अभूतपूर्व, अनाकलनीय, अविश्वसनीय या तीन शब्दात पंधराव्या विधानसभेच्या निकालाचे वर्णन करावे लागेल. अभूतपूर्व म्हणजे या पूर्वी कधीही घडले नाही असे. हो हा निकाल अभूतपूर्व असाच आहे कारण यापूर्वी असा निकाल महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता. २०१४ च्या मोदी लाटेतही जे घडले नव्हते ते आता घडले. महायुतीने तब्बल दोनशे छत्तीस जागा जिंकत महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला. महाराष्ट्रात महायुतीची लाट नव्हे तर त्सुनामी आली. या त्सुनामीत महाविकास आघाडीचे अनेक गड उध्वस्त झाले. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला. ही त्सुनामी इतकी जबरदस्त होती की पाच महिन्यांपूर्वी जी महाविकास आघाडी अजिंक्य वाटत होती तिला अर्धशतक देखील गाठता आले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेला विरोधीपक्ष नेता देखील मिळणार नाही अशी अवस्था झाली. हे खरोखरच अभूतपूर्व असेच आहे.
अनाकलनीय या अर्थाने की असा निकाल लागेल असा अंदाज कोणालाच आला नव्हता. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील राजकीय धुरिणांना असा निकाल लागेल असे वाटले नव्हते. खुद्द भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना देखील हा इतका विराट मिळेल असे वाटले नसेल. भल्या भल्यांना विचार आणि अभ्यास करायला लावणारा असा हा निकाल आहे. महायुतीला या निवडणुकीत महाविकास आघाडीपेक्षा थोड्याफार जागा अधिक मिळतील असा अंदाज होता. महायुती कसाबसा सत्तेचा सोपान चढेल असा अंदाज होता निवडणूक पूर्व चाचणीत ही तेच दाखवण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात त्याहूनही खूप वेगळे घडले.
अविश्वसनीय या अर्थाने की या निकालावर विश्वास ठेवणे अनेकांना अजूनही कठीण जात आहे. काहीजण या निकालावर अजूनही विश्वास ठेवायला तयार नाही कारण अवघ्या पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. महाविकास आघाडीने आश्चर्यजनक कामगिरी करत लोकसभेच्या ३० जागा जिंकत महायुतीला नामोहरण केले होते. अवघ्या पाच महिन्यात अशी काय जादूची कांडी फिरली की ज्याने इतका मोठा उलटफेर केला ? लोकसभेप्रमाणेच विधान सभेतही महाविकास आघाडीची सरशी होईल असा कयास काहीजण लावत होते त्यामुळेच या निकालावर त्यांचा विश्वास बसत नाही अर्थात कोणाचा विश्वास बसो अगर न बसो जनतेने दिलेला हा निकाल राजकीय पक्षांसह सगळ्यांना स्वीकारावाच लागणार आहे. हा जनतेच्या न्यायालयाने दिलेला निकाल आहे तो स्वीकारूनच विरोधी पक्षांनी या निकालाचे आत्मचिंतन करायला हवे.
या निकालाचे अवलोकन केले तर असे दिसून येते की लोकसभा निवडणुकीत झालेल्या पीछेहाटी नंतर महायुतीने त्या निकालाचे आत्मपरीक्षण करून त्यातील चुका आणि उणीवा दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने सामूहिक प्रयत्न केला त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेहमीप्रमाणे साथ लाभली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचाराचे अतिशय सूक्ष्म व काटेकोर नियोजन केले. याउलट माहविकास आघाडी लोकसभेच्या यशाने हुरळून गेली. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही आपल्याला सहानुभूती मिळेल या भ्रमात महाविकास आघाडीचे नेते राहिले त्यामुळे त्यांच्यात कोणताही समन्वय नव्हता. जागा वाटप असोत की प्रचार सभा महाविकास आघाडीची एकजूट कोठेच दिसली नाही. महाविकास आघाडीचे नेते सत्ता आपल्यालाच मिळाली या थाटात एकमेकांशी भांडू लागले. मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली. महाविकास आघाडीतील बाष्कळ नेत्यांनी जी बोल बच्चनगिरी केली ती ही त्यांना नडली.
लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाटी नंतर महायुती खडबडून जागी झाली आणि महायुती सरकारने अनेक लोकाभिमुख योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यापैकीच एक योजना. या योजनेअंतर्गत १५०० रुपये महिलांच्या खात्यावर जमा होऊ लागले. ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरेल असा अंदाज होता आणि तो खरा ठरला. यावेळी महिला मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या. महिला मतदारांची टक्केवारी पाच टक्क्यांनी वाढली. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले कदाचित त्यामुळेच महायुतीला इतका विराट विजय मिळवता आला. ज्या वेळी ही योजना आली त्यावेळी विरोधी पक्षांनी या योजनेवर टीका केली ही टीका कदाचित महिला मतदारांना रुचली नसावी. राज्यातील महिला मतदारांनी महायुतीला तारलेच नाही तर अक्षरशः उचलून धरले या सर्वांचा परिपाक म्हणजे महायुतीला मिळालेले हे घवघवीत यश.
या निकालाने काँगेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या तिन्ही पक्षांना मतदारांनी नाकारून भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर विश्वास दाखवला आहे त्यामुळे या तिन्ही पक्षांना आता पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल. अर्थात एका पराभवाने कोणताही पक्ष संपत नसतो झालेल्या चुका दुरुस्त करून या पक्षाने २०२९ चे लक्ष समोर ठेवून पक्षाची बांधणी करावी लागेल. पक्षातील जुन्या बोल बच्चन नेत्यांना बाजूला सारून नव्या दमाचे कार्यकर्ते तयार करावे लागतील. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यावर लक्ष केंद्रित करून या पक्षांनी तयारी सुरू करावी तर महायुतीने जनतेने दिलेल्या अभूतपूर्व यशाचा आदर राखत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून महाराष्ट्राला देशातील नंबर १ चे राज्य बनवण्यासाठी प्रयत्न करावेत.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५