अमरावती (प्रतिनिधी )-आदर्श शिक्षिका सौ.शारदा गणोरकर यांनी विद्यालयाला मंदीर व विद्यार्थ्यांना दैवत समजून स्वतः पूजाऱ्याची भूमिका वठवून अध्यापनाचे कार्य केले.त्यांनी शिक्षिका या पदाला सन्मान मिळवून दिला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कांतिकार्य तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले.”असे विचार सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.
ते वऱ्हाड विकास व सकल माळी समाज ऋणानुबंध’च्या वतीने कांडली ता.अचलपूर येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ.शारदा अरुणराव गणोरकर यांना ” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ” वऱ्हाड विकास अमरावती येथे प्रदान करताना अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष
सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड, प्रमुख अतिथी राज्यपुरस्कार प्राप्त प्राचार्य प्रदीप लांडे,समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले (अध्यक्ष,कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान),मरार माळी बहुउद्देशीय विकास संस्थाचे अध्यक्ष श्री.रामकुमार खैरे,सर्वशाखीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष इंजि.भरतराव खासबागे,
सत्यशोधक समाज समितीचे अध्यक्ष श्री विनोद इंगळे,श्री गजानन चांदुरकर ,पदाधिकारी प्रा.एन.आर. होले, गोविंद फसाटे,वसंतराव भड़के,से.नि. प्रशासकीय अधिकारी श्री. सुरेशराव मेहरे,संघटक श्री. सुनील लहाने, श्री.दिलीप तडस, सर्वशाखीय माळी समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता घटोळ,कार्याध्यक्ष प्रा.डॉ. उज्ज्वला मेहरे,सौ.नंदा बनसोड, पौलीस पाटील सौ.कविता पाचघरे,सौ.रेखा खैरे, सौ. मालती इंगळे (पाटील) होते.
सर्वप्रथम महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते हारार्पण व पूजन करण्यात आले.
सौ.शारदा गणोरकर यांची अध्यापन क्षेत्रातील दीर्घ सेवा,महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावरील लेखांचे व पुस्तकांचे प्रकाशन तसेच अभ्यासपूर्ण वक्ता इत्यादि समाज प्रबोधन,समाज संघटन आणि महिलांचे सक्षमीकरणासाठींच्या विविधांगी कार्यामुळे त्यांना शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,फुले दाम्पत्यांची प्रतिमा, सन्मानपत्र व प्रा. श्रीकृष्ण बनसोड लिखित विद्रोही महात्मा हे संशोधनपर पुस्तक सन्मानपूर्वक प्रदान करुन “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सर्व मान्यवरांनी सन्मानित केले.
——-
सौ. शारदा गणोरकर एक
आदर्श शिक्षिका- प्रा.अरुण बुंदेले
प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले यांनी ,” सौ.शारदा गणोरकर यांनी आदर्श अध्यापनातून आदर्श विद्यार्थी घडविले व आजही घडवित आहेत.विविध शालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमात सहभागी करून घेतले,त्यांच्यात कलागुणाची आवड निर्माण केली.गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या सौ.शारदा गणोरकर या एक आदर्श शिक्षिका आहेत.”असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी म. फुले चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी श्री.प्रदीप लांडे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महासंमेलन ह्या समाजोपयोगी लोकचळवळीला गतीशील करण्यासाठी सहकार्याचे आवाहन समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.उज्ज्वला मेहरे यांनी तर श्री.अरुण गणोरकर यांनी आभारप्रदर्शन केले. म.फुले लिखित अखंड गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.