या देखील नेमल्या होत्या. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४७ रोजी स्वीकारण्यात आला. तोच २६ नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. ४ नोव्हेंबर १९४७ रोजी भारताच्या संविधान समितीच्या मसुदा समितीने संविधानाचा कच्चा मसुदा तयार करून तो चर्चा विनिमयासाठी सभागृहात ठेवला. त्यावर २ वर्ष ११ महिने १८ दिवस इतकी प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तिचा स्वीकार करण्यात आला.
संविधान समितीने मसुदा समितीवर सात सदस्यांची नियुक्ती केली होती. त्यापैकी एक मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांच्यानंतर अलादी कृष्ण स्वामी अय्यर, के. एम मुन्शी, गोपाल अय्यंगार, एम. माधवराव, मोहम्मद सादुल्ला, डी. सी. खेतान हे इतर सदस्य होते. असे जरी असले तरी त्यापैकी एकाचे निधन झाले होते, एक अमेरिकेत निघून गेले होते, एकाने राजीनामा दिला होता आणि एक सदस्य पूर्णवेळ राजकारणात व्यस्त होते. त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करण्याची पूर्ण जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली व त्यांनी ती जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि तन्मयतेने पार पाडली आणि एकट्यानेच संपूर्ण संविधानाचा मसुदा तयार करून तो घटना समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांच्याकडे २६ जानेवारी १९४९ सुपूर्द केला. शेवटी २४ जानेवारी १९५० रोजी अंतिम बैठक झाली आणि २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राज्य बनले त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस आपण मोठया उत्साहात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधान निर्मितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. जगातील विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक अशी राज्यघटना तयार केली म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते.

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here